छत्रपती वृषालीराजे भोसलेंची एन्ट्री अन् उदयनराजेंचे साताऱ्यातील सर्व कार्यक्रम रद्द, कोण आहेत वृषालीराजे?
Shiv Jayanti In Satara: आज वृषालीराजे भोसले (Vrushaliraje Bhosale) यांनी साताऱ्यातील पोवईनाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक करुन त्यांना वंदन केले
Shiv Jayanti In Satara: आज शिवजयंतीच्या निमित्तानं अचानक साताऱ्यातील छत्रपती शिवाजीराजे (Chhatrapati Shivajiraje) यांची मुलगी वृषालीराजे भोसले (Vrushaliraje Bhosale) यांनी साताऱ्यातील पोवईनाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक करुन त्यांना वंदन केले. यावेळी वृषालीराजे भोसले यांचा मुलगा कौस्तुभ आदित्यराजे हेही उपस्थित होते. अचानक या वाड्यातील हे दोन व्यक्ती छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा अभिषेक करण्यासाठी आल्यामुळे छत्रपती उदयनराजेंनी (chhatrapati Udyanraje) त्यांच्या नियोजित सर्व कार्यक्रमांकडे पाठ फिरवली. उदयनराजेंच्या हस्ते पोवईनाक्यावरील छत्रपती शिवरायांच्या याच पुतळ्याचा अभिषेकही करण्यात येणार होता.
कोण आहेत छत्रपती वृषालीराजे भोसले
छत्रपती सुमित्राराजे भोसले यांची प्रतापसिंहराजे भोसले, अभयसिंहराजे भोसले, विजयसिंहराजे भोसले आणि लहान शिवाजीराजे भोसले ही चार मुले. यातील विजयसिंहराजे भोसले हे लंडनला असतात तर उर्वरीत तीनही मुल साताऱ्यात राहतात. त्यातील एक जलमंदीर स्व.प्रतापसिंहराजे भोसले आणि त्याचा मुलगा उदयनराजे भोसले तर सुरुची बंगला येथे स्व. अभयसिंहराजे भोसले आणि त्यांचा मुलगा शिवेंद्रराजे भोसले आणि एक वाडा जो कधीच राजकारणात दिसला नाही तो म्हणजे अदालत वाडा. त्यात छत्रपती शिवाजीराजे भोसले आणि आणि त्यांची कन्या छत्रपती वृषालीराजे भोसले राहतात. वृषालीराजे यांचा विवाह नाशिक येथील राजे घराण्यात करण्यात आला होता. मात्र वृषालीराजे यांच्या मातोश्री चित्रलेखा भोसले यांच्या निधनानंतर त्या सध्या त्यांच्या कौस्तुभआदित्यराजे यांच्यासह याच अदालत वाड्यात वास्तवाला आहेत. छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्ताने आज वृषालीराजे या अदालत वाड्यातून बाहेर पडल्या.
छत्रपती वृषालीराजे भोसले म्हणतात...
छत्रपती वृषालीराजे भोसले यांनी म्हटलं की, छत्रपती शिवरायांच्या घरात आमचा जन्म झाला. आम्हाला खूप अभिमान आहे. ते आमचे दैवत आहेत. भारतीयांनी जाणलं पाहिजे की जनतेचा राजा हाच खरा राजा. महाराजांच्या सिध्दांतात सेल्फ डिसिप्लिन, आजच्या पिढीला पुढचं ध्येय ठेवणे खूप गरजेचे आहे. तरच देश पुढे जाईल. नुसते अभिषेक न करता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवले पाहिजेत. तरच सर्वांचा विकास होईल. त्यांचे सिध्दांत जसे होते तसेच जर प्रत्येकाने ठेवले तर देश पुढे जाईल. सातारकरांना माझी कशी मदत होईल हे माझे ध्येय आहे. त्यांच्या ज्या समस्या आहेत. रोडच्या समस्या आहेत. पाण्याच्या समस्या आहेत. छोट्या छोट्या समस्या आहेत. या मदतीला मी पुरेशी मदत करु शकले तर मी मनाला मानेन, असं त्यांनी म्हटलं.