Jitendra Awhad: ट्रक चालकांच्या भूमिकेला पूर्ण पाठिंबा, राक्षसी कायद्याला विरोध: जितेंद्र आव्हाड
कित्येक वेळा चुकीच्या पद्धतीने रस्ता ओलांडणाऱ्याला वाचवताना अपघात घडतो आणि त्यात चालक दगावतात, याची जबाबदारी कोणावर? असा सवाल देखील आव्हाडांनी यावेळी उपस्थित केला
Truck Driver Strike : हिट अँड रन कायद्याविरोधात (New Hit and Run Law) ट्रान्सपोर्ट युनियनच्यावतीनं संप (Transport Union Strike) पुकारण्यात आला आहे. हिट अँड रन कायद्याविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्वीटद्वारे सरकारवर टीका केली आहे. ट्रक चालकांच्या भूमिकेला पूर्ण पाठिंबा असून राक्षसी कायद्याला विरोध असल्याचे आव्हाड म्हणाले.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, केंद्र सरकारने जे कायद्यामध्ये बदल केले आहेत. त्यामध्ये अपघातात जर कोणी मरण पावले तर वाहनचालकाला दहा वर्ष कैद आणि दहा ते पंधरा लाख रूपये दंड, अशी शिफारस करण्यात आली आहे. मूळात अपघात कसा झाला? अपघाताला जबाबदार कोण? याची कुठलीही तपासणी करण्याची तरतूद यामध्ये ठेवलेली नाही. एकतर जेवढ्या ट्रकचालकांची गरज आहे. त्यापेक्षा 40% कमी ट्रकचालक भारतात उपलब्ध आहेत. असे जर राक्षसी कायदे करण्यात आले तर कुणीही ट्रकचालक म्हणून काम करण्यास तयार होणार नाही. हाच कायदा पुढे कार चालकांनाही लागू होणार आहे.
चुकीच्या पद्धतीने रस्ता ओलांडला आणि अपघात झाल्यास शिक्षा कुणाला देणार?
एखाद्याने चुकीच्या पद्धतीने रस्ता ओलांडला अन् अपघात झाला तर शिक्षा रस्ता ओलांडणाऱ्याला की ट्रकचालकाला द्यायची? सर्व अपघात हे वाहनचालकांच्या चुकीमुळेच होतात, हे म्हणणे कितपत योग्य आहे. म्हणजेच भारतीयांना फक्त जेलचीच भीती दाखवायची, एवढेच काम आता सरकारचे उरले आहे. यात व्यावहारिक दृष्टिकोन ठेवायचाच नाही, ही कुठली पद्धत आहे ? जिथे रस्ता ओलांडायचा नसतो, तिथे रस्ता ओलांडला अन् अपघात झाला तर त्याच्या घरच्यांना दहा लाखांचा दंड आकारणार का? त्याच्या घरच्यांवर ती जबाबदारी टाकणार का? कित्येक वेळा चुकीच्या पद्धतीने रस्ता ओलांडणाऱ्याला वाचवताना अपघात घडतो आणि त्यात चालक दगावतात, याची जबाबदारी कोणावर? असा सवाल देखील आव्हाडांनी यावेळी उपस्थित केला
एकतर्फी विचार करून कायदा होऊच शकत नाही. ट्रकचालकांनी या कायद्याला विरोध केला आहे. माझा ट्रकचालकांच्या या भूमिकेला पूर्ण पाठिंबा आहे, असे म्हणत जितेंद्र आव्हाडांनी पाठिंबा दिला आहे.
नव्या कायद्यात आक्षेप कशावर?
नव्या मोटार वाहन कायद्यानुसार ट्रकमुळे एखादा व्यक्ती जखमी झाल्यास त्याला तात्काळ रुग्णालयात नेले पाहिजे, तसे न केल्यास आणि ट्रकचालक दोषी आढळून आल्यास त्याला सात वर्षांची शिक्षा आणि सात लाख रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. भारतात 28 लाखांहून अधिक ट्रक चालक 100 अब्ज किलोमीटरचे अंतर कापतात. या ट्रकवर 50 लाखांहून अधिक लोकं काम करतात. अशा परिस्थितीत ट्रकमुळे होणारे रस्ते अपघातही सर्रास घडत आहेत. त्यामुळेच सरकारने नवीन कायदा आणला असल्याचं बोललं जात आहे.
हे ही वाचा :