Kolhapur : विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी तपासणीसाठी आलेले दहावीचे पेपर परत पाठवले
विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकांनी यंदा दहावीचे पेपर तपासणार नसल्याची भूमिका घेतली आहे. राज्यभरातील 25 हजार तर कोल्हापुरातील जवळपास अडीच हजार शिक्षक आंदोलनात सहभागी झाले आहेत.
![Kolhapur : विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी तपासणीसाठी आलेले दहावीचे पेपर परत पाठवले Kolhpaur News Non aided school teachers sent back SSC answer sheets which came for checking Kolhapur : विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी तपासणीसाठी आलेले दहावीचे पेपर परत पाठवले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/27/6ffd586505f054841565d69d41af9fc9_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कोल्हापूर : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक आक्रमक झाले आहेत. यावर्षी दहावीचे पेपर तपासणार नसल्याची भूमिका या शिक्षकांनी घेतली आहे. तपासणीसाठी आलेले पेपरचे गठ्ठे देखील या शिक्षकांनी परत पाठवले आहेत. विनाअनुदानित शाळांना शंभर टक्के अनुदान आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांना सेवा संरक्षण या मुख्य मागण्यांसाठी हा बहिष्कार टाकण्यात आला आहे.
राज्यभरातील 25 हजार तर कोल्हापुरातील जवळपास अडीच हजार शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. विनाअनुदानित आणि अंशत: अनुदानित शाळांना पूर्ण अनुदान द्यावं यासह अन्य मागण्यांसाठी या शिक्षकांनी वारंवार आंदोलनं केली आहेत. मात्र सरकारकडून त्याची दखल घेतली जात नसल्याने शिक्षकांनीही पेपर तपासणार नसल्याची भूमिका घेतली आहे. शिक्षकांच्या या भूमिकेमुळे दहावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
राज्यभरातील साडे सहा हजार शाळांमध्ये बोर्डाचे पेपरचे गठ्ठे तपासणीविना पडून असून शिक्षक बोर्डाचे पेपर तपासायला तयार नाहीत. विनाअनुदानित शाळा कृती समितीने 24 फेब्रुवारी रोजी आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतरही कुठल्याही प्रकारची मागणी मान्य न झाल्याने हे सर्व शिक्षक बहिष्कारावर ठाम आहेत.
दरम्यान पेपर तपासण्यासाठी नकार देणाऱ्या शिक्षकांना कारवाईची नोटीस पाठवण्यात आली आहे. मात्र कोणतीही कारवाई झाली तरी जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत पेपर तपासणार नाही, अशी ठाम भूमिका या शिक्षकांची आहे.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेचे निकाल जाहीर होतात. बोर्डाचे विषयावार पेपर झाल्यानंतर लगेच शिक्षक पेपर तपासणीला सुरुवात करतात. मात्र दहावी आणि बारावीचे सहा ते सात पेपर होऊन सुद्धा अद्याप विनाअनुदानित शिक्षकांनी एकही पेपर तपासायला घेतलेला नाही.
त्यामुळे शिक्षकांच्या पेपर तपासणीच्या बहिष्कारामुळे दहावीचे निकाल वेळेत जाहीर होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)