(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महापरिनिर्वाण दिनादिवशी दादर रेल्वे स्थानकावर विशेष व्यवस्था, गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी नियमांमध्ये बदल
डॉ बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनादिवशी (Mahaparinirvana Din) 6 डिसेंबरला मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvana Din : डॉ बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनादिवशी (Mahaparinirvana Din) 6 डिसेंबरला मुंबईत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मुंबईतील (Mumbai) दादर येथील चैत्यभूमीचे (Chaityabhoomi) दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं आंबेडकर अनुयायी येत असतात. दरम्यान, नागरिकांना कोणत्याही प्रकराची अडचण होऊ नये, तसेच गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी दादार रेल्वे स्थानकावर अधिकाऱ्यांनी विशेष व्यवस्था जाहीर केली आहे.
नेमकी काय केलीय विशेष व्यवस्था?
1) दादर मध्य व पश्चिम रेल्वे स्थानक पुर्व-पश्चिम जोडणारा मध्य मोठा ब्रिज
दादर मध्य व पश्चिम रेल्वे स्थानकातील पुर्व-पश्चिम जोडणारा मध्य मोठा ब्रिज व फलाट क्र. 12 वरील सर्व प्रवेशद्वार शहर हद्दीतून रेल्वे स्थानकात येणाऱ्या अनुयायी व प्रवाशांकरीता बंद राहील. सदर ब्रिज फक्त उपनगरीय / मेल गाड्यांनी येवुन दादर येथे उतरणाऱ्या प्रवाशांना पुर्व-पश्चिमेकडे शहर हद्दीत बाहेर जाण्याकरीता तसेच दादर मध्य व पश्चिम रेल्वे स्थानकातील एका फलाटावरुन दुसऱ्या फलाटावर जाण्याकरीता खुला राहील.
2) स्कायवॉक ब्रिज
सदर ब्रिज स्थानकाबाहेरील पुर्व-पश्चिम शहर हद्दीतून येणाऱ्या अनुयायी व दैनंदिन रेल्वे प्रवाशांकरीता दादर रेल्वे स्थानकांवरील फलाटावर येण्याकरीता खुला राहील. दादर मध्य व पश्चिम रेल्वे स्थानकात उपनगरीय / मेल गाड्यांनी येवून दादर येथे उतरणाऱ्या प्रवाशांना व अनुयायी यांना पुर्व-पश्चिमेकडे शहर हद्दीत बाहेर जाण्यास खुला राहील.
3) महानगर पालिका ब्रिज
सदर ब्रिज स्थानकाबाहेरील पुर्व-पश्चिम शहर हद्दीतून दादर रेल्वे स्थानक येथे फलाटावर येणाऱ्या अनुयायी व दैनंदिन रेल्वे प्रवाशांकरीता खुला राहील. दादर मध्य व पश्चिम रेल्वे स्थानकात उपनगरीय / मेल गाड्यांनी येवून दादर येथे उतरणाऱ्या प्रवाशांना व अनुयायी यांना पुर्व-पश्चिमेकडे शहर हद्दीत बाहेर जाण्यास बंद ठेवण्यात येईल.
4) मध्य मोठ्या पादचारी पुलाच्या उत्तरेकडील मध्य रेल्वेवरील पादचारी पुल हा दादर मध्य रेल्वे स्थानकातील फलाटावर उतरणाऱ्या प्रवाशांना फलाट बदलण्याकरीता व पूर्व बाजूस शहर हद्दीत जाण्याकरीता खुला राहील.
5) मध्य मोठ्या ब्रिजच्या उत्तरेकडील मध्य व पश्चिम स्थानकांना जोडणारा पादचारी पुल हा फक्त फलाटावरील प्रवाशांकरिता फलाट बदलण्याकरिता खुला राहील. तसेच सदरच्या पादचारी पुलावरुन मध्य व पश्चिम रेल्वे स्थानकावरील रेल्वे प्रवाशी हे मध्य रेल्वेच्या हददीपासून स्कायवॉक पादचारी पुलाकडे वळवण्यात येतील.
6) दादर पश्चिम रेल्वे स्थानक फलाट क्र. 1 वरील स्कायवॉक ब्रिजलगतचे गेट क्र. 1,6 व 7 वगळता सर्व प्रवेशद्वार ही रेल्वे प्रवाशी व अनुयायी यांना शहर हद्दीतून फलाटावर येण्यास बंद राहतील.
7) दादर पश्चिम रेल्वे स्थानक फलाट क्र. 1 वरील लंगडा / आंधळा पादचारी पुल शहर हद्दीतून येणाऱ्या रेल्वे प्रवाशी व अनुयायी यांना पश्चिमेकडून पुर्वकडे जाण्यास बंद राहील.
8) स्कायवॉकच्या लगत दक्षिणेकडील ब्रिज (पश्चिम रेल्वे) दादर पश्चिम रेल्वे स्थानक फलाट क्र.२/३, ४/५ वर उतरणाऱ्या प्रवाशांना सदर पुलावर येवून स्कायवॉक मार्गे शहर हद्दीत पुर्व व पश्चिम दिशेने जाता येईल. तसेच स्कायवॉक मार्गे प्रवाशांना मध्य रेल्वे स्थानक फलाट क्र.९/१०, १०/११ व १२, १३/१४ वर प्रवेश करता येईल. तसेच सदर पुलावर दादर पश्चिम रेल्वे स्थानकाचे फलाट क्र.१ वरील जिन्यावरुन व लिफ्टने येता येईल.गर्दीचे स्वरुप व परिस्थिती पाहून आपत्कालीन स्थिती निर्माण होत असल्यास, निर्बंध शिथिल करण्यात येतील.