Mumbai Pune Expressway वर सलग दुसऱ्या दिवशी वाहनांची मोठी रांग
Mumbai Pune Expressway वर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी झाली आहे. विकेण्ड आणि सुट्ट्यांमुळे प्रवासी वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे.
पुणे/रायगड : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी झाली आहे. विकेण्ड असल्याने द्रुतगती मार्गावर बोरघाटाजवळ वाहनांची संख्या वाढली असल्याने ही वाहतूक कोंडी बोरघाटात झाली आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर ही वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे वाहने ही संथगतीने पुढे सरकत आहेत. वाहनांची रांग लागल्यामुळे चालकांसह प्रवासी देखील कंटाळले आहेत.
शनिवार आणि रविवार सुट्टीचे दिवस आले अशात सोमवारी बुद्ध पौर्णिमेची सुट्टी जोडून आली आहे. सलग तीन सुट्ट्यांचे औचित्य साधत सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी मुंबईतील पर्यटक पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडले आहेत. त्यामुळे या प्रवाशांना आता गर्दीचा सामना करावा लागत आहे.
द्रुतगती मार्गावर आज सकाळी टेम्पोचा छोटा अपघात झाला होता. त्यामुळे गाडी बंद पडली, यामुळे टेम्पोच्या मागे असलेल्या वाहनांना अडथळा निर्माण झाला. त्यातच विकेण्ड असल्यामुळे मुंबईवरुन पुणे, लोणावळा आणि महाबळेश्वर इथे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे एक्स्प्रेसवेवर वाहनांचा लोड पाहायला मिळतो.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर खालापूर टोलनजीक आणि बोरघाटात अमृकांजन पुलाजवळ वाहनांची सुमारे अर्धा किलोमीटर रांग लागली आहे. विकेण्ड आणि सुट्ट्यांमुळे प्रवासी वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुंबई आणि पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांची कोंडी झाली आहे. त्यामुळे सलग दोन दिवस मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर वाहनं धीम्या गतीने जात आहेत.
अपघातामुळे शुक्रवारी बोरघाटात वाहतूक कोंडी
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर कालही वाहतूको कोंडी झाली होती. बोरघाटातील अपघातानंतर दोन्हीकडील वाहतूक विस्कळीत झाली. शिवाय वाहनांची रांग लागली होती. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर ट्रेलरचा अपघात झाला. बोरघाटातील वाहतूक पोलीस चौकीनजीक ट्रेलर पलटी झाला. यात चालकाचा मृत्यू झाला. ट्रेलर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुसऱ्या वाहनाला धडक बसली. अपघातग्रस्त ट्रेलरने पुढे जाणाऱ्या ट्रकला धडक दिली. यात ट्रक पलटी झाला. खालापूर टोलजवळ मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर वाहनांची सुमारे दीड ते दोन किलोमीटर वाहनांची रांग लागली होती.