Devendra Fadanvis: एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव ठेवला, मग उपमुख्यमंत्रीपद का स्वीकारलं? देवेंद्र फडणवीस म्हणाले की...
Nagpur : उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार घेतल्यानंतर पहिलं निमंत्रण नागपूर प्रेस क्लबने दिलं असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नागपूर: एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा असा प्रस्ताव मीच भाजपच्या वरिष्ठांना दिला असल्याचा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच केवळ वरिष्ठांनी आदेश दिल्यामुळेच आपण उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार घेतल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच नागपूरला भेट दिली. त्यावेळी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यानंतर ते प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "2019 सालीच भाजपला लोकांची पसंती मिळाली, पण चुकीचं पद्धतीने महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं. या काळात मला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही याचं दु:ख नव्हतं, पण मोदीजींच्या स्वप्नातला देश घडवण्यामध्ये महाराष्ट्र थांबला याचं दु:ख होतं. पण महाविकास आघाडीचं सरकार जास्त काळ टिकणार नाही याची खात्री होती. सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं. कोरोनाच्या काळातही जीवाची पर्वा न करता काम केलं."
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "शिवसेनेच्या जीवावर इतर पक्ष कसे मजबूत होत होते हे शिवसेनेचे आमदार, खासदार, कार्यकर्ते पाहत होते. मग शिवसेनेत उठाव झाला आणि आम्ही त्यांना साथ दिली. आम्ही आग्रह धरला असता तर मुख्यमंत्रीपद आम्हाला मिळालं असतं, पण सत्तेकरता नाही तर विचारांकरता आम्ही शिवसेनेचाच मुख्यमंत्री केला. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय भाजपने घेतला. हे प्रपोजल मी ठेवलं होतं."
या सरकारमध्ये सामिल व्हायचं नाही हे मी ठरवलं होतं असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले की, "पण भाजप अध्यक्ष नड्डा, अमित शाह यांनी मी सरकारमध्ये सामिल व्हावं अशी इच्छा व्यक्त केली. पंतप्रधानांनीही यावर माझ्याशी चर्चा केली. त्यानंतर मी उपमुख्यमंत्रीपद घ्यायचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्रीपद घेतलं याचा मला कमीपणा वाटत नाही."
विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्टाच्या विकासाचा विचार करणारे सरकार आता सत्तेत आलं आहे, या प्रदेशातील मागास भागाचा विकास करणार असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.