Pune Crime News: दिल्लीहून आलेल्या तीन अल्पवयीन मुलींनी लॉज गाठलं अन् लॉज मॅनेजरने केला थेट पोलिसांना फोन; एका फोनमुळे टळला अनर्थ
लॉजमध्ये तीन मुली खोली मागण्यासाठी आल्या होत्या मात्र त्यांच्यासोबत कोणी मोठं माणूस दिसला नाही. व्यावस्थापकाला संशय आला त्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन करुन या प्रकाराची माहिती दिली.
Pune Crime News: पुण्यातील एका लॉज व्यवस्थापकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे. हॉटेलमध्ये तीन अल्पवयीन मुली खोली मागण्यासाठी आल्या होत्या आणि त्यांच्यासोबत कोणीही वयस्क नव्हते, अशी माहिती देणारा फोन पुणे पोलिसांना केला आणि अल्पवयीन मुलींबद्दल माहिती दिली. त्यामुळे त्यांचं सगळीकडे कौतुक होत आहे.
या लॉजमध्ये तीन मुली खोली मागण्यासाठी आल्या होत्या मात्र त्यांच्यासोबत कोणी मोठं माणूस दिसला नाही. रात्री साडेनऊच्या सुमारास आल्याने व्यावस्थापकाला संशय आला त्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन करुन या प्रकाराची माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक रणदिवे यांनी तेथे जाऊन महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांना पोलिस ठाण्यात आणले.
16 वर्षे, 17 वर्षे आणि 13 वर्षे या तीन मुली नोएडा सेक्टर 27 आटा मार्केट, चक्की गल्ली येथील रहिवासी आहेत. त्या घरातील कोणालाही न सांगता मुली पुण्याला निघून गेल्याचे चौकशीत पुढे आले. तपशील मिळाल्यानंतर पुणे नियंत्रण कक्षाने सेक्टर 20 पोलिस स्टेशन नोएडाला माहिती दिली. मुलींच्या नातेवाइकांनी त्यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्याचे समजले. मुलीच्या एका मेव्हण्याशीही संपर्क साधून मुलींच्या सुरक्षेबाबत माहिती देण्यात आली.
नोकरीच्या शोधात आल्या होत्या
या तिन्ही मुली नोकरीच्या शोधात दिल्लीहून पुण्यात आल्या होत्या. 9.15 च्या सुमारास दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या ट्रेनने पुणे स्टेशन गाठलं होतं. त्याच्या कुटुंबीयांनी त्यांची बेपत्ता अशी तक्रार दिली होती. मात्र त्या भेटल्या नव्हत्या. अखेर या व्यवस्थापकाच्या प्रसंगावधानामुळे या दिल्लीतील मुलींना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
वैद्यकीय तपासणी करण्यात आली
पोलिसांना वेगळे काही संशय आल्याने त्यांनी तिघींचीही वैद्यकीय तपासणी करुन घेतली. पुण्याच्या ससून रुग्णालयात त्यांची तपासणी करण्यात आली. अल्पवयीन असल्याने महिला पोलिसांची मदत घेऊन त्यांना सरकारी वाहनातून मुंढवा सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
नातेवाईकांशी झाला संपर्क
दिल्लीत बेपत्ता असलेल्या मुली पुण्यात सापडल्यामुळे अनेक चर्चांना तोंड फुटलं होतं. मात्र त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क झाल्यावर पोलिसांनी त्यांना सुधारगृहात रवाना केलं आहे. काही दिवसातच त्यांना
त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.