मुंबई : बांद्रा (वांद्रे) रेल्वे स्थानकाबाहेर मंगळवारी आपापल्या गावी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार, मजुरांची गर्दी जमा झाली होती. ही गर्दी एबीपी माझाचे उस्मानाबादचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांच्या वार्तांकनामुळे झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपावरुन राहुल कुलकर्णी यांना अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी एबीपी माझाची भूमिका मांडली आहे. राहुल कुलकर्णी यांच्यावर आरोप लावून त्यांना अटक केल्यानंतर आघाडीचं वृत्तपत्र, राज्यातील ज्येष्ठ पत्रकार तसेच सोशल माध्यमावर अनेक सामान्य लोकही त्यांची अटक चुकीची असल्याचं सांगत त्यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत.


शहानिशा न करता कारवाई, हे तर पूर्णत: अयोग्य : लोकसत्ता

वृत्तवाहिनीने रेल्वे सुरू होणार अशी बातमी दिली, हा गुन्हा कसा? ती काही एक कागदपत्रांवर आधारित होती. त्याची शहानिशा न करताच ही कारवाई झाली, हे तर पूर्णत: अयोग्य आहे, असं लोकसत्ताच्या अग्रलेखात म्हटलं आहे. ही बातमी देणे हा गुन्हा ठरत असेल तर ज्यांनी टाळेबंदी वाढवताना रेल्वे मंत्रालयास अंधारात ठेवले त्यांचाही जाब या गुन्ह्यात नोंदवायला हवा. त्याची कल्पनाही झेपणारी नाही. अशा वेळी मग सोपा मार्ग निवडा आणि डांबा वार्ताहरास असा हा प्रकार. या वृत्तवाहिनीमुळे ही गर्दी जमली हे खरे मानायचे तर ही बातमी काय फक्त वांद्रे परिसरातच पाहिली/ऐकली गेली? आणि रेल्वे स्थानक फक्त एकटय़ा वांद्रय़ातच आहे? शिवाय पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनस स्थानकातून रेल्वे गाडय़ा सुटतात कोणत्या शहरांसाठी? त्या दिशेने जाऊ इच्छिणारे आणि या गर्दीचा चेहरा यांच्यात काहीएक ताळमेळ तरी असावा? यापैकी कोणत्याही प्रश्नाचे तर्काधिष्ठित उत्तर शोधण्याची कोणाचीही इच्छा नाही, असंही या लेखात म्हटलंय.

Bandra incident | वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेरील गर्दी प्रकरणावर 'एबीपी माझा'ची भूमिका

लोकसत्तानं काय म्हटलंय

कोरोनाविरोधातील सध्याच्या लढाईस तीन बाजू आहेत. साथ आवरणे. दुसरी म्हणजे अर्थव्यवस्था आधी जिवंत ठेवणे आणि मग रुळावर आणणे. आणि या दोन मुद्दय़ांत पिचलेला तिसरा मुद्दा स्थलांतरित मजुरांचा. सरकारी यंत्रणांचे सर्व प्रयत्न पहिल्या दोन बाजूंवर केंद्रित आहेत आणि तिसरी पूर्ण दुर्लक्षित आहे. वास्तविक तिसऱ्याचा विचार केल्याशिवाय पहिल्या दोघांसाठीचे प्रयत्न सार्थकी लागू शकत नाहीत. पण हे भान सरकारी यंत्रणांनी अद्याप तरी दाखवलेले नाही. मुंबईतील वांद्रे, मुंब्रा वा गुजरातेतील सुरत या शहरांत जे घडले ते या तिसऱ्या मुद्दय़ाबाबत सरकारच्या अनभिज्ञतेमुळेच. अशा वेळी खरे तर या मुद्दय़ास भिडण्याचा प्रामाणिकपणा दाखवण्याऐवजी सरकारने केले काय? तर ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीच्या वार्ताहरावर कारवाई. का? तर या वृत्तवाहिनीने रेल्वे सेवा सुरू होणार अशी बातमी दिल्यामुळे वांद्रय़ात इतका जमाव जमा झाला आणि अनवस्था प्रसंग ओढवला. यावर हसावे की यातील सरकारी बुद्धीची कीव करावी असा प्रश्न पडतो.

हे खरे की इतके मोठे संकट जेव्हा येते तेव्हा त्यास तोंड देण्याचे मार्ग लगेच दिसत नाहीत. असे होऊ शकते. पण हे मार्ग शोधताना वास्तवाकडे दुर्लक्ष करून चालणारे नाही. अर्थव्यवस्था सुरळीत करण्याची इच्छा बाळगायची आणि शहरी स्थलांतरितांकडे दुर्लक्षच हा विरोधाभास झाला. तो दूर न झाल्यास या अभागी जिवांसाठी गाव आणि अन्यांसाठी अर्थस्थर्य दूरच राहील. तोपर्यंत प्रसारमाध्यमांच्या वार्ताहरांवर कारवाई करण्याने काय साधणार?

राहुल कुलकर्णींची अटक चुकीची : मिलिंद खांडेकर

पत्रकार राहुल कुलकर्णी यांना केलेली अटक चुकीची असल्याचं ज्येष्ठ पत्रकार मिलिंद खांडेकर यांनी ट्वीट करत म्हटलंय. या अटकेचा आणि बांद्रा स्टेशनसमोरील गर्दीचा काही संबंध पोलिस अजून जुळवू शकलेली नाही. पोलिस आधी राहुल यांची चौकशी करु शकली असती, तसंच रेल्वेला देखील त्या पत्राबाबत विचारायला हवं होतं. ही गडबडीत केलेली अटक विचार करण्यापलीकडील आहे, असं खांडेकर यांनी म्हटलंय.


कुलकर्णी यांना झालेली अटक ही अत्यंत दुर्दैवी घटना : विजय चोरमारे
एबीपी माझाचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांना झालेली अटक ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे, असं ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत वांद्रे स्थानकावर जी गर्दी जमली त्यासाठी एबीपी माझाची ट्रेन सुरू होणार असल्यासंदर्भातील बातमी कारणीभूत असल्याच्या आरोपावरून ही कारवाई झाली आहे. अत्यंत संवेदनशील काळात जो गोंधळ झाला त्यामुळे महाराष्ट्र सरकारही हबकून गेले, अशा परिस्थितीत आपण कठोर पावले उचलत आहोत, हे दाखवण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून केलेली कारवाई यापलीकडे त्याला फारसा अर्थ नाही. माझ्या आकलनानुसार ज्या कारणासाठी राहुल कुलकर्णीला अटक केली आहे, त्याच कारणासाठी विनय दुबेला अटक झाली आहे. तसे असेल तर यातील एकाची अटक चुकीची आहे. अर्थात राहुल कुलकर्णीची अटक चुकीची आहे, हे मी ठामपणे म्हणू शकतो, असं चोरमारे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. एबीपी माझाची बातमी आणि त्यासंदर्भातील वस्तुस्थिती संपादक राजीव खांडेकर यांनी स्पष्ट केली आहे. विशेष रेल्वे सोडण्याची बातमी सकाळी नऊ वाजता दाखवली. अकरानंतर तर कोणत्याही ट्रेन सुरू होणार नसल्याची बातमी दिली. त्यामुळे या बातमीमुळे गोंधळ झाला हे म्हणणे पटणारे नाही. आजच्या एकूण वृत्तवाहिन्यांमधील बातम्यांच्या आशयाचे सपाटीकरण आणि सुमारीकरण होत असल्याच्या काळात राहुल कुलकर्णी यांच्यासारख्या पत्रकारामुळे महाराष्ट्राचे काही वेगळे वार्तांकन पाहायला मिळत असते. ते संवेदनशील आणि उत्तम राजकीय, सामाजिक आकलन असलेले पत्रकार आहेत. कुठल्याही एका व्यक्तिच्या सगळ्याच गोष्टी आपल्याला मान्य असायला पाहिजे असे नाही. अनेकदा काही गोष्टी स्वतःच्याही मनाविरुद्ध कराव्या लागण्याचा हा काळ आहे. अशा काळात राहुल कुलकर्णी आणि एबीपी माझाच्या कव्हरेजसंदर्भात अनेक मतभेद असू शकतात. परंतु एखाद्या पत्रकाराच्या अडचणीच्या काळात त्याच्या पाठिशी उभे राहणे हे मला माझे कर्तव्य वाटते, असं चोरमारे यांनी म्हटलं आहे.



 कुलकर्णींना सरकारनं महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला हवा : माणिक मुंढे

ज्येष्ठ पत्रकार माणिक मुंढे त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात, एक चॅनल सकाळी 9 वाजता एक बातमी चालवतं आणि त्यामुळे मुंबईसारख्या ठिकाणी बांद्र्यात अमराठी भाषिकांची प्रचंड मोठी गर्दी जमते हा मला चमत्कार वाटतो. कारण अण्णा हजारेंचं आंदोलन ऐन भरात असताना आणि देशभर त्यांना गांधी गांधी असा त्यांचा जयघोष होत असतानाही मुंबईत चिमुटभरही गर्दी त्यांना जमली नव्हती. एबीपी माझाच्या एका बातमीनं तशी जमली असेल तर हे त्यांचं केवढं मोठं यश म्हणावे लागेल. बरं ही गर्दी मराठी नाही तर अमराठी लोकांची जमली, म्हणजे मुंबईतले अमराठीही आता मराठी चॅनल्स बघतायत असं म्हणायला हरकत नाही. एखाद्या चॅनलचं याच्यासारखं दुसरं यशच असू शकत नाही. आम्हा मराठी चॅनलवाल्यांसाठी आणखी थोडं अवकाश मोठं करायला वाव आहे म्हणायचा. त्याच्यासाठी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णींना सरकारनं महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला हवा कारण हिंदी भाषिकांना समजवण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरेंना मराठी बोलता बोलता काल हिंदीत बोलावं लागलं होतं. म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जे जमलं नाही ते राहुल कुलकर्णीं करून दाखवलं. हिंदी भाषिकही ज्याची बातमी समजू शकतात असे किती पत्रकार आहेत महाराष्ट्रात?

मुंढे यांची संपूर्ण पोस्ट


सरकारच्या असल्या वर्तणुकीचे कधीही समर्थन शक्य नाही : साहिल जोशी

राहुल कुलकर्णीला अटक झाल्यावरून खूप चर्चा सुरू आहे .त्याची बातमी चुकलीच असं समजून जरी चाललं तरी या बातमीमुळे बांद्र्यातील घटना घडली अस मानायला मी तयार नाही, असं ज्येष्ठ पत्रकार साहिल जोशी यांनी म्हटलं आहे. सरकारने या संदर्भात चॅनेल ला नोटीस काढून जाब विचारला असता तरी ठीक होतं.अजामीनपात्र गुन्हा नोंदवून अटक हे खूपच अती होतंय. सरकारच्या अश्या वागण्याचं समर्थन करणार्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की आपण अशा गोष्टीचं समर्थन करतोय की ती नंतर आपल्या बोकांडी कधीही बसू शकते . ही सुरुवात आहे शेवट नाही. सरकारच्या असल्या वर्तणुकीचे कधीही समर्थन शक्य नाही, असं त्यांनी ट्वीट केलं आहे.

वांद्र्यातल्या गर्दीला रेल्वे मंत्रालय जबाबदार : सामना 

मुंबईच्या वांद्रे रेल्वे स्थानकावर मंगळवारी संध्याकाळी अचानक हजारो परप्रांतीय मजूर जमले आणि त्यांनी धिंगाणा घातला. आपापल्या राज्यांत जाण्यासाठी रेल्वेतर्फे विशेष गाड्या सोडणार असल्याची बातमी प्रसिद्ध झाली आणि लगेच ही गर्दी उसळली. गाडय़ा सोडण्याबाबत ‘अफवा’ पसरली असे आम्ही सांगत नाही. ती बातमीच आहे. कारण अशा गाड्या सोडण्याबाबतचे रेल्वेचे एक परिपत्रकच समोर आले आहे. म्हणजे अफवा उठली आणि लोकांनी गर्दी केली असे म्हणता येत नाही. दुसरे असे की, 15 एप्रिलनंतरच्या तारखांसाठी रेल्वेने रिझर्व्हेशन कसे घेतले? पंतप्रधान ‘लॉक डाऊन’ उठवणार की आणखी काही करणार याबाबत संभ्रम असताना रेल्वे 40 लाख लोकांचे रिझर्व्हेशन घेऊन गोंधळ उडवते हा अपराध आहे. त्यामुळे वांद्र्यात जी गर्दी उसळली, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला त्यास रेल्वे मंत्रालय जबाबदार आहे.

...तर तुम्ही ट्रोल झाला नसतात: दत्ता थोरे 

तुमच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यापेक्षा गंभीर म्हणजे हजारो विरोधक आणि लावारीसांकडून हे असे आज ट्रोल होणे. तुम्ही आताच्या-मागच्या अश्या सत्ताधाऱ्यांची वेळोवेळी मखलाशी केली असती तर कदाचित आज असे ट्रोल झाला नसता. विरोधी पक्षाच्या लोकांनाही तुम्ही नागड करता, त्यांना जरी धरून राहिला असता तरी आज ट्रोल झाला नसता, असं पत्रकार दत्ता थोरे यांनी म्हटलंय. तुम्ही प्रशासकीय यंत्रणेला उघडं न करता दोस्त करून गुडी गुडी बातम्या दिल्या असता तरी आज असे ट्रोल झाला नसता. खरं तेच दाखविण्याची हौस सोडून खोटं खोटं दाखवीत राहिला असता तरी आज ट्रोल झाला नसता. जे टेबलावर शिजत असते ते पडद्यावर दाखवायची सवय मोडली असती तरी आज ट्रोल झाला नसता. तुम्ही 'बातमी'शी तडजोडी केल्या नाहीत, केल्या असत्या तर सगळ्या पक्षांच्या लावरीसांकडून ट्रोल ही झाला नसता. दिल्ली, पुणे, मुंबैलाच विद्वान पत्रकार राहतात, हे खोडून काढताना तुम्ही उस्मानाबादहुन अनेकांना चितपट केलं.. ते सारे कसे आता शातीर ट्रोलर झालेत. तुम्ही असे केले नसते तर आज ट्रोल तर झाला नसताच, उलट कदाचित तुमच्यावर हा गुन्हाही दाखल झाला नसता. तुमच्या एवढ्या चुका...मला हे ही माहिती आहे की या तुमच्या चुका दुरुस्त होण्यासारख्या नाहीत... हे बातमीचे कुंकूच घातक.. फक्त बातमी - बातमी करणाऱ्यांनो तुमचाही कधीतरी राहुल कुलकर्णी होणारच, असं थोरे यांनी म्हटलंय.

 बातमीला अफवा म्हणणं यासारखा अतर्क्य प्रकार : संदीप रामदासी

लॉकडाऊन सुरु असताना आणि सर्वसामान्य माणसाला महत्वाच्या कामाला बाहेर पडताना पंचवीस वेळा हटकलं जातं तिथे हजारोच्या संख्येनं गर्दी जमली कशी? त्या गर्दी मागे कोण होतं? फक्त तिथेच गर्दी का जमली? महाराष्ट्रातल्या इतर भागातील लोकांना राहुलची बातमी कळली नाही का? असे अनेक प्रश्न बाजुला ठेवू पण वांद्र्यातील त्या अनागोंदी ला ७ तास आधीच्या प्लेन बातमीला आणि पत्रकाराला जबाबदार धरणं, बातमीला अफवा म्हणणं यासारखा अतर्क्य प्रकार दुसरा नसेल. बरं त्याबाबत त्याला नोटीस देणं जाब विचारणं चौकशी लावणं हेही समजू शकतो पण कोरोना महामारीचा धोका सर्वत्र असताना मुंबईतून रातोरात 450 किलोमीटर दूर उस्मानाबादला टीम पाठवणं पहाटे त्यांना घरातून उठवून योग्य कारणं न सांगता योग्य ती कार्यवाही पूर्ण न करता गाडीत घालून मुंबईला घेऊन येणं हे तर्क आणि न्यायसंगत वाटत नाही.

संदीप रामदासी यांची पोस्ट



एबीपी माझाची भूमिका काय?

बांद्रा (वांद्रे) रेल्वे स्थानकाबाहेर मंगळवारी आपापल्या गावी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार, मजुरांची गर्दी जमा झाली होती. ही गर्दी एबीपी माझाचे उस्मानाबादचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांच्या वार्तांकनामुळे झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपावरुन राहुल कुलकर्णी यांना अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी एबीपी माझाची भूमिका मांडली. ज्या रेल्वेच्या पत्रावर दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले. त्याच काँग्रेसचे सरकार असलेल्या महाराष्ट्रात एबीपी माझाच्या पत्रकाराला अटक होणे, हे कितपत योग्य आहे? याचा विचार महाराष्ट्रातील सुज्ञ जनता आणि सरकार करेल, असा एबीपी माझाला विश्वास आहे.

कोरोनामुळे सध्या राज्य, देश आणि जग हे अत्यंत बिकट अवस्थेतून जात आहे. गेल्या 21 दिवासांपासून देशभरात लॉकडाऊन आहे. हा लॉकडाऊन काल म्हणजे 14 एप्रिलला संपणार होता. राज्यभरात अनेक ठिकाणी हजारो कामगार, मजूर अडकले आहेत. या संदर्भात माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी बातमी केली होती. लॉकडाऊनमुळे हजारो कामगार सध्या बेरोजगार आहे. त्यामुळे या कामगारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक स्वयंसेवी संस्था आणि राजकीय लोक अशा मजूरांना जेवण पुरवत आहेत. मात्र, अनेकांपर्यंत या गोष्टी पोहचत नाहीय. परिणामी या कामगारांची उपासमार होत आहे.

Bandra railway station incident | वांद्रे स्थानकातील गर्दी प्रकरणावर 'एबीपी माझा'ची भूमिका | ABP Majha


विविध राज्यांमध्ये अडकलेल्या कामगारांना घरी जाण्यासाठी व्यवस्था करण्याची अनेक मुख्यमंत्र्यांची मागणी

मध्यंतरी 12 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यावेळी अनेक मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना विनंती केली होती, की, जर मध्ये 24 तासांचा कालावधी दिला तर अनेक अडकलेल्या मजुरांना आपापल्या घरी जाता येईल. त्या पार्श्वभूमीवर एबीपी माझाने एक बातमी दिली होती. रेल्वेच्या साऊथ सेंट्रल झोनमध्ये मराठवाड्यातील अनेक जिल्हे येतात. या जिल्ह्यांमध्येही अनेक मजूर अशाच प्रकारे अडकले आहेत. या सर्वांना घरी जाण्यासाठी रेल्वे एक जनसाधारण स्पेशल ट्रेनची व्यवस्था करत आहे. या संदर्भात 13 एप्रिलला साऊथ सेंट्रल झोनच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे एक बैठक झाली होती. यामध्ये अशा ट्रेन चालवण्यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या प्रस्तावाच्या आधारावर ही बातमी होती. अशा प्रकार अडकलेल्या श्रमिकांना घरी जाण्यासाठी रेल्वे विचार करत आहे.

Lockdown | रेल्वेचे बुकिंग कालपर्यंत का सुरु होतं? 

रेल्वेचा प्रस्ताव पुढे आला नाही

ही बातमी काल 14 एप्रिलला सकाळी 9 वाजता देण्यात आली होती. यावेळी सर्वांचीच ही अपेक्षा होती की, ज्या भागात कोरोनाचा कमी प्रभाव आहे, अशा ठिकाणी या श्रमिकांना सवलत मिळू शकेल. अनेक मुख्यमंत्र्यांची मागणी होती. त्यासंर्भात काहीतरी विचार होईल. रेल्वेच्या अंतर्गत व्यवहाराच्या या पत्रावरुन रेल्वे अशी सुविधा करेल असं स्पष्ट होत होते. ही बातमी सकाळी नऊ वाजता ऑन एअर गेली. त्यानंतर 10 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली. त्यामुळे रेल्वेचा हा प्रस्ताव, प्रस्ताव पातळीवरचं राहिला. ती बातमी नऊच्या नंतर एबीपी माझावर चालली नाही. त्यानंतर तीन मे पर्यंत कोणत्याही रेल्वे चालणार नसल्याचं रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं. त्यावर 11 वाजता या सर्व ट्रेन चालणार नसल्याची बातमी देखली एबीपीवर चालवण्यात आली. दुपारी दोन वाजता ज्यांनी तिकीटं काढली त्यांना सर्व पैसे पाठीमागे मिळणार असल्याचं रेल्वेने सांगितले.

Bandra Migrant Crisis | वांद्रे स्टेशन परिसरातील गर्दी पूर्वनियोजित होती?

बांद्रा स्थानकाजवळ गर्दी कशी झाली हा संशोधनाचा भाग

बांद्रा स्थानकाजवळ सायंकाळी चार वाजता मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. ती कशी झाली हा चौकशीचा भाग आहे. मात्र, या गर्दीचा संबंध हा एबीपी माझाच्या बातशी लावण्यात आला. कोरोनाच्या विरोधात मुंबईत जे सकारात्मक चित्र होतं, त्याला यामुळे धक्का बसला. पोलिसांनी या गर्दीवरती व्यवस्थिती नियंत्रण मिळवले. मात्र, यानंतर या गर्दीचा संबंध एबीपी माझाच्या बातमीशी लावण्यात आला. वास्तविक एबीपीच्या बातमीमध्ये या ट्रेन कुठून सुटणार, कधी सुटणार या संदर्भात काहीच माहिती देण्यात आली नव्हती. तरीसुद्धा त्याचा संबंध बातमीशी लावण्यात आला. मुंबईवरुन ट्रेन जाणार आहे, असा उल्लेख बातमीत कुठेच नव्हता.

तर संपूर्ण महाराष्ट्रभर गर्दी व्हायला हवी होती

या घटनेच्या पार्श्वभूमीवर काही प्रश्न उपस्थित होतात. ते म्हणजे या गर्दीतील बहुसंख्य लोक हे परप्रांतीय होते. म्हणजेच हिंदीभाषिक होते. ते मराठी न्युज चॅनेल पाहतात का? बांद्र्याहून कुठल्याही राज्यात ट्रेन जात नाही. या कामगारांना जर घरी जायचे असेल तर त्यांच्या हातात एकही पिशवी किंवा सामान का नव्हते? बंगाल किंवा उत्तर भारतात ट्रेन या व्हीटी किंवा सीएसएमटीवरुन जातात. मग हे कामगार बांद्रा स्थानकाजवळ का आले? आता यांना कोणी आणलं, त्याच्यापाठी काय हेतू होता? हा सर्व संशोधनाचा भाग आहे. मात्र, या सर्वाचा संबंध सकाळी नऊ वाजता रेल्वेचा प्रस्ताव असलेल्या बातमीशी जोडला. या बातमीमुळेच गर्दी जमा झाली असं पसरवण्यात आलं. मात्र, या बातमीमुळे गर्दी झाली असती तर संपूर्ण महाराष्ट्रभर गर्दी व्हायला हवी होती. कारण, एबीपी सर्व महाराष्ट्रभर पाहिलं जातं.

Lockdown | वांद्रे गर्दी प्रकरणी उत्तर भारतीय महापंचायतीचा अध्यक्ष विनय दुबेला अटक 

राहुल कुलकर्णी यांच्या बातमीशी या सर्व गर्दीचा संबंध लावण्यात आला आहे. मात्र, या गर्दीतील व्हिडीओमधून धक्कादायक गोष्टी समोर येत आहे. तुम्ही लवकर का आलात? मीडियाला आपण चार वाजता बोलावलं होतं. अशा प्रकारच्या चर्चेचे व्हिडीओ समोर येत आहेत. आता तुम्ही आलाय तर जायचं नाही. पंधरा हजार रुपये घेतल्याशिवाय बाहेर पडू नका. अशा प्रकारे कोणीतरी चिथावत असल्याच्या गोष्टी आता समोर आल्या आहेत. कोणीतरी जाणीवपूर्वक या गोष्टी घडवून आणल्या आहेत. याचा संबंध रेल्वेच्या प्रस्तावाशी जोडण्यात आला. तो एबीपी माझावर अन्याय करणारा आणि पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा आहे. या प्रकरणामध्ये हकनाक एबीपी माझाचे एक अत्यंत संवेदनशील पत्रकार राहुल कुलकर्णी यांना अटक झालेली आहे.

वांद्रे येथील गर्दीच्या घटनेनंतर अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना फोन

ज्या पत्राचा आधार घेऊन एबीपी माझाने बातमी दाखवली होती. त्याच पत्राचा आधार घेऊन दिल्लीमध्ये काँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषद घेत या पत्रावर प्रश्न उपस्थित केले. ज्या पत्रावर दिल्लीमध्ये काँग्रेसने प्रश्न विचारले. त्याच काँग्रेस सरकारचं सरकार असलेल्या महाराष्ट्रात एबीपी माझाच्या पत्रकाराला अटक होणे हे कितपत योग्य आहे.? याचा विचार महाराष्ट्रातील सुज्ञ जनता आणि सरकार करेल, असा एबीपी माझाला विश्वास आहे.