Kolhapur North bypoll : काँग्रेस आमदाराच्या निधनाने पोटनिवडणूक, शिवसेनेचे माजी आमदार लढण्यासाठी सज्ज, भाजपही चाचपणी
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आणि सगळेच पक्ष एका रात्रीत कामाला लागले आहेत. 12 एप्रिल रोजी मतदान होणार असून 16 एप्रिल रोजी त्याची मतमोजणी होणार आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आणि सगळेच पक्ष एका रात्रीत कामाला लागले आहेत. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तर मतदारसंघांमध्ये ही पोटनिवडणूक लागली आहे. 12 एप्रिल रोजी मतदान होणार असून 16 एप्रिल रोजी त्याची मतमोजणी होणार आहे. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल असं वाटलं होतं, मात्र सगळेच पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत.
दोन टर्म आमदार राहिलेल्या शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांचा पराभव करुन काँग्रेसचे चंद्रकांत जाधव आमदार झाले होते. मात्र आमदारकी मिळाल्यानंतर अवघ्या दोन वर्षातच त्यांचे निधन झाल्याने कोल्हापूर उत्तर मतदारसंघात पुन्हा एकदा निवडणूक लागली आहे. काँग्रेसकडून जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांची उमेदवारी जवळपास निश्चित केली आहे. तशा पद्धतीने तयारी देखील सुरु आहे.
मात्र त्याच वेळी शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. "पक्ष जो आदेश देईल त्याचे पालन केले जाईल. मात्र कोल्हापूरच्या जनतेला या ठिकाणी पुन्हा एकदा शिवसेनेचाच आमदार हवा आहे," असं राजेश क्षीरसागर यांनी म्हटलं आहे.
नुकताच शिवसेनेचा एक मेळावा कोल्हापूरमध्ये पार पडला. त्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवावी, अशी मागणी केली. कार्यकर्त्यांची ही भावना उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवली जाईल, असं संघटन मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे..
भाजपने देखील आपल्या उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. त्याबाबत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील घेण्यात येत आहेत. भाजपकडून उमेदवारीसाठी सत्यजित कदम यांचे पारडे जड मानले जाते.
ही निवडणूक बिनविरोध व्हावी याच्यासाठी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील हे प्रयत्न करत आहेत. याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी याआधीच बोलून दाखवलं आहे. मात्र हे यशस्वी होईल का हा खरा प्रश्न आहे.
2019 साली काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला तर शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला. या दोघांमध्येच लढत झाली. त्यामुळे आता शिवसेना देखील उमेदवारीवर दावा करत आहे. तर भाजपने जोरदार टक्कर देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तरवर कुणाचा झेंडा फडकणार हे पाहावं लागणार आहे.