Pune Sppu News : पुणे विद्यापीठ प्रशासनाचा मनमानी 'कारभार' चव्हाट्यावर, कुलगुरुंच्या घरासाठी लाखो रुपयांचा खर्च; बिलं 'माझा'च्या हाती
pune University : पुणे विद्यापीठ प्रशासानाचा मनमानी कारभार समोर आला आहे. विद्यापीठाच्या कुलगुरुंच्या घरासाठी लाखो रुपयांचा खर्च केला आहे. विद्यापीठ परिसरात कुलगुरुंचा बंगला आहे.
Pune Sppu News : पुणे विद्यापीठ (SPPU) प्रशासानाचा मनमानी कारभार समोर आला आहे. विद्यापीठाच्या कुलगुरुंच्या घरासाठी लाखो रुपयांचा खर्च केला आहे. विद्यापीठ (savitribai phule pune university) परिसरात कुलगुरुंचा बंगला आहे. त्या बंगल्यावर विद्यापीठ प्रशासनाने लाखो रुपये खर्च केले आहे. या सगळ्या खर्चाची बिलं एबीपी माझाच्या हाती लागली आहेत. गेल्या काही दिवसांपासून या मनमानी कारभाराची चर्चा सुरु होती. मात्र बिलांमुळे विद्यापीठाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. हा लाखोंचा खर्च कुलगुरूंच्या बंगल्याच्या रंगरंगोटी करण्यासाठी आणि त्यांच्या घरातील रोज उपयोगात येणाऱ्या वस्तुंच्या खरेदीसाठी करण्यात आला आहे.
पुणे विद्यापीठाला ऑक्सफोर्ड ऑफ ईस्ट म्हटलं जातं. देशातूनच नाही तर जगभरातून या विद्यापीठात विविध विभागात विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. आतापर्यंत अनेकांनी विद्यापीठाचं सर्वक्षेत्रास असलेल्या यशासाठी प्रयत्न केले. विविध विभागांमध्ये उत्तम शिक्षण आणि संशोधनासाठी प्रयत्न केले. पुर्वीच्या कुलगुरुंचा देखील विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवून दिला. मात्र सध्या कुलगुरु पदाची धुरा सांभाळत असलेल्या डॉ. कारभारी काळे यांच्यामुळे विद्यापीठाला गालबोट लागण्याची शक्यता आहे.
किरकोळ वस्तुंसाठी तब्बल 99 हजार रुपयांचा खर्च
माजी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांची निवृत्ती झाल्यानंतर त्यांनी काही महिन्यात त्यांचं निवासस्थान सोडलं होतं. त्यानंतर डॉ. कारभारी काळे यांच्याकडे प्रभारी कुलगुरु पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. काही दिवस काळे हे विद्यापीठातील विश्रामगृहात राहायला होते. त्यावेळी विद्यापीठ प्रशासनाने त्यांच्यासाठी सुमारे दीड लाख रुपयांची भांडी खरेदी केली होती. या सोबतच कुलगुरुंच्या घरासाठी महागडे बेडशीट आणि उशा देखील खरेदी करण्यात आल्या होत्या. घरात लागणाऱ्या दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या बेडशीट, टॉवेल, डोअर मॅट आणि इतर वस्तूंसाठी अतिप्रमाणात खर्च करण्यात आला. चादर आणि काही किरकोळ वस्तुंसाठी तब्बल 99 हजार रुपयांचा खर्च झाल्याचं बिलांवरुन स्पष्ट होत आहे.
या वस्तूंची केली होती खरेदी
डॉ. काळे यांच्यासाठी कप बशी सेट, चहा कप बॉक्स, कॉफी मग बॉक्स, टिफिन, किटली, स्पूल सेट, मल्टी कढई, आप्पे पात्र, मिक्सर, तवा, काचेचा ग्लास सेट, कुकर, खलबत्ता, फूड बास्केट, चॉपिंग बोर्ड, कुकर, कुकर पॉट, कॉफी शुगर सेट, दूध पिशवी, सीझलर तडका पॅन, तांब्या-फुलपात्र, सँडविच मेकर, सर्किंग सेट, सेलो बरणी, कांच बरणी, स्टील वाटी, स्टील थाळी, प्लेट ग्लास, टिश्यू पेपर अशा तब्बल 92 वस्तू खरेदी केल्या आहेत. जीएसटीसह या वस्तूंची किंमत 1 लाख 49 हजार 471 रुपये एवढी आहे.