Kartiki Ekadashi : पंढरपूरमध्ये मराठा समाजाचे आंदोलन मागे, पाच मागण्या मान्य; उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार पूजा
Kartiki Ekadashi 2023 : पंढरपूरमध्ये मराठा समाजाचे आंदोलन मागे घेतल्याने आता कार्तिकी एकादशीची शासकीय पूजा पार पडणार आहे.
पंढरपूर, सोलापूर : कार्तिकी एकादशीला पंढरपूरमध्ये (Pandharpur) विठ्ठल मंदिरात उपमुख्यमंत्र्यांना शासकीय पूजा न करू देण्याचा इशारा मराठा समाजाने (Maratha Community) दिला होता. मात्र, प्रशासनाकडून सुरू असलेल्या सततच्या चर्चेनंतर आता मराठा समाजाने आंदोलन मागे घेतले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांना विठुरायाची पूजा करता येणार आहे. मराठा समाजाच्या आंदोलकांनी प्रशासनासमोर पाच मागण्या केल्या होत्या. त्या मागण्यांवर सकारात्मक उत्तर सरकारकडून आल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांना पूजा न करू देण्याचे आंदोलन मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते शासकीय पूजा पार पडणार आहे. या दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत 30 मिनिटे चर्चा करणार आहेत.
गेल्या काही दिवसापासून मराठा आंदोलकांच्या भूमिकेमुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. मात्र, सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूरमध्ये येताच प्रशासनाची सूत्रे वेगाने हालू लागली. एका बाजूला उपमुख्यमंत्र्यांच्या महापूजेवरून मराठा आंदोलकांमध्ये दोन गट पडले असताना दुसऱ्या बाजूला आदिवासी कोळी समाजानेही उपमुख्यमंत्र्यांनी कोणत्याही परिस्थितीत पंढरपुरात न येऊ देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे पुन्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती. त्यानंतर प्रशासनाने मराठा आरक्षण आंदोलकांच्या सगळ्या गटांसोबत चर्चा केली.
मराठा समाजातील विविध गट एकत्र आल्याने तिढा सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मराठा आंदोलकांसोबत सोमवारी रात्री उशिरा संपलेल्या बैठकीत दोन्ही गट एकत्र आले. या बैठकीत खूप सकारात्मक चर्चा झाल्याने मंगळवारी, 21 नोव्हेंबर रोजी प्रशासनासोबत एकत्रित मराठा समाजाच्या शिष्टमंडळासोबत बैठक झाली.
मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळाकडून पाच मागण्या
मराठा आरक्षण आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत जिल्हाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत शिष्टमंडळाने पाच मागण्या समोर ठेवल्या. या मागण्यांबाबत विचार करण्यासाठी आणि सरकारसोबत चर्चा करण्यासाठी प्रशासनाने थोडा वेळ मागून घेतला. त्यानंतर काही वेळाने पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलकांसोबत बैठक पार पडली. त्यात प्रशासनाने मागण्या मान्य असल्याचे सांगितले. प्रशासनाच्या या माहितीनंतर मराठा आंदोलक गणेश महाराज जाधव यांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली.
>> 'त्या' पाच मागण्या कोणत्या?
> मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या मनोज रंगे पाटील यांना दिलेल्या 24 डिसेंबर 2023 त्या मुदतीत मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे.
> पंढरपूर शहर व तालुक्यात अनेक ठिकाणी जुन्या दप्तरातील जन्म आणि जात नोंदणी सापडून येत नाहीत. सदर जुनी दप्तर उपलब्ध करून मोडी व उर्दू लिपीच्या माहितगारांची शासनाने नियुक्त करावी.
> पंढरपूर शहरामध्ये शासकीय अथवा नगरपालिकेच्या जागेत मराठा भवन इमारतीची उभारणी करावी.
> पंढरपूर येथे मराठा मुले व मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृह उभारण्यात यावे.
> सारथी संस्थेचे पंढरपूर येथे उपकेंद्र उभारण्यात यावे.