'किसान रॅली'साठी गेलेल्या कोल्हापूरच्या शेतकऱ्याचा दिल्लीत मृत्यू
किरण गौरवाडे असं या 52 वर्षीय मृत शेतकऱ्याचं नाव आहे. किरण यांच्या मृत्यूच्या घटनेमुळे टाकळीवाडी गावातील ग्रामस्थांनी गाव बंद करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
कोल्हापूर : दिल्लीत आयोजित केलेल्या 'किसान रॅली'साठी गेलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याचा पहाडगंज येथील आंबेडकर भवनच्या चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. किरण गौरवाडे असं या 52 वर्षीय मृत शेतकऱ्याचं नाव आहे.
कोल्हापूरच्या टाकळीवाडी गावचे किरण शांतापा गौरवाडे बुधवारी गावाहून मीरजमधील ट्रेनने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या इतर कार्यकर्त्यांसह शेतकरी आंदोलनासाठी दिल्लीला गेले. दिल्लीतील आंदोलनातही ते सहभागी झाले होते. दरम्यान पहाडगंज येथील आंबेडकर भवनाच्या तिसऱ्या मजल्यावरून तोल गेल्याने ते खाली पडले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी सकाळी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
किरण यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
किरण यांची गावात 4 एकर शेती आहे. आपल्या मुलाबरोबर ते शेती करत होते. मात्र या शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने त्यांच्यावर 5 लाखाचे कर्ज देखील होते. या कर्जाच्या विवंचनेत ते असायचे. 2008 सालच्या कर्जमाफीतून त्याचे नाव वगळले होते. त्यामुळे शेतकरी आंदोलनात त्यांचा नेहमी सहभाग असायचा. किरण यांच्या मृत्यूच्या घटनेमुळे टाकळीवाडी गावातील ग्रामस्थांनी गाव बंद करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.