मूकबधिर व्यक्तीला तीन महिन्यापासून साखळदंडाने बांधून ठेवले, उस्मानाबादच्या ढाब्यावरील प्रकार
नळदुर्गमध्ये एका धाब्यावर एक 35 वर्षीय तरूणाला साखळदंडाने बांधून ठेवण्यात आले होते. याबाबतचा एक व्हिडिओ एबीपी माझावर प्रसारीत झाल्यावर खळबळ उडाली.
उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्गमध्ये एका ढाब्यावर एक 35 वर्षीय तरूणाला साखळदंडाने बांधून ठेवण्यात आले होते. याबाबतचा एक व्हिडिओ एबीपी माझावर प्रसारीत झाल्यावर खळबळ उडाली. या तरूणाला ढाबा चालकाने बांधून ठेवून वस्तादाचे म्हणजे तंदुर रोटी भाजण्याचे काम दिले होते. हे काम करताना या तरूणाला दिवसभर बांधून ठेवले जात होते. ढाबा चालकाच्या भावाने याची तक्रार पोलिसांत दिल्यावर त्याची सुटका करण्यात आली. विशेष म्हणजे हा तरूण मूकबधिर आहे.
तुळजापूर नळदुर्ग रोडवर असलेल्या बंद टोल नाक्याजवळ तांबोळी यांच्या धाब्यावरील हा प्रकार उघडकीस आला आहे. मूकबधिर व्यक्तीला साखळदंडाच्या बेडीने डांबून ठेऊन त्याच्याकडून ढाबा चालक अमीर तांबोळी आणि परवीन तांबोळी हे गेली सहा महिन्यापासून स्वयंपाक करण्याचे काम करून घेत आहेत अशी माहिती हसन तांबोळी यांनी पोलिसांना दिल्यानंतर जात नळदुर्ग पोलिसांनी तात्काळ कारवाई करून संबंधित दोन व्यक्तीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. या पीडित विकलांग व्यक्तीला कोणती भाषा बोलता येते हे पोलिसांना समजत नसल्याने त्यांना तपासात अडचणी येत आहे. सध्या या तरूणाला उमरगा इथे अनाथालयात ठेवण्यात आले आहे.
पोलिसांनी तक्रारीनंतर पीडित तरुणाची सुटका केली. पोलिस निरिक्षक जगदिश राऊत यांनी सांगितले की, आम्हाला मूकबधिर तरूण असल्याची माहिती मिळाली. त्याला हॉटेलात आत लाकडी खांबावर बेड्या टाकून बांधून ठेवलं होतं. गेल्या तीन महिन्यांपासून हॉटेलमधील खोलीत तो बंद होता. आम्ही तिथे जावून त्याची सुटका केली.
या प्रकरणी हॉटेल मालक मोतीलाल तांबोळी याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. तरूणाशी संवाद साधण्यासाठी तज्ञांना बोलविण्यात आले आहे. त्याची वैद्यकीय तपासणी केली आहे.