Appasaheb Dharmadhikari : श्री सेवकांचा उष्माघाताने मृत्यू, आप्पासाहेब धर्माधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, ही घटना माझ्यासाठी...
Appasaheb Dharmadhikari : आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी श्री सेवकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.
Appasaheb Dharmadhikari : ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी श्री सेवकांचा उष्माघाताने झालेल्या मृत्यू बद्दल शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा लाखो श्रीसेवकांच्या उपस्थितीत रविवारी पार पडला होता. त्यावेळी उष्माघाताने 13 श्रीसेवकांचा मृत्यू झाल्याने पुरस्कार सोहळ्याला गालबोट लागले. त्यानंतर या कार्यक्रमाच्या जंगी आयोजनावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. श्री सेवकांचा झालेला हा मृत्यू क्लेषदायक आहे. या घटनेवर कोणीही राजकारण करू नये असे आवाहनही आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले.
आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी काय म्हटले?
श्री सेवकांच्या मृत्यूनंतर आप्पासाहेबांनी एक जाहीर निवेदन प्रसिद्ध केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, महाराष्ट्र शासानाने आयोजित केलेल्या महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळ्यासाठी खारघर येथे आलेल सारे श्री सदस्य हे माझ्या कुंटुबाचे सदस्य आहेत. श्री सदस्यांचा हा परिवार देशविदेशात पसरला आहे. या पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने काही श्री सदस्यांना त्रास झाला आणि त्यातील काहींचा दुर्देवाने मृत्यू झाला. ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेषदायक आहे. माझ्या कुटूंबातीलच सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती आहे.
आपल्याच कुटूंबातील लोकांवर घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित आहे. माझे हे दुःख शब्दात व्यक्त करण्यापलिकडचे आहे. मृत्यू झालेल्या या सदस्यांच्या कुटूंबियांची आणि माझी वेदना सारखीच आहे. श्री सदस्य परिवाराची एकमेकांच्या सोबत राहण्याची पिढ्यानपिढ्यांची पंरपरा आहे त्यानुसार आम्ही सारेजण या आपदग्रस्तांसोबत कायम आहोत. यातील मृतांना सद्गती लाभो, तसेच त्यांच्या कुटूंबाला हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असल्याचे आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी म्हटले.
झालेला प्रकार दुर्दैवीच होता. त्याचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये. अशी आमची अपेक्षा असल्याचेही त्यांनी म्हटले.
आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून दुखवटा
उष्मा घाताने 13 जणांचा मृत्यू झाल्यामुळे आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी दुःखवटा पाळला आहे. पुढील दोन दिवस आप्पासाहेब आपल्या भक्तांना भेटणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या निवासस्थानाबाहेर पुरस्कार सोहळ्यानिमित्त रांगोळी, फुलांची सजावट मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. मात्र, ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे फुलांची सजावट रांगोळी फुलांची सजावट काढण्यात आली आहे.
13 श्री सेवकांचा मृत्यू
रविवारी, नवी मुंबई येथील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. या पुरस्कार सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी हजेरी लावली होती. यासोबतच हा अभूतपूर्व सोहळा याची देही, याची डोळा पाहण्यासाठी लाखो अनुयायांनी उपस्थिती लावली होती. सकाळी 10 वाजता सुरू होणारा कार्यक्रम हा उशिराने सुरू झाला आणि दुपारी संपला. मात्र, या कार्यक्रमानंतर अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. अनेकांना महात्मा गांधी मिशन रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. रविवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री सेवकांची विचारपूस केली. तर, मध्यरात्रीच्या सुमारास विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे यांनी एमजीएम रुग्णालयात जात उपचार घेत असलेल्या श्री सेवकांच्या प्रकृतीची विचारपूस केली.