(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kartiki Ekadashi 2021 : उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपुरात शासकीय पूजा; नांदेडमधील निळा गावचं दाम्पत्य मानाचे वारकरी
Kartiki Ekadashi 2021 : विठुरायाच्या पंढरपुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पहाटे विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. नांदेडचे वारकरी टोणगे दाम्पत्य यावेळी मानाचे वारकरी ठरले.
Kartiki Ekadashi 2021 : Pandharpur : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर पहिल्यांदाच आज कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात वैष्णवांचा मेळा भरला आहे. विठुरायाच्या पंढरपुरात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज पहाटे विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. नांदेड जिल्ह्यातले वारकरी कोंडीबा देवराम टोणगे आणि त्यांच्या पत्नी प्रयागबाई हे दाम्पत्य यावेळी मानाचे वारकरी ठरले. यावेळी कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांसोबत पूजा करण्याचा मान मिळालेले कोंडीबा टोणगे आणि त्यांच्या पत्नी प्रयागबाई हे दाम्पत्य गेली 30 वर्षे पंढरपूरची वारी करत आहेत. टोणगे दाम्पत्य नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील निळा गावचे ते रहिवासी आहेत.
एबीपी माझाशी बोलताना टोणगे दाम्पत्य म्हणाले की, "गेली 30 वर्ष पंढरपूरची वारी करत आहोत. संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून दर्शन रांगेत उभे होतो. कोरोना प्रादुर्भावामुळे विठुरायाचं दर्शन घेता आलं नाही. त्यामुळे दर्शनाची आस होती. आषाढीलाही वारीला आलो होतो. पण दर्शन झालं नाही. त्यामुळे नामदेव पायरीचं दर्शन घेऊन गेलो होतो. कार्तिकी निमित्त देवाला एकच साकडं की, सुख-शांती नांदू देत आणि कोरोना निघून जाऊ देत." प्रयागबाई टोणगे म्हणाल्या की, "दर्शनासाठी ज्यावेळी रांगेत उभे राहिलो तेव्हा अजिबात अपेक्षा नव्हती की, उपमुख्यमंत्र्यांसोबत देवाची पूजा करण्याचा मान मिळेल. देवाकडे कोरोना जाऊ देत आणि सर्वांना सुख मिळू देत, एवढंच मागणं आहे."
आज कार्तिकी एकादशी निमित्त कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर पहिल्यांदाच पंढरपूर विठुरायाच्या नामघोषानं दुमदुमून निघालं आहे. पंढरपूर विठुरायाच्या पंढरपुरात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज पहाटे विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. नांदेड जिल्ह्यातले वारकरी कोंडीबा देवराम टोणगे आणि त्यांच्या पत्नी प्रयागबाई हे दाम्पत्य यावेळी मानाचे वारकरी ठरले. कोरोनामुळे गेल्या वर्षी कार्तिकी वारी होऊ शकली नव्हती. तब्बल दोन वर्षांनी कार्तिकी वारीचा सोहळा आज पंढरपुरात पार पडतोय. त्यामुळे वारकऱ्यांचे पाय पंढरपूरकडे वळलेत, असं असलं तरी एसटीच्या संपाचं सावट या यात्रेवर आहे आणि नेहमी एसटीनं पंढरपुरात दाखल होणाऱ्या वारकऱ्यांची संपामुळे गैरसोय झाली आहे. तरीही मिळेल त्या वाहनानं वारकरी पंढरपुरात दाखल झालेत. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पुन्हा एकदा गजबजलं आहे.
दरम्यान, कोरोनाचं सावट आल्यानंतर पंढरीचे वारकारी काही वाऱ्यांपासून वंचित राहिले. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानं यंदा कार्तिकीचा सोहळा पार पडतोय. लॉकडाऊननंतर पंढरपूरची आषाढी वारी आणि कार्तिकी वारी (Kartiki Ekadashi 2021) यांवरही निर्बंध लादण्यात आले होते. पंढरपूर यात्रेची आस लागलेल्या वारकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. यावर्षी कार्तिकी यात्रेला जिल्हाधिकाऱ्यांनी सशर्त परवानगी दिली आहे. नियम आणि अटींचं पालन करून आज 15 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी यात्रेचा मुख्य सोहळा साजरा करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली. त्यामुळे गेली दोन वर्षे यात्रेची प्रतीक्षा करणाऱ्या वारकऱ्यांना यावेळी पंढरपूरच्या यात्रेला जाता येणार आहे. या यात्रेला किमान 5 ते 6 लाख भाविक येतील अशी अपेक्षा असून त्या दृष्टीनं दर्शन व्यवस्था करण्यात आलीय. कार्तिकी वारीच्या निमित्तानं पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी 24 तास खुलं राहणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :