Ganesh Utsav 2022 : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वेच्या गाड्यांचे आरक्षण फुल्ल
कोकण रेल्वे गाड्यांचे गणेशोत्सवाच्या काळातील आरक्षण फुल्ल झालं आहे. कोकणात जाणाऱ्या गाड्याच्या आरक्षणाचा प्रयत्न करताच प्रतीक्षा यादी अधिक झाल्याने रेल्वेने आरक्षण देणेच बंद केले आहे.
सिंधुदुर्ग : कोकणातील सर्वात मोठा आणि आवडता सण म्हणजे गणेशोत्सव. याच गणेशोत्सवाला मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात येतात. मात्र कोकणात येणाऱ्या कोकण रेल्वे गाड्यांचे गणेशोत्सवाच्या काळातील आरक्षण फुल्ल झालं आहे. 26 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान अनेक गाड्यांच्या सर्व श्रेणीतील आसने आरक्षित झाली आहेत.
कोरोनाच्या निर्बंधांमुळे मागील दोन वर्षात गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावाकडे जाता न आल्यामुळे चाकमान्यांनी यंदा उत्सव सुरु होण्याआधीच कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचं तिकीट आरक्षित केले आहे. कोकणात जाणाऱ्या गाड्याच्या आरक्षणाचा प्रयत्न करताच प्रतीक्षा यादी अधिक झाल्याने रेल्वेने आरक्षण देणेच बंद केले आहे.
काही गाड्यांना तर मोठ्या प्रमाणात प्रतीक्षा यादी असल्यामुळे यंदा मध्य रेल्वे, कोकण आणि पश्चिम रेल्वेला मोठ्या प्रमाणात जादा गाड्या सोडाव्या लागतील. तर एसटी महामंडळालाही तसे नियोजन करावे लागणार आहे. दरवर्षी गणेशोत्सवासाठी मुंबईसह अन्य भागातून तीन ते चार दिवस आधीच कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यासाठी कोकण रेल्वे गाड्यांचे आरक्षण चार महिने आधीच फुल्ल झालं आहे.
कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याने यंदाचा गणेशोत्सव नेहमीच्या पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या वर्षी गणपती बाप्पाचे आगमन 31 ऑगस्टला होणार आहे. यंदा गणेश चतुर्थी 31 ऑगस्ट रोजी आहे. यादिवसापासून गणेशोत्सवाची सुरुवात होत आहे. कोरोनाचे निर्बंध उठवल्यानंतर गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे तिकिटांचे बुकिंग एप्रिल महिन्याअखेरीस सुरु झाले आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.
कोकणात शिमगा आणि गणेशोत्सव हे दोन सण पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्यामुळे शहरी भागातला चाकरमानी हा हमखास आपली कामं सोडून किंवा कामावरच्या सुट्ट्या घेऊन तो गणपतीला आणि शिमग्याला हजेरी लावतो. कोरोनामुळे मागील दोन वर्षे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करायला मिळाला नव्हता. मात्र, यंदाच्या वर्षात कोरोनाचं विघ्न दूर झालं असून अनेकांनी आधीच तिकीट बुक केल्याने कोकण रेल्वेचे आरक्षण फुल्ल झालं आहे.