रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वर्धा पोलिसांना माधव रसायन काढा
कोरोनाच्या लढाईत पोलिसांना काही होऊ नये, यासाठी वर्धा आयुर्वेद मित्र परिवार आणि श्री विश्ववती आयुर्वेद चिकीत्सालय कोल्हापूरच्या संयुक्त विद्यमाने त्यांना माधव रसायन काढा देण्यात आला.
वर्धा : कोरोनाच्या लढाईत पोलिसांची जबाबदारी अतिशय महत्त्वाची आहे. या काळात बंदोबस्त करताना, कर्तव्य बजावताना पोलिसांचा नागरिकांशी प्रत्यक्ष संपर्क येतो. त्यामुळे पोलिसांच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने वर्धा आयुर्वेद मित्र परिवार आणि श्री विश्ववती आयुर्वेद चिकीत्सालय कोल्हापूरच्या संयुक्त विद्यमाने पोलिसांना माधव रसायन काढ्याच्या वितरणाचा शुभारंभ करण्यात आला. आपल्या देशात आयुर्वेदालाही महत्त्व आहे. पोलिसांच्या स्वास्थासोबतच रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी हा काढा पोलिसांना देण्यात आला.
पोलीस अधीक्षक कार्यालयात या उपक्रमाची सुरूवात झाली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे यांच्या उपस्थितीत हा काढा आणि घरी घेण्याकरीता काढ्याच्या पावडरची सुमारे 500 पाकीट देण्यात आली. पोलिसांना देण्याकरीता ताजा काढा तयार करण्यात आला होता. सोबतच पोलीस कर्मचाऱ्याना सात दिवस पुरेल एवढी पावडरची पाकीटदेखील देण्यात आली. त्यावर काढा तयार करण्याच्या आणि घेण्याच्या सूचना नमूद करण्यात आल्या.
यामध्ये गुळवेल, अश्वंगधा, सुंठ, तुळस, दालचीनी, बेल आदी सतरा प्रकारची घटकद्रव्ये वापरण्यात आली आहेत. त्याचे प्रमाणही विशिष्ट आहे. सकाळी उपाशीपोटी अर्धा चमचा पावडर चार कप पाण्यात टाकून मंद आचेवर उकळायचे आहे. एक कप शिल्लक राहिल्यानंतर गाळून एक चमचा खडीसाखर, साखर टाकून काढा घ्यायचा आहे. यामध्ये उकळताना औषधी चूर्णासोबत लिंबाची पाने, गवती चहा, अद्रक, गुळ हेसुद्धा आवडीनुसार टाकता येईल, असं डॉक्टरांनी सांगितलं.
या काढ्यात सर्व बहुपयोगी औषधींचे मिश्रण असल्याने आणि त्याचा ताजा काढा करून प्यायल्यास रोगप्रतिकारकक्षमता वाढण्यास मदत होते. वारंवार आजारी पडणार नाही किंवा झाल्यास लवकर बरे होतील. मधुमेह किंवा ब्लडप्रेशर असलेल्यांनाही हे औषध घेता येईल. हा काढा लहान मुले, तरुण, वृद्ध सगळ्यांना पिण्यास योग्य आहे. आणखी 2 हजार पाकीट वितरित करणार असल्याचे आयुर्वेद डॉक्टर मिलींद सज्जनवार यांनी सांगितले. डॉ. मिलींद सज्जनवार, डॉ. नितीन मेशकर, डॉ. मंगेश भोयर, डॉ. निखील तांभेकर, डॉ. संकल्प हुमणे, डॉ. मधुरा सज्जनवार, डॉ. अमोल देशपांडे, डॉ. प्रवीण सातपुते, डॉ. चंद्रकांत जाधव आदी याकरिता सहकार्य करीत आहे.
पोलिसांचे आभार मानण्यासाठी अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्याकडून आमरस पुरीचा बेत