(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Crop insurance | आधी पावसाचा फटका आता नुकसान अर्ज दाखल करण्यासाठी रांगा; बळीराजा मागचं शुक्लकाष्ठ संपेना
आधी पावसाच्या फटक्यामुळे त्रस्त झालेला शेतकरी आता नुकसान अर्ज (Crop insurance) दाखल करण्यासाठी रांगेत उभा आहे. परिणामी बळीराजा मागचं शुक्लकाष्ठ काही संपण्याचं नाव घेताना दिसत नाहीय.
लातूर : पावसाच्या जबर फटक्यामुळे राज्यातील 12 लाख हेक्टरवरील शेतीचे क्षेत्र बाधित झाले आहे. सर्वाधिक फटका बसला आहे तो मराठवाड्याला. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांच्या समस्येत आता आणखीन वाढ होताना दिसते आहे. नुकसानीचा अर्ज 72 तासांच्या आत करावा असं बंधन घालण्यात आलं आहे. आणि ही सगळी प्रक्रिया ऑनलाइन की ऑफलाइन असा संभ्रम निर्माण झाला आहे. दोन दिवस सलग येणाऱ्या सुट्ट्यांमुळे शेतकरी आता तालुक्याच्या ठिकाणच्या कार्यालयावर गर्दी करताना दिसतोय.
खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असतो. कोरडवाहू शेती करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांना खरीप हंगामातच उत्पन्नाची आशा असते. पावसाळ्याच्या तोंडावर पावसाने साथ दिली तद्नंतर मोठी उघडीप राहिली होती. पीक हातचे जाते का अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पावसाने दिलेली जोरदार साथ यावर आशा पल्लवित झाली होती. काहीच दिवसात पावसाने अक्षरशः झोडपून काढलं, हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला. यामुळे शेतकरी राजा आता बेजार झाला आहे. पिक विमा भरला आहे. मात्र, त्याच्या परताव्यासाठी नुकसानीचे अर्जही दाखल करावे लागणार आहेत.
ऑनलाइन प्रक्रिया किचकट आहे. ग्रामीण भागात याबद्दल योग्य माहिती उपलब्ध होत नाही. प्रशासनाचे किंवा पीक विमा कंपनीचे कर्मचारी प्रत्यक्ष फिल्डवर नाहीत. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. सरकारने 72 तासांची बंधने घातली आहेत. 72 तासांत नुकसानीचा अर्ज दाखल करावा लागत आहे. हे सर्व करण्यासाठी शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी यावे लागत आहे. सकाळपासून मोठ्या रांगा जिल्ह्यभरात अनेक ठिकाणी लागलेल्या पहावयास मिळत आहेत.
लाखो शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे. आता परताव्यासाठी शेतकरी धडपड करत आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी त्याला प्रचंड कष्ट घ्यावे लागत आहेत. पदरमोड करून तालुक्याच्या ठिकाणी येण्याचा खर्च, इथे आल्यानंतर अर्ज भरून घेण्यासाठीचे वीस रुपयांचा खर्च, कागदपत्रांच्या झेरॉक्स खर्च असा अंदाजे दोनशे ते तीनशे रुपयांचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागत आहे. हा खर्च फक्त शेतमालाच्या नुकसानीचा आहे. मात्र, पावसच्या पाण्यामुळे झालेलं इतर नुकसानीची बाब अद्याप यात गृहीत धरण्यात आली नाही. पिक विमा भरतना झालेला खर्च लक्षात घेता एक हजाराच्या घरात हा खर्च जात आहे.
शनिवार, रविवार असणाऱ्या सुट्टीमुळे नुकसान अर्ज भरण्याचा वेळ वाढवून द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे. उमरगा रेतु येथील शेतकरी दत्तू केंद्रे हे सकाळी सात वाजता जलकोट येथे अर्ज दाखल करण्यासाठी आले आहे 'मी सोयाबीन लावले होते चांगले पिक आले होते. मात्र, पावसाने 27 दिवस उघडीपी दिली, त्यानंतर पावसाने पाठ सोडली नाही पिक पिवळे पडले वाहून गेले, हातात काहीच राहिले नाही. पिक विमा भरला होता तो मिळविण्यासाठी आता नुकसान झाल्याचा अर्ज करावा लागतोय. अर्ज भरून घेण्यासाठी धावपळ, जमा करण्यासाठी रांगा नशिबी आले आहे. बोला आता आम्ही कोणाकडे जावं? असा संतप्त सवाल केला आहे. अशीच अवस्था हजारो शेतकऱ्यांच्या वाट्याला आली आहे.