Madha Loksabha : रामराजे निंबाळकरांच्या मेळाव्यानंतरही माढ्याचा तिढा सुरुच; धैर्यशील मोहिते पाटील व अनिकेतराजेंचा एकत्र महादेवाला अभिषेक!
Madha Loksabha : रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटणमध्ये मेळावा घेतल्यानंतर लगेचच अनिकेत निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या भेटीने आश्चर्य व्यक्त होत आहे.
Madha Loksabha : माढा लोकसभेला (Madha Loksabha 2024) भाजपकडून (BJP) रणजीतसिंह निंबाळकर (Ranjitsingh NimbalKar) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर माढामध्ये रणसंग्राम सुरू आहे. निंबाळकर यांची उमेदवारीच बदलावी यासाठी रामराजे निंबाळकर गट आणि मोहिते पाटील गट कमालीचा आक्रमक झाला आहे. रामराजे निंबाळकर रणजितसिंह निंबाळकरांविरोधात काय भूमिका घेणार? याकडे गुरुवारी (21 मार्च) फलटणमध्ये झालेल्या मेळाव्याकडे लक्ष लागून राहिले होते. या मेळाव्यात रामराजे नाईक निंबाळकर यांनी माढा मतदारसंघातील उमेदवार बदला अन्यथा मतदान कमी झाल्यास आम्ही जबाबदार नाही असा थेट इशारा दिला आहे. रामराजे यांनी मेळाव्यातील भूमिका पक्षापर्यंत पोहोचवणार असल्याचे म्हटले आहे.
अनिकेत निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या भेटीने आश्चर्य
हा मेळावा होऊन अवघे काही तास होत नाही तोपर्यंत रामराजे नाईक निंबाळकरांचे चिरंजीव अनिकेत निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी शिखर शिंगणापुरात जाऊन शंभू महादेवाला एकत्रित अभिषेक घालून माढाचा तिढा सोडवण्यासाठी साकडे घातले. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय भूवया उंचावल्या गेल्या आहेत. अनिकेत नाईक निंबाळकर रामराजे यांचे चिरंजीव आहेत. रामराजे यांनी फलटणमध्ये मेळावा घेतल्यानंतर लगेचच अनिकेत निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या भेटीने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मेळाव्यात काय म्हणाले रामराजे?
रामराजे यांनी माढा लोकसभेसाठी फलटण, माण, खटाव, कोरेगाव (उत्तर) तालुक्यातील नेते कार्यकर्त्यांसह मेळावा घेतला. मेळाव्यात बोलताना ते म्हणाले की, कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी हा मेळावा घेतला. तुम्ही बोलला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस शिल्लक राहील का नाही, अशी स्थिती आहे. माढा लोकसभा मतदारसंघात आम्हाला उमेदवारी पाहिजे म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सांगितले होते. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर साधा फोन खासदार रणजितसिंह यांनी केला नाही. गरजच नसेल तर आम्ही कशाला मागे लागू? फलटण तालुक्याचा सर्व कारभार बोराटवाडीतून चालणार असेल तर त्यांनाच मुख्यमंत्री करा. मोदींच्या नावाखाली अत्यंत खालच्या पातळीवर सुडाचे राजकारण सुरू असल्याची टीका त्यांनी केली.
आम्हीसुद्धा इतकी वर्षे राजकारण केले. परंतु, सत्तेचा माज येऊ दिला नाही. आज माण, खटाव तालुक्याची काय अवस्था आहे. आमचा जिल्हा सुखी राहावा म्हणून उमेदवारी संजीवराजेंना द्या नाही तर आणखी कुणाला पण द्या, असे रामराजे यांनी स्पष्ट केले. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी अहोरात्र काम करूनही त्याच खासदारांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आपल्या विरुद्ध फॉर्म भरला अशी खंत अनिल देसाई यांनी व्यक्त केली.
इतर महत्वाच्या बातम्या