Lingayat Mahamorcha : मुंबईत उद्या लिंगायत समाजाचा महामोर्चा, राज्यासह परराज्यातून लाखो समाज बांधव सहभागी होणार
Lingayat Mahamorcha : अखिल भारतीय लिंगायत समाज समन्वय समितीच्या वतीने उद्या (29 जानेवारी) मुंबई येथे महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात राज्यासह परराज्यातून लाखो समाज बांधव सहभागी होणार आहेत.
Lingayat Mahamorcha : अखिल भारतीय लिंगायत समाज समन्वय समितीच्या वतीने उद्या (29 जानेवारी) मुंबई येथे महामोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हा राज्यव्यापी महामोर्चा निघणार असून लाखो लिंगायत बांधव या मोर्चात सहभागी होणार आहेत. शिवाय या मोर्चात लिंगायत समाजामधील खासदार आणि आमदार देखील सहभागी होणार असणार असल्याची माहिती अखिल भारतीय लिंगायत समाज समन्वय समितीच्या वतीने देण्यात आली आहे. लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता द्यावी, केंद्र आणि राज्य सरकारने अल्पसंख्यांक दर्जा जाहीर करावा यासह इतर मागण्यांसाठी या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
लिंगायत समाजाच्या महामोर्चासाठी राज्यभरातून समाजबांधव मुंबईत दाखल होणार आहेत. सांगली जिल्ह्यातून सुमारे एक लाख लिंगायत बांधव सहभागी होणार आहेत, अशी माहिती लिंगायत महामोर्चा समन्वय समितीचे सांगली जिल्हा अध्यक्ष सुधीर सिंहासने यांनी दिली. याबरोबरच या मोर्चात धर्मगुरुंसह लिंगायत समाजातील सोलापूर जिल्ह्यातील नेते मंडळी देखील सहभागी होणार आहेत. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील दहा हजार लिंगायत समाजबांधव या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती लिंगायत समन्वय समितीचे राज्य महासचिव विजयकुमार हत्तुरे यांनी दिली.
या राज्यव्यापी मोर्चामध्ये राज्यातील लिंगायत बांधवांसह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातील लिंगायत समाज बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती लिंगायत समन्व्यय समितीने दिली. लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता द्यावी, राज्यातील लिंगायत धर्मीयांनाही अल्पसंख्यांक दर्जा जाहीर करावा, सोलापुरातील मंगळवेढा येथे मंजूरअसलेल्या महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकाचे काम त्वरित सुरु करण्यात यावे, महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे इत्यादी मागण्यासांठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे विजयकुमार हत्तुरे यांनी सांगितले.
Lingayat Religion Mahamorcha : काय आहेत मागण्या?
- लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता द्यावी
- राज्यातील लिंगायत धर्मियांना अल्पसंख्यांक दर्जा जाहिर करावा
- सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुका येथे मंजूर असलेल्या महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकाचे काम त्वरीत सुरु करण्यात यावे
- मुंबई येथील विधानभवन परिसरात महात्मा बसवेश्वरांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात यावा.
- महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे.
- गांव तेथे रुद्रभुमी ( स्मशानभुमी) आणि गांव तेथे अनुभव मंटप ( सभामंडप ) करण्यात यावे.
- लिंगायत समाजातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर वसतिगृह निर्माण करण्यात यावे.
- राष्ट्रीय जनगणनेत लिंगायतांसाठी स्वतंत्र कॉलम देण्यात यावे.
- वीरशैव लिंगायत व हिंदू लिंगायत अशी नोंद असलेल्यांचा ओबीसी घटकामध्ये समावेश नाही, त्यामुळे या घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि सरकारी नोकरीची संधी मिळत नाही. सरकारने शुध्दीपत्रक काढून ओबीसीमध्ये समावेश करावा.
महत्वाच्या बातम्या