एक्स्प्लोर
शेतकरी संपावर : शेतकऱ्यांचा संप चौैथ्या दिवशीही सुरुच
मुंबई : विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेला संप चौथ्या दिवशीही सुरुच आहे. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत देण्यात आलेली आश्वासनं आपल्याला मान्य नसून आमच्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरु ठेवणार असल्याचं पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.
शेतकरी संप अजूनही सुरु ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला असला तरी आता राज्यातल्या बाजारपेठांमध्ये भाजीपाल्याची आवक सुरु झाली आहे. आज सकाळी नाशिक बाजारात 195 ट्रक भाजीपाला पोलिस बंदोबस्तात बाजार समितीत आणण्यात आला, तर शहराची गरज लक्षात घेता 95 टँकर दूधही बाजारात आणण्यात आलं.
भाजीपाला, दुधाच्या गाड्या अडवून त्यांची नासाडी करणाऱ्या तब्बल 150 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि त्यांची धरपकड सुरु आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत.
LIVE UPDATES :
#शिर्डी शेतकऱ्यांनी नगर-मनमाड महामार्ग अडवला, शेतकर्यांचं महामार्गावर प्रवरानगर फाटा येथे आंदोलन आणि रास्तारोको, फळे ,भाजीपाला , दूध रस्त्यावर ओतून निषेध, सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
#पुणतांबा येथे कोअर कमिटी आणि सरकारच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन, ग्रामपंचायत कार्यालयासमोर शेतकऱ्यांच मुंडन आंदोलन, जोरदार घोषणाबाजी करत मुंडन, पुणतांबा आणि बाहेर गावातून आलेले अनेक शेतकरी करतायत मुंडन
#धुळे : धुळ्यातील शेतकरी संपावर ठाम, सुरत-नागपूर महामार्गावरील लोणखेडी फाट्याजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको,
महामार्गावर अडवलेलं दूध गरम करुन रास्ता रोकोत अडकलेल्या वाहन धारकांना वाटून आंदोलकांनी शासनाचा केला निषेध.
नंदुरबार : शेतकरी संप : शहादा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलन करुन या सरकारचा निषेध केला
#इंदापूर : चौथ्या दिवशी शेतकऱ्यांचा संप सुरु, आजचा रविवारचा शहरातील आठवडे बाजार बंद. शेतकऱ्यांनी रस्त्यावर दुध व पालेभाजी फेकून सरकारचा निषेध केला.
शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना संपातून बाहेर, प्रदेशाध्यक्ष अनिल अवघट यांची घोषणा, गरज पडल्यास पुन्हा संप करण्याचे संकेत
#सोलापूर : जनहित शेतकरी संघटना आक्रमक, मोहोळचा आठवडी बाजार उधळून लावला. शेतकरी आणि व्यापाऱ्यांना संपात सहभागी होण्याचं आवाहन. भरलेला बाजार केला रिकामा.
#पंढरपूर तालुक्यातील अनेक गावात आजही कडकडीत बंद, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरासमोरील नामदेव पायरी जवळ विविध संघटनेचे टाळ वाजवा आंदोलन, भाविकांना दुधाचं वाटप
#पंढरपूर : आंबे, चळे, सरकोली, ओझेवाडी, रांझणी, गोपाळपुर, मुंढेवाडी, कोंडरकी या गावांमध्ये आजही कडकडीत बंद आहे. अफवांवर विश्वास ठेऊ ऩका, संप मिटला नाही, शेतकऱ्यांचे आवाहन
#शेतकरीसंपावर जालना-सिंदखेड राजा रस्त्यावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको, दोन तासांपासून वाहतूक ठप्प, गवळी पोखरी फाट्यावर शेतकऱ्यांनी रस्ता अडवला
#शेतकरीसंपावर औरंगाबाद पाचोड आठवडी बाजार बंद, तीन ठिकाणी आठवडी बाजार बंद
राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं
अहमदनगरला कर्जत तालुक्यात शेतकरी संघटना संपावर ठाम आहेत. जयाजी सुर्यवंशी आणि सदाभाऊ यांचा पुतळा शेतकऱ्यांनी जाळला. शेतमाल मार्केटला न पाठवण्याचा निर्धार करत दुधाचा टॅकर सोडून दिला आहे.
येवला : शेतकऱ्यांचा चौथ्या दिवशीही संप सुरुच असून आज येवला तालुक्यात अनेक गावांमध्ये आंदोलनं करण्यात आली. सकाळी सायगाव येथे सरकारची अंत्ययात्रा काढण्यात आली आणि रास्तारोको करण्यात आला. तर औरंगाबाद-नाशिक महामार्गावर गवंडगाव येथे शेकडो शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं, पाटोदा येथे शेतकऱ्यांनी दुध रस्त्यावर ओतून निषेध नोंदविला तर येवला-नांदगाव रस्त्यावर नगरसुल आणि मनमाड-येवला रस्त्यावर तांदुळवाडी फाटा येथे रास्ता रोको करण्यात आला.
शेतकरी संपाबाबत मुख्यमंत्री काय म्हणाले?
राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. पण काही लोकांना शेतकऱ्यांच्या नावानं राज्यात अराजक पसरवायचं आहे, असं सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, ”राज्यात काही लोकांना अराजक पसरवायचं आहे. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचा संप संपूच, नये असं वाटतं. म्हणून ते शेतकऱ्यांच्या आडून राजकरण करत आहेत. पण राज्य सरकार आपलं काम करत राहिल.”
शिवसेना आणि राजू शेट्टी यांनी शेतकरी संपाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ”राजू शेट्टींनी आत्मक्लेश यात्रा काढली. त्यावेळी त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन चर्चा करण्याची भूमिका घेतली. पण त्यांनी माझाशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली नाही. त्यांच्याच पक्षाचेच नेते सदाभाऊ खोत मंत्रिमंडळात असाताना त्यांनी ही भूमिका घेतली.”
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ”राज्य सरकारनं कित्येक पटीनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा मराठवाडा आणि विदर्भातील 80 टक्के अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणार आहे. तसेच ही कर्जमाफी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात पहिला मिळेल. शिवाय देशातील कोणत्याही राज्यातल्या राज्य सरकारने सरसकट कर्जमाफी दिलेली नाही,” असंही त्यांनी यावेळी स्पष्टं केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement