(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नात्याने झिडकारलं, परक्याने स्वीकारलं; कोलकाताहून परतलेल्या पुण्यातील तरुणीचं सांगलीतील अनोळखी कुटुंबासोबत वास्तव्य
कामानिमित्त कोलकातामध्ये गेलेल्या आणि लॉकडाऊनमुळे तिथेच अडकलेल्या पुण्याच्या तरुणीची कोलकाता-सांगली प्रवासाची आणि क्वॉरन्टाईन काळाची ही कहाणी आहे.
सांगली : कोरोनाच्या संकटात नातेवाईकांनी झिडकारलं पण परक्याने स्वीकारल्याचं उदाहरणं समोर आलं आहे. पुण्यातील एक तरुणी मार्चमध्ये कोलकातामध्ये कामानिमित्त गेली. लॉकडाऊन जाहीर झाल्याने तिथेच अडकली. दीड महिने प्रयत्न करुनही तिला महाराष्ट्रात येण्याची सोय झाली नाही. शेवटी सांगली जिल्ह्यातील एका गलाई व्यावसायिकाच्या मदतीने ती महाराष्ट्रात आली. पण पुणे रेड झोनमध्ये असल्याने तिकडे जाण्याऐवजी तिने सांगोल्यात मावशीकडे जाण्याचा विचार केला. मात्र आधी या म्हणणारे तिच्या पाहुण्यांनी नंतर येऊ नका, असं सांगितलं. त्यामुळे ही तरुणी ओळखीच्या ना पाळखीच्या गलाई व्यावसायिकाच्या घरात मागील 12 दिवसापासून राहत आहे. क्वॉरन्टाईनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर गलाई व्यावसायिकच तिची आई-वडिलांकडे पाठवण्याची सोय करणार आहे.
टुरिझम व्यवसायाच्या निमित्ताने ही तरुणी 12 मार्च रोजी कोलकाताला गेली. तोपर्यंत लॉकडाऊन जाहीर झाला आणि ही तरुणी तिथेच अडकली. खूप वेळा तिने महाराष्ट्र जाण्यासाठी कोलकाता प्रशासनाशी संपर्क केला, मात्र ते शक्य झालं नाही. एक-दीड महिना यात गेला. शेवटी एका मित्राच्या माहितीने तिचा सांगली जिल्ह्यातील गलाई व्यावसायिक असलेले, पण कोलकातामध्ये स्थायिक असलेल्या अजित शिंदे यांच्याशी संपर्क झाला. त्यांनी तिला आपल्यासोबत आणायची तयारी दर्शवली. सर्व प्रक्रिया पूर्ण करुन आपल्या कुटुंबासोबत तिला गावी घेऊन आले. कोलकाताहून अनोळखी कुटुंबाबसोबत ही तरुणी महाराष्ट्र आली.
पुण्याला जाणे शक्य नसल्याने या तरुणीने सोलापूर जिल्ह्यातील सांगोला इथे मावशीच्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र आधी होकार देणाऱ्या तिच्या पाहुण्यांनी कोरोनाच्या भीतीने इकडे येऊ नका, असा सल्ला तिला दिला. यामुळे आधीच संकट पार करुन कोलकाताहून अनोळखी लोकांसोबत आलेल्या तरुणीसमोर आता कुठे जायचा हा प्रश्न निर्माण झाला. पण या तरुणीची ही अडचण त्या गलाई व्यावसायिकाच्या लक्षात आली आणि त्यांनी त्या मुलीला आपल्या घरातच राहण्यास परवानगी दिली.
मागील 12 दिवसांपासून ही तरुणी गलाई व्यावसायिक अजित शिंदे यांच्या कुटुंबासोबत क्वॉरन्टाईन आहे. तिच्या आई-वडिलांनाही आपली मुलगी सुरक्षित असल्याचा विश्वास दिला गेला. तिचा क्वॉरन्टाईन कालावधी पूर्ण झाला की तिची तपासणी करुन तिला तिच्या आई-वडिलांकडे पुण्यात सोडण्याची तयारीही गलाई व्यावसायिकाने दर्शवली आहे.
कोरोनाच्या काळात नात्यांमधील ओलावा गळून पडावा, माणुसकीचा बांध उद्ध्वस्त व्हावा अशी उदाहरणे घडत आहेत. कोरोनाच्या भीतीने सख्खी नाती एवढी लांब का बरं जावी? हा अंतर्मुख करणारा प्रश्न आहे. कोरोनामुळे मुंबई-पुण्यासह अनेक भागातून आपल्या भागात येणाऱ्या लोकांचा लोंढा वाढतो आहे. मात्र त्यांना काही ठिकाणी स्वीकारलं जातंय तर काही ठिकाणी नाकारलं जात आहे.