Maharashtra Monsoon Session : विधीमंडळात गाजला खड्ड्यांचा मुद्दा, विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक
Maharashtra Monsoon Session : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खड्ड्यांच्या मुद्द्यावरुन चांगलीच खडाजंगी झाली.
Maharashtra Monsoon Session : मुंबईकरांना सर्वात जास्त त्रास होणाऱ्या खड्ड्यांचा (Potholes) मुद्दा विधानसभेत (Vidhansabha) देखील गाजला. समाजवादीचे पक्षाचे आमदार रईस शेख यांनी या मुद्द्याला सर्वात आधी हात घातला. यावेळी त्यांनी मुंबई-नाशिक महामार्गावर (Mumbai Nashik Highway) झालेल्या खड्ड्यांचा मुद्दा यावेळी विधानसभेत उपस्थित केला. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, 'हा भाग मुख्यमंत्र्यांचा आहे, दोन ते तीन आमदार याच भागातले आहे, एक मंत्री देखील याचा भागात आहेत, तरीही नागरिकांना या भागात प्रवास करताना बराच त्रास सहन करावा लागत आहे.' त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या या त्रासावर लवकरात लवकर तोडगा काढावा. दरम्यान त्यांनी यावेळी कळवा टोलनाक्याचा मुद्दा देखील सभागृहात उपस्थित केला आहे.
दादा भुसेंचे रईस शेख यांच्या प्रश्नाला उत्तर
रईस शेख यांनी ज्या भिवंडी बायपासचा मुद्दा मांडला त्यावर उत्तर देताना मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं की, 'या चौपदरी रस्त्याचे आठपदरी रस्त्यामध्ये रुपांतर करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. साधारणपणे ऑगस्ट 2024 पर्यंत या रस्त्याचे उत्कृष्ट दर्जाचे काम पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे.' त्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक कोंडी देखील कमी होण्यास मदत होणार असल्याचं दादा भुसे यांनी म्हटलं आहे. तर या रस्त्याचं 30 टक्के काम पूर्ण करण्यात आल्याची माहिती मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.
यावेळी आमदार रईस शेख यांनी ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण करणार का हा सवाल उपस्थित केला. यावर उत्तर देताना दादा भुसे यांनी म्हटलं की, 'मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.' तर तुम्हाला येत्या आठ दिवसांमध्ये तुम्हाला फरक दिसेल असं आश्वासन देखील मंत्री दादा भुसे यांनी दिलं आहे.
बाळासाहेब थोरातांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
यावर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील विधानसभेत भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. जर तुम्ही सगळे विरोधात असता तर आरडाओरडा केला असता, असं म्हणत बाळासाहेब थारोत यांनी शिंदे गटाच्या आणि राष्ट्रवादीच्या अजित पवरांच्या गटातील आमदारांवर टीकास्त्र सोडलं आहे. 'या रस्त्यावर दोन ते तीन किलोमीटरच्या रांगा असतात,' असं देखील थोरात यांनी यावेळी म्हटलं आहे. तर मंत्री दादा भुसे यांनी ऑगस्ट 2024 पर्यंत या रस्त्याचे कामकाज पूर्ण होणार असल्याचं सांगितलं. यावर बोलताना थोरांतांनी म्हटलं की, एक वर्ष नागरिकांना हा त्रास सहन करावा लागेल त्यामुळे यावर तातडीने उपाययोजना करण्यात यावी' तर ऑगस्टपर्यंत वाट बघणं कठीण असल्याचं थोरातांनी म्हटलं आहे.
नागरिकांना कमीत कमी त्रास झाला पाहिजे : विधानसभा अध्यक्ष
यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं की, 'जेव्हा शासन कोणत्याही प्रकराच्या विकासाचे काम हाती घेते तेव्हा त्यामुळे नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी शासनाने घेणे अपेक्षित असते. तसेच त्यासाठी कोणत्या पर्यायाची व्यवस्था केली आहे ही माहिती देखील प्रशासनाने नागरिकांना द्यायला हवी.' तसेच तातडीने या मार्गावर दुसरा पर्याय उपलब्ध करुन नागरिकांना वाहतूक कोंडीचा होणारा त्रास कमी करण्याच्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
उत्तम दर्जाचे रस्ते देता येत नसतील तर टोल बंद करा : अस्लम शेख
काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी या मुद्द्यावर बोलताना म्हटलं की, 'उत्तम दर्जाचे रस्ते देता येत नसतील तर टोल बंद करा. जर टोल वसूल केला जात असेल तर रस्ते देखील उत्तम दर्जाचे असायला हवेत.' त्यामुळे जोपर्यंत रस्ते चांगले बनत नाहीत, तोपर्यंत टोल बंद करावेत अशी मागणी आमदार अस्लम शेख यांनी विधानसभेत केली आहे. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, 'महाराष्ट्रातील 95 टक्के रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. तरीही तिथे टोल आकारला जात आहे.' यावर उत्तर देताना मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं की, 'महाराष्ट्रामध्ये ज्या रस्त्यांवर टोल आकारला जातो त्या रस्त्यांच्या दर्जाबाबत योग्य सूचना देण्यात येणार आहेत.'
VIDEO : Mumbai Potholes: विधीमंडळातही गाजला खड्ड्यांचा मुद्दा; भिवंडी बायपासमुळे थोरात त्रस्त; भुसे म्हणाले..