(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur IT Raids : आयकर विभागाचा मोर्चा कोल्हापूरकडे, अर्जुनवाडमध्ये छापेमारी, साखर कारखान्याच्या भागीदारीवरुन चौकशी सुरु
आज आयकर विभागाचे पथक कोल्हापुरात दाखल झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्जुनवाडमध्ये आयकर विभागानं छापेमारी केली आहे.
Kolhapur IT Raids : आयकर विभागाकडून ( Income Tax Department) महाराष्ट्रात विविध ठिकाणी छापेमापी (Raids) सुरु आहे. गुरुवारी आयकर विभागानं राज्यात 24 ठिकाणी छापे टाकले होते. त्यानंतर आज आयकर विभागाचे पथक कोल्हापुरात दाखल झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्जुनवाडमध्ये आयकर विभागानं छापेमारी केली आहे. साखर कारखान्याच्या भागीदारीवरुन आयकर विभागाकडून कसून चौकशी केली जात आहे. सोलापूर, पंढरपूरसह अन्य ठिकाणी साखर कारखान्यांवर पडलेल्या छाप्यांच्या साखळीत कोल्हापुरातील भागीदारांच्या निवासस्थानावर हा छापा टाकण्यात आला आहे.
गुरुवारी अभिजीत पाटलांच्या साखर कारखान्यांवर छापेमारी
गुरुवारी आयकर विभागानं राज्यातील 24 ठिकाणी छापेमारी केली होती. त्यानंतर आता आयकर विभागानं आता आपला मोर्चा कोल्हापूरकडे वळवला आहे. कोल्हापुरातील अर्जुनवाडमध्ये आयकर विभागानं छापेमारी केली आहे. दरम्यान, काल साखर कारखानदारी क्षेत्रातलं एक मोठं नाव असलेल्या अभिजीत पाटील (Abhijeet Patil ) यांच्या साखर कारखान्यांवर आयकर विभागानं (Income Tax Department) धाडी टाकल्या होत्या. सकाळी साडेसहा वाजल्यापासून चार साखर कारखान्यांची तपासणी सुरु केली होती. पंढरपूरचे मूळ रहिवासी असलेले अभिजीत पाटील हे एक बडं प्रस्थ समजले जाते. पाटील यांनी एकापाठोपाठ एक असे चार साखर कारखाने विकत घेतले आहेत. या ठिकाणीच आज आयकर विभागाची पथकं दाखल झाली होती. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
सोलापूरमध्येही छापेमारी
सोलापुरातील प्रसिद्ध व्यावसायिक बिपीनभाई पटेल यांच्या मेहूल कन्सट्रक्शन या ठिकाणी काल सकाळी आयकर विभागाचे पथक दाखल झाले होते. आयकर विभागाच्या पुणे येथील पथकाच्या माध्यमातून मेहूल कन्स्ट्रक्शनच्या कागदपत्रांची तपासणी अधिकाऱ्यांनी केली. सोबतच बिपीनभाई पटेल संचालक असलेल्या सोलापूर शहरातील कुंभारी परिसरात असलेल्या अश्विनी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज या ठिकाणी देखील आयकर विभागाचे पथक दाखल झाले होते. सोलापुरातील दोन प्रसिद्ध हृदयरोग तज्ञांच्या रुग्णालयात देखील काल आयकर विभागाचे अधिकारी दाखल झाले होते. सोलापुरातील सात रस्ता परिसरात असलेल्या डॉ. गुरुनाथ परळे यांच्या स्पंदन हार्ट क्लिनिक याठिकाणी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली होती. तसेच सोलापुरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ अनुपम शहा यांच्या हॉस्पिटलवर देखील आयकर विभागाने छापा टाकला होता. तसेच सोलापुरातील प्रसिद्ध रघोजी किडनी अँड मल्टीस्टेट हॉस्पिटलमध्ये देखील आयकर विभागानं तपासणी केली आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी जालन्यात स्टील व्यावसायिकांवर आयकर विभागाने कारवाई केली होती. या कारवाईसाठी जाताना आयकर विभागाचे अधिकारी जणू लग्नाच्या वरातीप्रमाणे गेले होते. वाहनांवर लग्नाचे स्टिकर लावून अधिकाऱ्यांनी कारवाई केली होती. काल महाराष्ट्रातील विविध भागात सुरु असलेल्या धाडसत्रांमध्ये सहभागी अधिकाऱ्यांच्या वाहनांवर कृषी अभ्यास शिबिराचे पोस्टर लावण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या:
- Solapur IT Raids : सोलापुरातही आयकर विभागाचे धाडसत्र, प्रसिद्ध रुग्णालयांची तपासणी केल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ
- Abhijeet Patil : अभिजीत पाटलांच्या साखर कारखान्यांवर आयकर विभागाच्या धाडी, चार कारखान्यांची तपासणी सुरु