(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur Airport: 'कोल्हापूर विमानतळाचे 'महालक्ष्मी' नाहीतर 'छत्रपती राजाराम महाराज विमानतळ' असेच नामकरण' : भागवत कराड
कोल्हापूर विमानतळाच्या नामकरणाचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयास सादर केला आहे. यानुसार विमानतळाचे नामकरण हे 'छत्रपती राजाराम महाराज विमानतळ' असेच होणार आहे.
Kolhapur Airport : राज्यातील औरंगाबाद, शिर्डी, कोल्हापूर या तीन विमानतळांचे नामकरण करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. लवकरच या विमानतळांचे नामकरण होणार आहे. दरम्यान, कोल्हापूर विमानतळाच्या नामकरणाचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयास सादर केला आहे. यानुसार विमानतळाचे नामकरण हे 'छत्रपती राजाराम महाराज विमानतळ' असेच होणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली आहे. महालक्ष्मी नावाचा चुकून उल्लेख झाला असावा असे स्पष्टीकरण यावेळी कराड यांनी दिले.
दरम्यान, कोल्हापूरमधील संत एकनाथ रंगमंदिर येथे आयोजित केंद्रीय अर्थसंकल्पावरील द़ृष्टिक्षेप या कार्यक्रमानंतर डॉ. कराड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. देशातील 13 विमानतळांच्या नामकरणाचे प्रस्ताव आले आहेत. ते प्रस्ताव या मंत्रालयाने प्रधानमंत्री कार्यालयास सादर केले आहेत. देशात आणखी काही विमानतळांच्या नामकरणाचे प्रस्ताव आहेत का, अशी विचारणा पुन्हा पीएम कार्यालयाने केली आहे. त्यामुळे अजूनही या प्रस्तावांबाबत राज्यांकडे विचारणा केली जात असल्याचे कराड यावेळी म्हणाले. राज्यातील औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज, शिर्डीच्या विमानतळाला साईबाबा असे नाव देण्यात येणार असल्याचे कराड म्हणाले.
कोल्हापूर विमानतळाबाबत राज्याने छत्रपती राजाराम महाराज यांच्या नावाचा प्रस्ताव सादर केला आहे. जो प्रस्ताव राज्य सरकारने पंतप्रधान कार्यालयास दिला आहे, त्यानुसारच नामकरण होणार आहे. महालक्ष्मी नावाचा चुकून उच्चार झाला असावा, हे नामकरण 'छत्रपती राजाराम महाराज विमानतळ' असेच होणार असल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले. महाराष्ट्रातून ज्या तीन विमानतळांच्या नामकरणाचे प्रस्ताव आले आहेत. यामध्ये औरंगाबाद, कोल्हापूर आणि शिर्डी या तीन प्रस्तावांचा समावेश आहे. कोल्हापूरच्या विमानतळाला 'छत्रपती राजाराम महाराज विमानतळ', औरंगाबादेतील चिकलठाण्याचे 'छत्रपती संभाजी महाराज विमानतळ' आणि शिर्डीतील साईबाबा यांच्या नावाने विमानतळाचे नामकरणाचे प्रस्ताव आहेत. या प्रस्तावांवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार असल्याचेही कराड यांनी सांगितले.
विमानतळाचे नामांतर करण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून सातत्याने मागणी होत आहे. यापूर्वी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई असे करण्यात आले आहे. या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तर कोल्हापूर विमानतळाला 'छत्रपती राजाराम महाराज विमानतळ' नाव देण्यात यावे, अशी मागणी कोल्हापूरकरांची आहे.
महत्त्वाच्या बातम्या: