(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; 'माझे पप्पा' भावनिक निबंध लिहिणाऱ्या चिमुकल्याला धनंजय मुंडेंचा मदतीचा हात
बीडच्या मंगेश वाळके या दहा वर्षाच्या मुलाने हयात नसलेल्या वडिलांवर लिहिलेला भावनिक निबंध व्हायरल झाला होता. याची दखल आता बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी घेत मदतीचा हात दिला आहे.
बीड : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाळकेवाडी या छोट्याशा गावातील चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या मंगेश वाळके या विद्यार्थ्याचा 'माझे पप्पा' हा अत्यंत भावनिक निबंध व्हायरल झाला होता. मंगेशचं हे पत्र व्हायरल होऊन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यापर्यंत पोहोचलं. या पत्राची दखल आता धनंजय मुंडे यांनी घेतली आहे. छोट्या मंगेशच्या डोक्यावर वडिलांचे छत्र नसून आई दिव्यांग आहे. त्यामुळे मंगेशच्या कुटुंबियांना सामाजिक न्याय विभागांतर्गत दिव्यांग कल्याण निधीतून अर्थसहाय्य व इतर मदत मिळणार आहे.
'माझे पप्पा काही दिवसांपूर्वी टीबीच्या आजाराने वारले. मी पाण्यात बुडत असलेली गाय कशीबशी बाहेर काढली. आम्हाला कुणीही मदत करत नाही. मला व आईला चोरांची भीती वाटते. पप्पा मला तुमची खुप आठवण येते, अशा अत्यंत भावनिक शब्दात मंगेशने आपल्या व्यथा शाळेतील निबंधाच्या वहीत मांडल्या होत्या.
मंगेशच्या वडिलांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे. त्याच्या आई शारदा वाळके या दिव्यांग आहेत. कुटुंबात कुणीही कमावते नसल्याने माय-लेकरांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. मंगेशच्या दाटलेल्या भावना पाहून त्याच्या शिक्षिकेने तो निबंध इतरांना पाठवून मदतीचं आवाहन केलं होतं. त्यानंतर हा निबंध सोशल मीडियावर व्हायरल झाला. गेल्या दोन दिवसांपासून विविध माध्यमात या निबंधाची जोरदार चर्चा सुरू होती.
दरम्यान राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ समाज कल्याण विभागामार्फत 'दिव्यांग बीज भांडवल योजना अंतर्गत दीड लाख रुपये स्वयंरोजगारासाठी अर्थ सहाय्य, जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कल्याण निधीतून शेष 5 टक्के, बस पास, यूडीआयडी कार्ड, तसेच दिव्यांग महामंडळामार्फत रोजगारासाठी अर्थसहाय्य आदी योजना लागू करून वाळके परिवारास भरीव आर्थिक मदत करण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. मंगेश व त्याच्या परिवाराला सहाय्य मिळेल हे आता निश्चित झालं असून धनंजय मुंडे यांची सामाजिक संवेदनशीलता या घटनेतून पुन्हा एकदा दिसून आली आहे.
Special Report | लोकल प्रवासाचा शीण दूर करणारे सलीम शेखच्या बासरीचे आनंददायी सूर | ABP Majha