KDMC : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, दोन मृत व्यक्तींसह आठ सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या बदल्या
केडीएमसी महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी 17 मार्च 23 रोजी चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश स्वतः सहीनिशी आदेश काढला. या आदेशाची प्रत एबीपी माझाच्या हाती लागली आहे.
KDMC : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा (Kalyan-Dombivli Municipal Corporation) भोंगळ कारभार समोर आला आहे. 17 मार्च 2023 रोजी काढलेल्या चतुर्थ श्रेणी कामगारांच्या बदल्यांच्या आदेशात मृत कर्मचाऱ्यांसह सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्याचे समोर आले आहे. केडीएमसी महापालिका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या आदेशाची प्रत माझाच्या हाती लागली आहे
केडीएमसी महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी 17 मार्च 23 रोजी चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश स्वतः सहीनिशी आदेश काढला. या आदेशाची प्रत एबीपी माझाच्या हाती लागली आहे. या आदेशानुसार आयुक्त दांगडे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सामान्य प्रशासन उपायुक्तांशी बोला असे सांगण्यात आले आहे.
ऑर्डर आम्ही काढलीच नाही, सामान्य प्रशासन उपायुक्त अर्चना दिवे यांचा दावा
सामान्य प्रशासन उपायुक्त अर्चना दिवे यांनी झालेली चूक मान्य करण्याऐवजी आम्ही आदेशच काढला नसल्याचे सांगितले. 17 तारखेला बदल्याच्या आदेश काढले होते. त्या बदल्यांचे आदेश इशू करण्याआधीच ती चूक आमच्या लक्षात आली होती. त्या ऑर्डर आम्ही काढलेल्या नव्हत्या. आमच्या लक्षात आल्यावर त्याच दिवशी नवीन आदेश काढण्यात आले. ज्या बदल्या होतील त्या नवीन ऑर्डर प्रमाणे होतील. मात्र ती ऑर्डर आम्ही काढलीच नसल्याचे सामान्य प्रशासन उपायुक्त अर्चना दिवे यांनी सांगितले.
ऑर्डरवर महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांची सही कशी?
प्रत्यक्षात प्रभाग अधिकाऱ्यांकडून सफाई कामगारांची यादी महापालिकेकडे पाठवली जाते. त्यानंतर महापालिकेकडून या यादीवर शिक्कामोर्तब केलं जातं. यादी पाठवणाऱ्या तसेच यादीवर सह्या करणाऱ्या अधिकाऱ्यांनी या नावांची शहानिशा का केली नाही? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. जर उपायुक्त अर्चना दिवे यांनी 17 मार्चची ऑर्डर आम्ही काढलीच नसल्याचे सांगतात तर या ऑर्डरवर महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांची सही कशी? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. झालेली चूक मान्य करण्याऐवजी आम्ही आदेश काढलाच नाही असे खोटे बोलून वेळ मारून नेण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :