दिवंगत राजीव सातव यांच्या मुलाला ICSE दहावी परीक्षेत 98.33 टक्के गुण! सुप्रिया सुळेंचं भावनिक ट्वीट
पुष्कराजने कमर्शिअल स्टडिज आणि अर्थशास्त्रात पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. इंग्रजी विषयात इंग्रजी भाषामध्ये 90 तर इंग्रजी साहित्यमध्ये त्याने 100 असेल 95 टक्के गुण मिळवले.
मुंबई : इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स म्हणजेच सीआयएससीई मंडळाचे इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल आज दुपारी 3 वाजता जाहीर झाले. काँग्रेसचे नेते दिवंगत राजीव सातव यांचा मुलगा पुष्कराज याचाही दहावीला निकाल आज लागला. पुष्कराजने दहावीत 98.33 टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादित केलं आहे. मात्र या आनंदाच्या क्षणी आज वडील हवे होते, त्यांची उणीव पुष्कराज आणि संपूर्ण सातव कुटुंबियांना भासत असेल.
निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भावनिक ट्वीट करुन पुष्कराजला शुभेच्छा दिल्या. सुप्रिया सुळे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, "राजीव सातव आज असते तर त्यांना आपल्या मुलाचं यश पाहून खुप आनंद झाला असता. राजीव आणि प्रज्ञा यांचा मुलगा पुष्कराज याने इयत्ता दहावीच्या परीक्षेत (ICSE) 98.33 टक्के गुण मिळविले. त्याच्या या यशाबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन. पुष्कराज, खुप मोठा हो! आम्हा सर्वांना तुझा अभिमान वाटतो.".
राजीव सातव आज असते तर त्यांना आपल्या मुलाचं यश पाहून खुप आनंद झाला असता. राजीव आणि प्रज्ञा यांचा मुलगा पुष्कराज याने इयत्ता दहावीच्या परीक्षेत (ICSE) ९८.३३ टक्के गुण मिळविले. त्याच्या या यशाबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन.
— Supriya Sule (@supriya_sule) July 24, 2021
पुष्कराज, खुप मोठा हो ! आम्हा सर्वांना तुझा अभिमान वाटतो.
पुष्कराजने मिळवलेले गुण
पुष्कराजने कमर्शिअल स्टडिज आणि अर्थशास्त्रात पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. इंग्रजी विषयात इंग्रजी भाषामध्ये 90 तर इंग्रजी साहित्यमध्ये त्याने 100 असेल 95 टक्के गुण मिळवले. इतिहास आणि नागरिकशास्त्रात 98 आणि भुगोलमध्ये 100 असे एकूण 99 टक्के गुण मिळवले. कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्समध्ये पुष्काराजने 97 गुण मिळवले आहेत. अशारीतीने पुष्कराजने दहावीच्या परीक्षेत एकूण 99.33 टक्के गुण मिळवले आहेत.
काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं 16 मे 2021 रोजी निधन झालं. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचारादरम्यान राजीव सातव यांनी वयाच्या 47 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्याआधी दिवस त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र कोरोनावर त्यांची यशस्वीरित्या मात केली होती. मात्र त्यानंतर त्यांच्या शरीरात सायटोमेगॅलो हा नवीन व्हायरस आढळला होता. यामुळे त्यांच्या शरीरात इन्फेक्शन देखील झालं होतं, अशातच त्यांची प्राणज्योत मालवली.