'मोठी स्वप्न बघ, खूप मेहनत कर, तुला यश मिळेल' ; सचिन तेंडूलकरचं जळगावच्या चिमुकल्या अनयला पत्र
jalgaon News : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर ( Sachin Tendulkar ) याने जळगावमधील पहिलीत शिकणाऱ्या मुलाला पत्र पाठवले आहे.
jalgaon News update : जळगाव शहरातील इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या अनय डोहाळे याला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर ( Sachin Tendulkar ) याने पत्र लिहिले आहे. "मोठी स्वप्न बघ, खूप मेहनत कर, तुला यश मिळेल असा सल्ला सचिन तेंडूलकर याने या पत्रातून दिला आहे. सचिन तेंडूलकरने पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला थेट पत्र लिहिल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.
सचिन तेंडूलकर याने या पत्रासोबत स्वतःची सही आणि विश्व चषक हातात घेलेले दोन फोटोही पाठविले आहेत. त्यामुळे डोहाळे कुटुंबीय खूपच आनंदी झाले आहे. "मोठी स्वप्न बघ, खूप मेहनत कर, यश तुझेच आहे,अशा आशयाचा सल्ला देणारे पत्र सचिन तेंडूलकरने अनय डोहाळे याला पाठवले आहे.
जळगावमधील डोहाळे परिवार चार महिन्यापूर्वी मुंबाईला फिरायला गेले होते. मुंबई दर्शन करणाऱ्या गाईडने सचिन तेंडुलकर याचे घर सोबतच्या प्रवाशांना दाखविले. यावेळी अनय डोहाळे याने सचिन तेंडुलकरचे घर पाहताच त्याने त्याची भेट घेण्याची इच्छा आपल्या आई- वडिलांकडे व्यक्त केली. मात्र, कोणीही त्याच्या घरी जाऊन सहज भेटू शकत नाही, आपण त्यांना पत्र पाठऊ असं सांगून त्याच्या आई- वडिलांनी त्याला समजावून सांगून वेळ मारून नेली होती. मात्र, जिद्दी अनयने जळगावला परत आल्यानंतर सचिनला पत्र लिहिण्यास हट्ट धरला. त्याच्या हट्टा पुढे आई-वडिलांनी त्याला मार्गदर्शन करत अनयच्या हस्ते सचिला वाढदिवसानिमित्त पत्र लिहून शुभेच्छा दिल्या होत्या.
डोहाळे कुटुंबाने हे पत्र पाठवून चार महिने झाल्यानंतर ते हा विषय पूर्णपणे विसरले होते. परंतु, अनय डोहाळे याने लिहिलेल्या पत्राची दखल घेत सचिनने स्वतःची सही असलेले पत्र अनयला पाठवले.
मुलाच्या आग्रहाखातर आपण सचिन तेंडुलकर याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याला पत्र लिहिण्यास सांगितले होते. हे पत्र पाठवून चार महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटल्यामुळे आम्ही ते विसरून गेलो होतो. मात्र दोन दिवसापूर्वी पोस्टातून सचिनचे पत्र आल्याचा निरोप आला. आम्हाला प्रथम विश्वास बसला नाही, मात्र पोस्ट ऑफिसमध्ये गेल्यावर सचिनचे अनयला आलेले उत्तर पाहून खूप आनंद झाला. आमच्या सारख्या सर्व सामान्य कुटुंबातील व्यक्ती असलेल्या पहिली मधील माझ्या मुलास त्यांनी पत्र लिहावे आणि मोठी स्वप्न बघ, खूप मेहनत कर ,यश मिळेल हा सल्ला आमच्यासाठी खूप मोलाचा आहे. त्यांच्या या पत्रातून त्यांच्यातील मोठेपणासह त्यांना भारतरत्न पुरस्कार का मिळाला असेल हे दिसून येत आहे. त्यांचे हे पत्र आमच्यासाठी आनंद देणारे आहे आणि अभिमानास्पद आहे. तसेच प्रेरणा देणारे देखील असल्याची प्रतिक्रिया अनयची आई अनघा डोहाळे यांनी दिली आहे.
"आम्ही मुंबईला फिरण्यासाठी गेलो होतो, त्यावेळी मुंबई दर्शन करत असताना गाईडने सचिन तेंडुलकर यांचे घर आम्हाला दाखवले. मी लहान पणापासूनच सचिनचा चाहता असल्याने मला सचिन तेंडुलकर यांना भेटण्याची इच्छा होती. मात्र कोणालाही असं भेटता येत नाही म्हणून आपण त्यांना पत्र लिहू असं आईने सांगितले. त्यामुळे जळगावला आल्यानंतर त्यांना पत्र लिहिले होते. त्यांचं उत्तर येईल अशी अपेक्षा नसताना त्यांनी मला उत्तर पाठविल्याने खूप आनंद झाला आहे, असे अनय डोहाळे याने म्हटले आहे.