CORONAVIRUS UPDATES | व्हाट्सग्रुपद्वारे कोरोना व्हायरससंदर्भात माहिती देण्यात येणार आहे : मुख्यमंत्री
LIVE
Background
देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...
पुण्यातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याची टेस्ट निगेटिव्ह
पुण्यातील पहिल्या दोन पॉझिटीव रुग्णांची चौदा दिवसानंतर टेस्ट केली असता ती निगेटिव्ह आली आहे. उद्या पुन्हा एकदा त्यांचे सॅपल्स टेस्टिंगसाठी पाठवले जातील. ते देखील निगेटिव्ह आल्यास या दोघांना सर्व सोपस्कार पुर्ण करून घरी सोडण्यात येईल. नऊ मार्चला हे दोघे पती पत्नी पॉझिटीव्ह ठरले होते. महाराष्ट्रात समोर आलेले कोरोना पॉझिटीव्ह ठरलेले हे पहिले रुग्ण होते. या दाम्पत्यासोबत त्यांची मुलीलाही कोरोनाची बाधा झाली आहे. सोबतच ज्या कॅबने ते मुंबईहून पुण्याला आले होते. त्या कॅबचा चालकालाही कोरोनाची लागण झाल्याचे सामोरे आले होते. दरम्यान, आता या दाम्पत्याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. तर, मुलगी आणि कॅब चालकावर अद्याप उपचार सुरू आहेत.
देशभरात आतापर्यंत 24 जण ठणठणीत
कोरोना व्हायरस आता वेगाने पसरत असून आता खेड्यापाड्यातही याचे रुग्ण आढळून आले आहेत. देशातील कोरोना रुग्णांचा आकडा आता चारशेहून अधिक झाला आहे. तर, महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. राज्यासह देशभरात सध्या लॉकडाऊन केलं आहे. यामुळे देशात एकप्रकारचे भीतीचे वातावरण पसरले आहे. यातच ही पॉझिटिव्ह बातमी आल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान देशात आतापर्यंत 24 जण कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्रात याअगोदर औरंगाबादमधील प्राध्यापिका कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यामुळे हा आजार पूर्णपणे बरा होतो, असे सराकारकडून सांगण्यात आले आहे.
सांगली जिल्ह्यात कोरोनाचे चार नवे रूग्ण
सांगलीच्या वाळवा तालुक्यातून चार प्रवासी सौदी अरेबिया येथे उमराह देवदर्शनासाठी गेले होते. हे चौघे नुकत्याच प्रवास करून परतले होते. त्यांचे रिपोर्ट आज जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झाले असून, या चारही प्रवाशांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 2 पुरुष आणि 2 महिला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली आहे. तसेच या चारही कोरोना बाधित रुग्णांच्यावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याचेही साळुंखे यांनी सांगितले आहे.