Maharashtra News: प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन, कामगारांसाठी स्वतंत्र रुग्णालयं; कामगार मंत्री सुरेश खाडेंच्या मोठ्या घोषणा
Maharashtra News: प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन, कामगारांसाठी स्वतंत्र रुग्णालयं अशा अनेक मोठ्या घोषणा कामगार मंत्री सुरेश खाडेंनी केल्या आहेत.
Maharashtra News: आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्तानं पिंपरी चिंचवडमध्ये राज्यस्तरीय कामगारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी कामगार मंत्री सुरेश खाडे उपस्थित होते. याच कार्यक्रमात कामगार मंत्र्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणाही केल्या आहेत. यावेळी प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन, कामगारांसाठी स्वतंत्र रुग्णालयं, प्रत्येक तालुक्यात सेतू केंद्र, चौकाचौकात कामगार नाका शेडची उभारणी करण्यार असल्याचं कामगार मंत्री सुरेश खाडे (Suresh Khade) यांनी जाहीर केलं. तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणाही या कार्यक्रमात करण्यात आली. यावेळी पत्रकारांनी कामगार भरती प्रक्रियेबाबत, बरसू रिफायनरी प्रकल्प, फॉक्सकॉन प्रकल्प याअनुषंगाने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरंही सुरेश खाडे यांनी दिली.
कार्यक्रमात बोलताना राज्याच्या अर्थव्यवस्थेत कामगार महत्त्वाचा घटक असून कामगारांच्या कल्याणाला राज्य शासनाचे प्राधान्य आहे. राज्यातील सर्व कामगारांना योजनांचा लाभ मिळावा म्हणून प्रत्येक तालुक्यामध्ये सर्व प्रकारच्या कामगार नोंदणीसाठी कामगार सेतू नोंदणी केंद्र, नाक्यावरील कामगारांकरीता कामगार निवारा उभारणार असल्याचं कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सांगितलं आहे.
मंत्री सुरेश खाडे बोलताना म्हणाले की, कामगारांची किंमत ही खऱ्या अर्थानं कोरोना काळात सर्वांनाच समजली. प्रत्येक जिल्ह्यात 'कामगार भवन' बनवण्याची घोषणा मी आज करतोय. कामगारांच्या आरोग्यासाठी राज्यात सहा रुग्णालयं उभारली जाणार आहेत. काम करताना अनेक कामगार जखमी होतात, त्यांच्यावर उपचारासाठी ही रुग्णालय उपयोगी पडतील. तसेच, प्रत्येक तालुक्याला सेतू केंद्र सुरू करतोय, तिथं कामगारांच्या सर्व नोंदीसाठी त्यांना मदत होईल. चौकाचौकात उभे राहणाऱ्या कामगारांसाठी नाकाशेड उभारलं जाणार आहे, जेणेकरून काम मिळेपर्यंत ते त्या शेडमध्ये उभे राहतील.
पाहा व्हिडीओ : Suresh Khade Speech : Kamgar Din निमित्त आयोजित सन्मान सोहळ्यात सुरेश खाडेंचं भाषण
"कामगारांचा अपघात झाल्यावर त्यांचा कुटुंबाला आर्थिक मदत मिळण्यासाठी विमा कंपनीबाबत योजना तयार करण्यात येत आहे. सुरक्षा मंडळातील कर्मचारी, अर्धवेळ काम करणाऱ्या कामगाराला एक हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.", असंही सुरेश खाडे यांनी बोलताना सांगितलं. पुढे बोलताना कामगारांना शासनाच्या योजनांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले असून ही पुस्तिका सर्व तालुक्यात पोहोचविण्यात यावी. कामगारांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा उपलब्ध करुन देणार असून याकरिता या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींकडून सल्ला घेण्यात येईल. प्रामाणिकपणे काम करा, उद्योगवाढीसाठी प्रयत्न करा. उद्योग टिकला तर कामगार टिकेल असा संदेश देत त्यांनी कामगारांना नोंदणी करण्याचं आवाहनही मंत्री सुरेश खाडे यांनी केलं.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त पिंपरी चिंचवडमध्ये राज्यस्तरीय कामगारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अश्विनी जगताप, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल, कामगार आयुक्त सतिश देशमुख, महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाचे सचिव विवेक कुंभार, पुणे विभागाचे अपर कामगार आयुक्त शैलेद्र पोळ, कोकण विभागाचे अपर कामगार आयुक्त शिरीन लोखंडे, औद्योगिक सुरक्षा आणि जन आरोग्य संचालनालय पुणे विभागाचे संचालक एम. आर. पाटील, बाष्पके विभाग पुणे विभागाचे संचालक डी. पी. अंतापुरकर, कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे उपस्थित होते.