Latur News : लग्नातील जेवणातून वऱ्हाडी मंडळींना विषबाधा; तीनशे जणांवर उपचार सुरु, लातूर जिल्ह्यातील घटना
Latur News Poisoning wedding meal : निलंग्यात विषबाधा झालेल्यांची संख्या 300च्या जवळपास झाली आहे. अजूनही यातील काही रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर काहींना औषधोपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.
Latur News : लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विवाह सोहळ्यातील जेवणातून तीनशे वऱ्हाडी लोकांना विषबाधा झाली आहे. त्यांच्यावर निलंगा उपजिल्हा रूग्णालय, अंबुलगा बु, देवणी तालुक्यातील वलांडी, जवळगा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. निलंगा तालुक्यातील केदारपूर काटेजवळगा येथील मुलीचा विवाह देवणी तालुक्यातील जवळगा साकोळ येथील मुलाशी झाला.
काल 22 तारखेला केदारपूर येथे थाटामाटात लग्न संपन्न झाले. लग्नासाठी केदारपूर काटेजवळगा, जवळगा ,अंबुलगा बु ,सिंदखेड यासह अनेक गावातून वऱ्हाडी लोक आले होते. भात, वरण, बुंदी, चपाती आणि वाग्यांच्या भाजीचा बेत होता. संध्याकाळनंतर ज्या ज्या त्या लग्नात जेवण केलं होतं त्यांच्या पोटात दुखायला सुरुवात झाली. पोट दुखणे ,उलट्या आणि जुलाब अशी लक्षणे असलेल्या रुग्णाची संख्या वाढण्यास सुरुवात झाली.
देवणी तालुक्यातील वलांडी प्राथमिक आरोग्य, निलंगा उपजिल्हा रूग्णालय, अंबुलगा बु येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, काटेवळगा आणि जवळगा येथील उपकेंद्र येथे रुग्ण दाखल होत होते. काही तासाच जवळपास अडीचशे ते तीनशे वऱ्हाडी उपचारासाठी दाखल झाले.
असं लक्षात आलं की या लग्नात ज्या लोकांनी वरण खाल्ले होते त्यांनाच फक्त विषबाधा झाली. ज्यांनी वरण खाल्ले नव्हते त्यांना काहीही त्रास झाला नाही. पोटात दुखत असल्याने आणि उलट्या होत असल्याने या सर्वांना मोठा त्रास सहन करावा लागला. अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक उपचारासाठी आल्यानं वैद्यकीय यंत्रणेची देखील मोठी धावपळ उडाली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
अबुलगा बु येथील वैद्यकीय अधिकारी डॉ नरेंद्र माकने यांनी सांगितलं की, आमच्या केंद्रात काल 70 रुग्ण आले होते. सगळ्यांना रुग्णास अन्नातून विषबाधा झाली होती. त्यांना योग्य तो औषध उपचार करण्यात आला. यात लक्षणे मध्यम स्वरूपाची आहेत. आतापर्यंत 250 पेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. अजूनही यातील काही रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर काहींना औषधोपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.