Alphonso Mango : कोकणचा राजा हापूसचं शुक्लकाष्ठ कायम; वाढत्या उष्णतेमुळे फळगळ
मागील दोन वर्षे आलेली निसर्ग आणि तोक्ते वादळ, वातावरणातील बदल, अवकाळी पाऊस, लांबलेली थंडी यांमुळे हापूसच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. आता चाळीशी पार गेलेला उन्हाचा पारा हापूससाठी मारक ठरत आहे.
रत्नागिरी : हापूस! कोकणचा राजा. या हापूसची ख्याती जगभरात. अगदी मार्चपासून बाजारात मिळणाऱ्या हापूसची प्रत्येक जण मोठ्या आतुरतेने वाट पाहतो. हापूसमुळे होणारी आर्थिक उलाढाल देखील मोठी. पण, हाच हापूस सध्या संकटांच्या मालिकेतून बाहेर पडताना काही दिसत नाही. मागील दोन वर्षे आलेली निसर्ग आणि तोक्ते वादळ, वातावरणातील बदल, अवकाळी पाऊस, लांबलेली थंडी यांमुळे हापूसच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. परिणामी, शेतकऱ्यांना औषधं आणि फवारणीसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चात देखील वाढ झाली. पण, हे सारं केल्यानंतर देखील हापूसवरचं संकट काही टळताना दिसत नाही. कारण, चाळीशी पार गेलेला उन्हाचा पारा याच हापूसकरता मारक ठरत असल्याचं शेतकरी सांगतात.
मागील चार ते पाच दिवस कोकणातील वातावरण उष्ण आहे. परिणामी सुपारी आणि बोराच्या आकाराची झालेली फळं आता देठ सुकत असल्याने गळून पडत आहेत. उन्हामुळे फळांवर डाग पडू नयेत म्हणून फवारणी करावी लागत असल्याने खर्चात देखील वाढ झाली आहे. अचानक उष्णतेमध्ये वाढ झाली आणि हापूसला मोठा फटका बसत आहे. दरम्यान, अशाच प्रकारे उन्हाच्या कडाक्यात वाढ झाल्यास फळगळ वाढण्याची देखील शक्यता आहे. उष्णतेमुळे पुनर्मोहरामुळे तयार झालेल्या फळाला देखील फटका बसण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत.
यंदा हापूसची काय स्थिती?
मुळात अपेक्षेपेक्षा उशिराने हापूस तयार झाला. अर्थात त्याला कारण होतं ते वातावरणातील बदल आणि लांबलेली थंडी. मुख्य बाब म्हणजे दरवर्षी जवळपास 35 ते 40 हजार पेट्या बाजारात दाखल होतात. पण. यंदा साधारण 15 हजाराच्या आसपास पेट्या बाजारात पाठवल्याची आकडेवारी सांगितली जात आहे. त्यातील बहुतांश हापूस हा देवगडचा आहे. दरम्यान, या हापूसला वर्गवारीप्रमाणे भाव मिळत आहे. परिणामी काही शेतकऱ्यांचं आर्थिक गणित देखील चुकलं आहे.
कसं असतं वर्षभराचं नियोजन?
मुख्य बाब म्हणजे हापूस उत्पादन घेताना शेतकरी किंवा बागायतजार त्याचं नियोजन हे वर्षभराचं करतात. हापूसचा सीझन संपल्यानंतर पावसाळ्यामध्ये बागेची निगा राखली जाते. त्यासाठी काही कामगार वर्ग देखील बागेत राबत असतो. खतांपासून ते साफसफाईपर्यंतचं नियोजन यावेळी केलं जातं, थंडी आल्यानंतर मोहोर प्रक्रियेला सुरुवात होते. यावेळी देखील वातावरणाचा अंदाज घेत फवारणीला प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे केवळ तीन-चार महिनेच नाही तर वर्षभर या साऱ्या बाबींचं नियोजन हापूस उत्पादक शेतकरी आणि बागायतदार करत असतो. पण, हे सारं करताना वातावरणातील बदल आणि वातावरणाची साथी देखील बळीराजाला गरजेची असते.