(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kunbi Records : कुणबी नोंदींसाठी मराठवाड्यातील प्रत्येक गावातील रेकोर्ड तपासले जाणार; मुख्यमंत्र्यांची माहिती
Maratha Reservation : त्यामुळे पुन्हा एकदा मराठवाड्यात मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहेत.
मुंबई : कुणबी नोंदी (Kunbi Record) शोधण्यासाठी आता मराठवाड्यातील (Marathwada) प्रत्येक गावातील शंभर टक्के रेकॉर्ड तपासण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली आहे. मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) मुंबईत झालेल्या शासकीय बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याशी व्हीसीद्वारे संवाद साधताना ही माहिती दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मराठवाड्यात मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहेत.
मराठा आरक्षणासंदर्भात मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह येथे मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठक झाली. या बैठकीत दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, मागासवर्ग आयोगामार्फत केल्या जाणाऱ्या या सर्व्हेक्षणाला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच पालिका आयुक्तांनी प्राधान्य द्यायचे असून आपापल्या जिल्ह्यात विशेष कक्षाच्या माध्यमातून कालबद्धरितीने सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण करायचे आहे. सर्व्हेक्षण करण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्नावली पाठवण्यात आली असून बिनचूक काम झाले पाहिजे. मराठा समाजाचे शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी हे सर्व्हेक्षण उत्तम रीतीने होणे गरजेचे आहे. तसे झाल्यास सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे आपल्याला बाजू मांडता येईल. सर्व्हेक्षणाव्यतिरिक्त इतर माहिती देखील संकलित करणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मागासलेपण सिद्ध करण्यासाठी बिनचूक सर्व्हेक्षण आवश्यक
मराठा आरक्षणाचा कायदा रद्द करतांना सर्वोच्च न्यायालयाने त्रुटी उपस्थित केल्या होत्या. आता आपण करीत असणारे सर्व्हेक्षण बिनचूक आणि निर्दोष असणे गरजेचे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, न्यायालयात क्युरेटीव्ह याचिकेवर देखील सुनावणी होणार आहे. त्यामुळे मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी हे सर्व्हेक्षण चांगल्या पद्धतीने होणे गरजेचे आहे हे जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांनी लक्षात ठेवावे. सर्व्हेक्षणाचे महत्व लक्षात घेता प्रगणकांची संख्याही वाढवावी तसेच त्याना सर्व्हेक्षणाबाबत उत्तम प्रशिक्षण द्यावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
न्या शिंदे यांच्या शिफारशीवर चर्चा
यावेळी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी विशेषत: मराठवाड्यात कुणबी नोंदी अधिक प्रमाणात मिळण्यासाठी केलेल्या शिफारशींवर देखील बैठकीत चर्चा झाली. हैद्राबाद येथे कुणबी नोंदीसंदर्भात उपलब्ध कागदपत्रांचा डिजिटल व इतर डेटा लवकरात लवकर उपलब्ध करून घ्यावा तसेच मोडी, फारशी, उर्दू कागदपत्रांचे भाषांतर वेगाने करून ते संकेत स्थळांवर अपलोड करावे जेणे करून सर्व संबंधितांना ते सहजपणे पाहता येईल व त्यांच्या कामी येऊन कुणबी प्रमाणपत्रे मिळण्यासाठी त्याचा उपयोग होईल असेही निर्देश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिले.
बैठकीत यांची उपस्थिती...
या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, समितीचे सदस्य मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, दिलीप वळसे पाटील, शंभूराज देसाई, आमदार बच्चू कडू, निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे, निवृत्त न्यायमूर्ती मारोती गायकवाड, महाधिवक्ता बिरेंद्र सराफ, विविध विभागांचे सचिव त्याचप्रमाणे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्ह्यांचे जात पडताळणी अधिकारी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! आंतरवाली सराटीत एकही कुणबी नोंद नाही; जरांगेंचं कुटुंब आरक्षणापासून वंचित राहणार?