Ichalkaranji : इचलकरंजी ही महाराष्ट्रातील 28 वी महापालिका घोषित, राज्य सरकारची घोषणा
इचलकरंजीचे रुपांतर महापालिकेत करावे यासाठी गेली अनेक वर्षे मागणी होती. आता या मागणीला यश मिळाले आहे.

कोल्हापूर: इचलकरंजी नगरपालिकेचे रुपांतर आता महापालिकेत होणार असून तशी घोषणा करण्यात आली आहे. इचलकरंजी आता राज्यातील 28 वी महापालिका घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील महापालिकांची संख्या आता दोनवर पोहोचली आहे.
राज्य शासनाच्या वतीने इचलकरंजी महानगरपालिकेची घोषणा करण्यात आली आहे. इचलकरंजीची ओळख ही महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर अशी आहे. वस्त्रोद्योगासाठी इचलकरंजी हे प्रसिद्ध असून लोकसंख्याही मोठी आहे. त्यामुळेच इचलकरंजी ही महानगरपालिका घोषित करावी यासाठी अनेक वर्षे मागणी सुरू होती. आता इचलकरंजी महानगरपालिकेच्या या पाठपुराव्याला यश आलं आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांना राज्य शासनाकडून नव्या इचलकरंजी महापालिकेच्या मान्यतेचे पत्र मिळाले आहे.
इचलकरंजी हे शहर कोल्हापूर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरात मोठी आर्थिक उलाढाल होते. या शहरावर राजकीय वर्चस्व असावं अशी इच्छा प्रत्येक पक्षाची आहे. त्यामुळेच सर्वच पक्षाकडून यासाठी प्रयत्न केले जातात. या शहराची लोकसंख्याही मोठी आहे. सर्वच राजकीय पक्षाच्या अजेंड्यावर हा मुद्दा होता, सर्वांच्या निवडणूक जाहीरनाम्यातही या मुद्द्याचा समावेश होता.
या शहरात नगरपालिका असून त्याचे रुपांतर महापालिकेत करण्यात यावेत यासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्न सुरू आहेत. आता या प्रयत्नांना यश आले असून या नगरपालिकेचे रुपांतर आता महापालिकेत होणार आहे. राज्यात या आधी 27 महापालिका होत्या. आता इचलकरंजीच्या रुपात 28 व्या महापालिकेची भर यात पडणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Rashmi Shukla : संजय राऊत यांचे फोन रश्मी शुक्ला स्वत: ऐकायच्या, 'साहेब' असा उल्लेख झाल्यास विशेष लक्ष
- अभिमानास्पद! साताऱ्याच्या लेकीनं सर केले जगातील तिसरे उंच कांचनगंगा शिखर
- WHO On Covid Death: कोरोनामुळे भारतात 47 लाख लोकांचा मृत्यू, WHO च्या दाव्यावर केंद्र सरकारचा आक्षेप
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
