कृष्णेतून वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागात सोडणार; जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची घोषणा
कोयना धरणातून सातत्याने सुरु असलेला विसर्ग आणि कृष्णा नदी काठच्या भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर वाहून जाणारे पाणी जिल्ह्यातील दुष्काळी सिंचन योजनेला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली.
सांगली : पूरस्थिती निर्माण होण्याच्या पार्श्वभूमीवर वाहून जाणारे पाणी जिल्ह्यातील दुष्काळी सिंचन योजनेला देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. अगदी सोलापूर जिल्ह्यापर्यंत ते पाणी पोहोचेल आणि त्या ठिकाणचेही तलाव भरून घेण्यात येतील, असा विश्वास जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. सांगलीत एबीपी माझाशी बोलताना जयंत पाटील यांनी ही माहिती दिलीय.
संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्यातल्या अलमट्टी धरण प्रशासनासोबत आम्ही संपर्क ठेवून आहोत. दुसऱ्या बाजूला राज्यातील धरणातील पाण्याचेही नियोजन करण्यात येत असल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले आहे. उद्यापासून जिल्ह्यातील टेंभू आणि म्हैसाळ योजना सुरू करून तलाव भरण्यात येणार असल्याचे पुराच्या काळात वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाला द्यावे अशी अनेक वर्षांपासून मागणी होती. यंदा पूर येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने आम्ही यानिमित्ताने दुष्काळी भागाला पुराचे वाहून जाणारे पाणी देण्याचे आश्वासन पूर्ण करत आहोत, असेही पालकमंत्री पाटील म्हणाले. सांगलीत आज संध्याकाळपर्यंत 35 फुटापर्यंत पाणी वाढण्याची शक्यता असून पाणी पातळी 35-36 फुटापर्यंत ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील. यासाठी कोयना, चांदोली धरणातील विसर्ग आणि अलमट्टी धरणातील विसर्ग यात ताळमेळ ठेवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केलंय.
कृष्णा, वारणा नदीकाठाला यंदाही पुराचा धोका!
पाणी पातळी रविवारी सायंकाळपर्यंत 35 फुटांवर पोहोचेल
गेल्या तीन-चार दिवसांपासून सांगली, सातारा, कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी असणारे धरणे भरत आहेत, त्या पार्श्वभूमीवर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सध्या सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा नदीची पाण्याची पातळी ही संततधार पाऊस आणि कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे वाढत आहे.
पाण्याची पातळी रविवारी सायंकाळपर्यंत 35 फुटांवर पोहोचेल, अशी माहिती राज्याचे जलसंपदा तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. रविवारी दुपारपर्यंत कृष्णा नदीची पाण्याची पातळी 26 फुटांवर पोहोचली होती. मात्र, कृष्णा क्षेत्रात आणि कोयना धरणात पावसाची संततधार कायम आहे. परिसरातही पावसाचा जोर आहे, त्यामुळे धरण भरल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तर दुसर्या बाजूला हे पाणी दुष्काळी भागाला देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सांगली जिल्ह्यातल्या ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू सिंचन योजना येत्या दोन दिवसात सुरु करण्यात येणार असून या योजनेच्या माध्यमातून दुष्काळी भागातील तलाव भरून घेण्यात येणार आहेत.
Vishroli Dam | डोळ्याची पारणे फेडणारी दृश्य; अमरावतीच्या विश्रोळी पूर्णप्रकल्पाचा नजारा