Kalyan: कल्याणमध्ये रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर प्रसूती; मनसे आमदार राजू पाटील भडकले
Kalyan News: महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला घेण्यास नकार दिल्यानंतर रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच महिलेची प्रसूती झाली, या प्रकरणी मनसे आता चांगलीच आक्रमक झाली आहे.
कल्याण: महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात कर्मचारी नसल्याने एका गरोदर महिलेला प्रशासनाने दाखल करुन घेतलं नाही. पोलीस (Police) आणि नागरिकांनी विनवणी केल्यानंतरही रुग्णालय प्रशासनाने महिलेकडे लक्ष दिलं नाही, यानंतर महिलेची रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच प्रसूती (Delivery) झाली. या घडलेल्या प्रकारानंतर मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) चांगलेच भडकले आहेत, त्यांनी रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.
"कारवाई न केल्यास मनसे स्टाईलने जाब विचारणार"
रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर महिलेची प्रसूती झाल्यानंतर ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे, असं मनसे आमदार राजू पाटील म्हणाले. सगळे गेंड्याच्या कातडीचे झाले असल्याची प्रतिक्रिया राजू पाटलांनी दिली. स्वतःच्या नावापुढे डॉक्टर असलेले आयुक्त झाले आहेत, तर इथले खासदार हेच डॉक्टर आहेत. मात्र तरीही लोकांच्या आरोग्याची नड काय आहे याची नस त्यांना सापडली नसल्याचं राजू पाटील यांनी म्हटलं. दोषींना निलंबित करतील किंवा नाही हा त्यांचा प्रश्न. मात्र येत्या दोन दिवसांत घडलेल्या घटनेविरोधात कारवाई केली नाही, तर मनसे स्टाईलने जाब विचारणार असल्याचा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी दिला आहे.
नक्की काय घडलं?
कल्याणमध्ये शनिवारी (10 सप्टेंबर) रात्री स्काय वॉकवर एका महिलेला प्रसूतीच्या वेदना सुरु झाल्या. हे बाजूने वावरत असलेल्या नागरिकांनी पाहिलं आणि याची माहिती त्वरित पोलिसांना दिली. पोलिसांनी महिलेला हमालांच्या मदतीने तातडीने हातगाडीवर टाकलं आणि पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात आणलं. मात्र रुक्मिणीबाई रुग्णालयाने या महिलेची प्रसूती करुन घेण्यास नकार दिला. पोलिसांनी विनंती करुनही डॉक्टरांनी ऐकलं नाही. अखेर रुग्णालयाच्या दारातच महिलेची प्रसूती झाली. या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेनंतर रुग्णालयाच्या गलथान कारभाराविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
घडलेल्या घटनेची चौकशी सुरू
या घटनेनंतर खडबडून जाग आलेल्या महापालिका प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली आहे. घटनेच्या चौकशीअंती कारवाई करण्याचे संकेत पालिका उपायुक्तांनी दिले आहेत. घटनेवेळी उपस्थित असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचं, वैद्यकीय अधिकारी आणि घटनेशी संबंधित लोकांचं स्टेटमेंट घेणं सुरू असल्याची माहिती पालिका उपायुक्तांनी दिली. उपस्थितांकडून प्रकरणाची माहिती घेत सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं. या घटनेचा मनसेकडून निषेध नोंदवण्यात आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
ठाण्यात इमारतीची लिफ्ट कोसळून मोठी दुर्घटना; मृतांचा आकडा वाढला, सात मजुरांचा दुर्दैवी मृत्यू