Kokan Rain: रायगड, रत्नागिरीत आज अतिवृष्टीचा इशारा; दोन्ही जिल्ह्यांतील सर्व शाळांना सुट्टी
Kokan Rain: रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Kokan Rain: गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने (Rain) चांगलाच जोर धरला आहे. कोकण पट्ट्यात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यात आज पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला हवामान विभगाने रेड अलर्ट जारी केल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळा, महाविद्यालयांना बुधवारी (26 जुलै) सुट्टी देण्यात आली आहे. नागरिकांनी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि सुरक्षित स्थळी राहावं, असं आवाहन देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे.
दोन दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा
बंगालच्या उपसागरात कमी दाबचा पट्टा तयार झाल्याने आज राज्यात पावसाचा जोर अधिक वाढणार आहे. पुढचे 48 तास अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. रायगड, रत्नागिरी आणि खेडमध्ये रात्रीपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून आज रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे.
अनेक भागांत पावसाचा जोर वाढला
मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांत काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे आणि यामुळे अनेक भागांत पाणी साचलं आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र झाल्याने मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा या विभागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील दोन दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील विविध भागांत पावसाचा अलर्ट जारी
सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर, ठाण्यासह मुंबईत आज ऑरेंज अलर्ट कायम आहे. या ठिकाणच्या काही भागांच आज मुसळधार पाऊस पडू शकतो.
मुंबईत पावसाचा वाहतुकीवर परिणाम
मुंबईसह ठाणे परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे काही भागात पाणी साचलं आहे, त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईच्या अंधेरी सबवेत पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे बंद करण्यात आला आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस
पुणे जिल्ह्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. धरण परिसरात सुरु असलेल्या पावसाने धरणांच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग मुठा नदीच्या पात्रात सुरू करण्यात आला आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून धरण क्षेत्रामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणं भरली आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI