एक्स्प्लोर
Advertisement
आधी पवारांचा मुका, मग सडकून टीका
नांदेड: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांचे सन्मान सोहळे होत आहेत. मात्र नांदेडमध्ये काल झालेला सत्कार सोहळा चांगलाच चर्चेत आहे.
या कार्यक्रमात शेकापचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार केशवराव धोंडगे यांनी थेट व्यासपीठावरच शरद पवारांचा मुका घेतला. याप्रकारामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
महत्त्वाचं म्हणजे या प्रकारानंतर शरद पवारांनीही मिश्किलपणे त्यावर प्रतिक्रिया दिली.
पवार म्हणाले, "बरं झालं त्यांनी जाहीर कार्यक्रमात मुका घेतला. मला घरी सांगता तर येईल ते केशव धोंडगेच होते. अन्यथा पंचाईत झाली असती".
VIDEO: केशवराव धोंडगे यांचं संपूर्ण भाषण ऐकण्यासाठी क्लिक करा
काय आहे संपूर्ण प्रकरण?
नांदेड विद्यापीठातर्फे शरद पवार यांना मानद डी लिट पदवी देवून सन्मानित करण्यात आले. रविवारी हा कार्यक्रम झाला.
त्यानंतर शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीस 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नांदेड नगरीत त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेकापचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार तथा स्वातंत्र्य सेनानी केशवराव धोंडगे यांची उपस्थितीत होती.
यावेळी केशवरावांनी त्यांच्या शैलीप्रमाणे शरद पवार यांचा भर व्यासपीठावर मुका घेतला.
पवारांच्या उपस्थितीत सडकून टीका
केशवराव धोंडगे यांना मण्याड खोर्यातील बुलंद तोफ म्हणून ओळखले जाते. धोंडगे हे 95 वर्षांचे आहेत. कुणाचीही कसलीही भीडभाड न बाळगता आपले मत व्यक्त करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत.
शरद पवारांच्या सत्कार सोहळ्यात धोंडगे यांनी पवारांवर थेट तोफ डागली. पवारांमध्ये किती आणि कोणते अवगुण आहेत हे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे व्यासपीठावर शरद पवार उपस्थित असताना पवारांना स्वतःबद्दल इतकी जहरी टीका ऐकण्याचा हा पहिलाच प्रसंग असावा.
धोंडगे म्हणाले, "शरद पवारांची बारामती म्हणजे भानामती आहे. पवार माणसं फोडण्यात अत्यंत कुशल आहेत. कुणाच्या घरातील माणूस केव्हा फोडतात याची कुणकुण लागू देत नाहीत. नारदमुनीदेखील पवारांची बरोबरी करु शकत नाही. पवार म्हणजे बिना चिपळ्याचे नारदच आहेत.
इतकंच नाही तर मराठवाड्याच्या विकाससाठी विधीमंडळचे अधिवेशन औरंगाबादेत घेण्याच्या मागणीसाठी शरद पवारांनी फिरवाफिरवी केली. पवारांचे सख्खे भाऊ शेकापमध्ये होते त्यांनाही पवारांनी बुडवले. आणीबाणीच्या काळात पवारांनी सत्ता सोडली असती, तर चित्रा बदलले असते. पण पुन्हा सत्ता मिळण्याची खात्री नसल्याने पवार सत्तेला चिकटून बसले, असा हल्लाबोल केशवराव धोंडगे यांनी पवारांच्या उपस्थितीत केला.
पवारांना एवढ्या डिलीट पदव्या मिळतात, ते काय लोणचं घालणार आहेत का, असा टोमणाही धोंडगेंनी लगावला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement