Maharashtra Assembly Session: किरीट सोमय्यांच्या कथित व्हिडीओवरून सभागृहात घमासान, डॉ. नीलम गोऱ्हे यांना हटवण्याची विरोधकांची मागणी; असा होता अधिवेशनाचा दुसरा दिवस
Maharashtra Assembly Session: राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशाच्या दुसऱ्या दिवशी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये अनेक मुद्द्यांवर घमासान झाल्याचं पाहायला मिळालं.
Maharashtra Assembly Session: राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा (Monsoon Session) मंगळवार (18 जुलै) रोजी दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशीही अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधीपक्षांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळली. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर विरोधकांनी (Opposition) टीकास्त्र सोडलं तर सत्ताधारी पक्षांनीही विरोधकांना चोख उत्तर दिलं.
नीलम गोऱ्हेंना पदावरून हटवण्यासाठी विधीमंडळात बैठक
नीलम गोऱ्हेंनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे त्यांना हटवण्याची मागणी सध्या जोर धरत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर विधिमंडळात बैठक पार पडली आहे. निलम गोऱ्हे या सध्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत.
किरीट सोमय्यांच्या व्हायरल व्हिडीओमुळे विधानपरिषदेमध्ये घमासान
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला असून हा मुद्दा विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही गाजला. या प्रकरणाची सखोल आणि उच्च स्तरावर चौकशी होईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि अनिल परब यांनी आक्रमकपणे यावर भाष्य केलं.
किरीट सोमय्यांचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र
किरीट सोमय्यांनी व्हायरल व्हिडीओ प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात व्हायरल व्हिडीओची सत्यता तपासण्याची मागणी केली आहे. या व्हिडीओच्या निमित्तानं आपल्यावर अनेक आरोप करण्यात येत आहेत, आक्षेप घेण्यात घेत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधलं आहे. आपल्याकडून कोणत्याही महिलेवर अत्याचार झाला नसल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. तसेच या प्रकरणात किरीट सोमय्या यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील किरीट सोमय्या यांनी केली आहे.
कैलास गोरंट्याल यांनी उपस्थित केला महत्त्वाचा मुद्दा
छत्रपती संभाजीनगरमधल्या दंगलीत बटन गोळीसारख्या अमली पदार्थाची नशा करून हत्येच्या विकृत घटना घडल्याचा दावा जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. तसेच यावर बोलतांना कैलास गोरंट्याल यांनी छत्रपती संभाजीनगरमधील दोन घटनांचा उल्लेख केला आहे. छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी या घटनेची तक्रार तत्कालीन पोलीस आयुक्तांकडे केली होती. त्या पोलीस आयुक्तांची चौकशी झाल्यास, या घटनेची सविस्तर माहिती मिळण्यास मदत होईल, असंही गोरंट्याल यांनी सभागृहात म्हटलं आहे.
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधकांचं आंदोलन
विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही आंदोलनाचा पवित्रा घेतला. विरोधकांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सत्ताधारी पक्षांचं लक्ष वेधण्यासाठी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. या आंदोलनात कलंकित घटनाबाह्य सरकारचा धिक्कार असो असे लिहिलेला बॅनर झळकवण्यात आला.
सुधीर मुनगंटीवारांची विधान परिषदेत भविष्यवाणी
लवकरच सचिन अहिर हे भाजपमध्ये दिसतील आणि विरोधकांची अवस्था अश्वस्थामासारखी होईल अशी भविष्यवाणी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेमध्ये केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधक आणि सत्ताधारी पक्षामध्ये परिषदेमध्ये घमासान झाल्याचं पाहायला मिळालं.
रोहित पवारांची लक्षवेधी
अंमली पदार्थांच्या सेवनामुळे डिप्रेशनचं प्रमाण वाढत असल्याचा मुद्दा आमदार रोहित पवार यांनी अधिवेशानाच्या लक्षवेधीमध्ये उपस्थित केला आहे. विविध कारणांमुळे तरुणांमध्ये अंमली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण वाढत असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुद्दा
यवतमाळच्या पांढरकवडा येते विद्यार्थी आणि पालक यांनी अमरावतीच्या महर्षी विद्यालयात दर्जेदार शिक्षण आणि निवासी व्यवस्था चांगली मिळत नसल्यामुळे आदिवासी प्रकल्प कार्यालय पांढरकवडा येथे आमरण उपोषण सुरु केले आहे. आमदार उईके यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये या संदर्भात लक्षवेधी सूचना लावली. तसेच यासंदर्भात निष्क्रीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे.