(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोरोना काळात चाकूरमधील अधिकाऱ्यांची ओली पार्टी; ग्रामस्थांकडून व्हिडीओ चित्रण, संबंधितांवर कारवाईची शक्यता
अभियंता प्रमोद कास्टवाड, दिवाबत्ती कर्मचारी मुकुंद मस्के, लिपिक व्यंकट सूर्यवंशी, नियंत्रण प्रमुख सचिन होलबे यांनी मटन आणि दारू पार्टी आयोजित केली होती. चाकूर शहराच्या बाहेरील एक हॉटेलमध्ये ही पार्टी सुरु होती.
लातूर : एकीकडे कोरोनाचा सामना करण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियम कडक करण्यात आले आहे. तर दुसरीकडे चाकूर नगरपंचायत येथील पाणी पुरवठा आणि स्वछता विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांची कोरोनाचे नियम मोडून सुरु असलेली मटन आणि दारु पार्टी गावकऱ्यांनी उघडकीस आणली आहे. या पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये संबंधित कर्मचारी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, अशी माहिती तहसीलदारांनी दिली आहे.
अभियंता प्रमोद कास्टवाड, दिवाबत्ती कर्मचारी मुकुंद मस्के, लिपिक व्यंकट सूर्यवंशी, नियंत्रण प्रमुख सचिन होलबे यांनी मटन आणि दारू पार्टी आयोजित केली होती. चाकूर शहराच्या बाहेरील एक हॉटेलमध्ये ही पार्टी सुरु होती. याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. कोरोना काळात नगरपंचायत कर्मचारी हे सर्व निर्बंध पायदळी तुडवत आहेत याची खातरजमा करावी म्हणून गावकरी तेथे गेले. त्यावेळी हॉटेलच्या आतील रूममध्ये हे सर्व कर्मचारी दारू पित आणि मटन खाताना आढळून आले.
काही तरुण मुलांनी या पार्टीचा व्हिडीओ शूट केला. यावेळी तेथील कर्मचारी आणि ग्रामस्थांमध्ये झटापट झाली. काही वेळात हे व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाले. ग्रामस्थानी या घटनेची लेखी तक्रार चाकूरचे तहसीदार शिवानंद बिडवे यांच्याकडे केली आहे. यातील दोषी लोकांवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन तहसील कार्यालयस प्राप्त झाले आहे.
चाकूर नगरपंचायतीचे मुख्यअधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्याशी पत्र व्यवहार करून यातील सत्य काय आहे याची चौकशी करावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. संबंधित अधिकारी, कर्मचारी दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती चाकूरचे तहसीलदार शिवानंद बिडवे यांनी दिली आहे.