(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jalana News: धक्कादायक! वंचितच्या जिल्हा महासचिवाची शेतीच्या वादातून हत्या, जालना जिल्ह्यातील घटना
Jalna Crime News : जालना तालुक्यातील रामनगर साखर कारखाना परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
Jalna Crime News : जालना (Jalna) जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर येत असून, वंचितच्या जिल्हा महासचिवाची शेतीच्या वादातून हत्या (Murder) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांकडून मिळत असलेल्या प्राथमिक माहितीनुसार गायरान जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. जालना तालुक्यातील रामनगर साखर कारखाना परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. संतोष ज्ञानदेव आढाव (वय 33 वर्षे) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तर या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव संतोष ज्ञानदेव आढाव आणि त्यांचे चुलते निवृत्ती आढाव यांच्यामध्ये यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जमिनीचा वाद सुरु होता. जालना तालुक्यातील हडप सावरगाव येथील राहणारे संतोष आढाव यांचा चुलत्यासोबत रामनगर शिवारातील गायरान जमिनीवरून हा वाद होता. दरम्यान यावरूनच शनिवारी रात्रीच्या सुमारास त्यांच्यात वाद झाला. वाद एवढ्या विकोपाला गेला की, संतोष आढाव यांच्या चुलत्यासह इतर पाच जणांनी त्यांच्यावर हल्ला केला.हातात लोखंडी रॉड, लाकडी दांडे आणि दगडांनी त्यांनी संतोष यांच्यावर हल्ला चढवला. दरम्यान यावेळी करण्यात आलेल्या बेदम मारहाणीत संतोष आढाव हे जागीच ठार झाले. तर इतर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान या घटनेची माहिती कळताच परतुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश बुधवंत आणि मौजपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश धोंडे फौजफाट्यासह तातडीने घटनास्थळ दाखल झाले. पोलिसांनी जखमींना तातडीने जालना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर संतोष आढाव यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी मुख्य संशयित आरोपीस ताब्यात घेतले आहे. दरम्यान या प्रकरणी जखमी संजय आढाव यांच्या फिर्यादीवरून निवृत्ती आढाव, योगेश आढाव, दीपक जाधव आणि महिलेस अन्य एक या संशयितांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जमिनीचा वाद जीवावर उठला...
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव संतोष ज्ञानदेव आढाव आणि त्यांचे चुलत्यात गेल्या काही दिवसांपासून रामनगरच्या गायरान जमनीवरून वाद सुरु होता. दोन्ही गटाकडून यावरून आक्रमक भूमिका घेतल्याने हा वाद काही मिटला नाही. दरम्यान शनिवारी पुन्हा यावरून वाद झाला आणि संतोष यांच्यावर त्यांच्या चुलत्याने हल्ला चढवला. ज्यात संतोष यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: