छत्रपती संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेला नवी ओळख, निवडणूक आयोगाकडून पक्ष म्हणून मान्यता, चिन्हंही ठरलं!
छत्रपती संभाजीराजे यांची स्वराज्य संघटना आता महाराष्ट्र स्वराज्य पक्ष म्हणून ओळखला जाणार आहे. निवडणूक आयोगाकडे त्या बाबत नोंदणी करण्यात आली असून पक्षाला आता निवडणूक चिन्ह देखील मिळाले आहे.
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आता साऱ्यांना वेध लागेल आहे ते विधानसभा निवडणुकीचे.(Maharashtra Assembly Election 2024) राज्यात आगामी निवडणुकांचे बिगूल कुठल्याही क्षणाला वाजण्याचे संकेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय वर्तुळात हालचालींना आता वेग आला आहे. अशातच महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीकडूनही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची चर्चा रंगली असताना छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांच्या स्वराज्य पक्षासाठी एक दिलासादायक बातमी पुढे आली आहे.
छत्रपती संभाजीराजे यांची स्वराज्य संघटना आता महाराष्ट्र स्वराज्य पक्ष म्हणून ओळखला जाणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाकडे त्या बाबत नोंदणी करण्यात आली असून पक्षाला आता निवडणूक चिन्ह देखील मिळाले आहे. अशी माहिती पक्षाचे सर्वेसर्वा छत्रपती संभाजीराजे आणि सरचिटणीस धनंजय जाधव यांनी दिली आहे.
निवडणूक आयोगाकडून पक्ष म्हणून मान्यता, चिन्हंही ठरलं!
छत्रपती संभाजीराजे यांची स्वराज्य संघटनेला आता निवडणूक आयोगाने सप्तकिरणांसह पेनाची निब हे निवडणूक चिन्ह दिले आहे. त्यामुळे स्वराज्य संघटना आता अधिकृतपणे पक्ष म्हणून नोंदविण्यात आला आहे. महाराष्ट्र स्वराज्य पक्ष म्हणून भारतीय निवडणूक आयोगाने ही मान्यता दिली आहे. त्यामुळे आजपासून स्वराज्य संघटनेचे रूपांतर अधिकृतपणे एका राजकीय पक्षात आज झाले असल्याची माहिती पक्षाचे सर्वेसर्वा छत्रपती संभाजीराजे यांनी समाज माध्यमांवर एका पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.
पूर्वी तलवार हे ताकदीचे प्रतीक, आता लेखणीने लढाया जिंकण्याचा काळ
पूर्वी तलवार हे ताकदीचे प्रतीक होते. आताच्या काळात लेखणी ही ताकदीची प्रतीक म्हणून ओळखली जाते. जेव्हा तलवारीने लढाया जिंकायच्या होत्या, तेव्हा आम्ही तलवारीने त्या जिंकल्या. आता लेखणीने लढाया जिंकण्याचा काळ आलेला आहे. तर या काळात लेखणीने अर्थातच, सप्तकिरणांसह पेनाची निब या निवडणूक चिन्हाने आम्ही निवडणुका जिंकू हा आत्मविश्वास व्यक्त करतो. स्वराज्य पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना, हितचिंतकांना व मतदारांना शुभेच्छा देतो आणि आपला पक्ष व चिन्ह प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचवावे, ही विनंती करत असल्याचे आवाहनही छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी केलं आहे.
छत्रपती संभाजीराजे यांची पोस्ट काय?
स्वराज्य संघटनेचे सर्व कार्यकर्ते, चाहते व हितचिंतक तसेच तमाम महाराष्ट्रवासियांना कळविणेस अत्यंत आनंद होतो की,
दि. ०९ ऑगस्ट २०२२ रोजी तुळजाभवानी मातेच्या साक्षीने आणि हजारो शेतकरी, कष्टकऱ्यांच्या साथीने स्थापन झालेली “स्वराज्य संघटना” आता भारतीय निवडणूक आयोगाकडे “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” या नावाने एक राजकीय पक्ष म्हणून अधिकृतपणे नोंदणीकृत झालेला आहे. अर्थातच, स्वराज्य संघटना आजपासून “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” म्हणून ओळखला जाईल.
याचबरोबर, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला “सप्तकिरणांसह पेनाची निब” हे निवडणूक चिन्ह प्राप्त झालेले आहे.मागील वर्षभरात आपण आपली संघटना एक पक्ष म्हणून घराघरात पोहोचवलीच आहे, आता अधिक जोमाने आपल्याला मिळालेले निवडणूक चिन्ह देखील सर्व मतदारांपर्यंत पोहोचवणे आपले कर्तव्य आहे.
महाराष्ट्रातील जनतेचे आपल्यावर असलेले प्रेम, पक्ष संघटनेचे कार्यकर्ते व हितचिंतकांचे कष्ट, राज्याच्या राजकारणाला असलेली एका नवीन व सुसंस्कृत पर्यायाची आवश्यकता ही आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करत, परिवर्तन महाशक्तीस सत्तास्थानी घेऊन जाईल, हे निश्चित !
हे ही वाचा