मुंबई : ब्रांद्रा (वांद्रे) रेल्वे स्थानकाबाहेर मंगळवारी आपापल्या गावी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार, मजुरांची गर्दी जमा झाली होती. ही गर्दी एबीपी माझाचे उस्मानाबादचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांच्या वार्तांकनामुळे झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपावरुन राहुल कुलकर्णी यांना अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी एबीपी माझाची भूमिका मांडली. ज्या रेल्वेच्या पत्रावर दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले. त्याच काँग्रेसचे सरकार असलेल्या महाराष्ट्रात एबीपी माझाच्या पत्रकाराला अटक होणे, हे कितपत योग्य आहे? याचा विचार महाराष्ट्रातील सुज्ञ जनता आणि सरकार करेल, असा एबीपी माझाला विश्वास आहे.


कोरोनामुळे सध्या राज्य, देश आणि जग हे अत्यंत बिकट अवस्थेतून जात आहे. गेल्या 21 दिवासांपासून देशभरात लॉकडाऊन आहे. हा लॉकडाऊन काल म्हणजे 14 एप्रिलला संपणार होता. राज्यभरात अनेक ठिकाणी हजारो कामगार, मजूर अडकले आहेत. या संदर्भात माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी बातमी केली होती. लॉकडाऊनमुळे हजारो कामगार सध्या बेरोजगार आहे. त्यामुळे या कामगारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक स्वयंसेवी संस्था आणि राजकीय लोक अशा मजूरांना जेवण पुरवत आहेत. मात्र, अनेकांपर्यंत या गोष्टी पोहचत नाहीय. परिणामी या कामगारांची उपासमार होत आहे.


वांद्रे गर्दी प्रकरण; आशिष शेलार यांचं आदित्य ठाकरेंना पत्र 


विविध राज्यांमध्ये अडकलेल्या कामगारांना घरी जाण्यासाठी व्यवस्था करण्याची अनेक मुख्यमंत्र्यांची मागणी


मध्यंतरी 12 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यावेळी अनेक मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना विनंती केली होती, की, जर मध्ये 24 तासांचा कालावधी दिला तर अनेक अडकलेल्या मजुरांना आपापल्या घरी जाता येईल. त्या पार्श्वभूमीवर एबीपी माझाने एक बातमी दिली होती. रेल्वेच्या साऊथ सेंट्रल झोनमध्ये मराठवाड्यातील अनेक जिल्हे येतात. या जिल्ह्यांमध्येही अनेक मजूर अशाच प्रकारे अडकले आहेत. या सर्वांना घरी जाण्यासाठी रेल्वे एक जनसाधारण स्पेशल ट्रेनची व्यवस्था करत आहे. या संदर्भात 13 एप्रिलला साऊथ सेंट्रल झोनच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे एक बैठक झाली होती. यामध्ये अशा ट्रेन चालवण्यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या प्रस्तावाच्या आधारावर ही बातमी होती. अशा प्रकार अडकलेल्या श्रमिकांना घरी जाण्यासाठी रेल्वे विचार करत आहे.


Lockdown | रेल्वेचे बुकिंग कालपर्यंत का सुरु होतं? 


रेल्वेचा प्रस्ताव पुढे आला नाही


ही बातमी काल 14 एप्रिलला सकाळी 9 वाजता देण्यात आली होती. यावेळी सर्वांचीच ही अपेक्षा होती की, ज्या भागात कोरोनाचा कमी प्रभाव आहे, अशा ठिकाणी या श्रमिकांना सवलत मिळू शकेल. अनेक मुख्यमंत्र्यांची मागणी होती. त्यासंर्भात काहीतरी विचार होईल. रेल्वेच्या अंतर्गत व्यवहाराच्या या पत्रावरुन रेल्वे अशी सुविधा करेल असं स्पष्ट होत होते. ही बातमी सकाळी नऊ वाजता ऑन एअर गेली. त्यानंतर 10 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली. त्यामुळे रेल्वेचा हा प्रस्ताव, प्रस्ताव पातळीवरचं राहिला. ती बातमी नऊच्या नंतर एबीपी माझावर चालली नाही. त्यानंतर तीन मे पर्यंत कोणत्याही रेल्वे चालणार नसल्याचं रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं. त्यावर 11 वाजता या सर्व ट्रेन चालणार नसल्याची बातमी देखली एबीपीवर चालवण्यात आली. दुपारी दोन वाजता ज्यांनी तिकीटं काढली त्यांना सर्व पैसे पाठीमागे मिळणार असल्याचं रेल्वेने सांगितले.


Bandra Migrant Crisis | वांद्रे स्टेशन परिसरातील गर्दी पूर्वनियोजित होती?


बांद्रा स्थानकाजवळ गर्दी कशी झाली हा संशोधनाचा भाग


बांद्रा स्थानकाजवळ सायंकाळी चार वाजता मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. ती कशी झाली हा चौकशीचा भाग आहे. मात्र, या गर्दीचा संबंध हा एबीपी माझाच्या बातशी लावण्यात आला. कोरोनाच्या विरोधात मुंबईत जे सकारात्मक चित्र होतं, त्याला यामुळे धक्का बसला. पोलिसांनी या गर्दीवरती व्यवस्थिती नियंत्रण मिळवले. मात्र, यानंतर या गर्दीचा संबंध एबीपी माझाच्या बातमीशी लावण्यात आला. वास्तविक एबीपीच्या बातमीमध्ये या ट्रेन कुठून सुटणार, कधी सुटणार या संदर्भात काहीच माहिती देण्यात आली नव्हती. तरीसुद्धा त्याचा संबंध बातमीशी लावण्यात आला. मुंबईवरुन ट्रेन जाणार आहे, असा उल्लेख बातमीत कुठेच नव्हता.


तर संपूर्ण महाराष्ट्रभर गर्दी व्हायला हवी होती


या घटनेच्या पार्श्वभूमीवर काही प्रश्न उपस्थित होतात. ते म्हणजे या गर्दीतील बहुसंख्य लोक हे परप्रांतीय होते. म्हणजेच हिंदीभाषिक होते. ते मराठी न्युज चॅनेल पाहतात का? बांद्र्याहून कुठल्याही राज्यात ट्रेन जात नाही. या कामगारांना जर घरी जायचे असेल तर त्यांच्या हातात एकही पिशवी किंवा सामान का नव्हते? बंगाल किंवा उत्तर भारतात ट्रेन या व्हीटी किंवा सीएसएमटीवरुन जातात. मग हे कामगार बांद्रा स्थानकाजवळ का आले? आता यांना कोणी आणलं, त्याच्यापाठी काय हेतू होता? हा सर्व संशोधनाचा भाग आहे. मात्र, या सर्वाचा संबंध सकाळी नऊ वाजता रेल्वेचा प्रस्ताव असलेल्या बातमीशी जोडला. या बातमीमुळेच गर्दी जमा झाली असं पसरवण्यात आलं. मात्र, या बातमीमुळे गर्दी झाली असती तर संपूर्ण महाराष्ट्रभर गर्दी व्हायला हवी होती. कारण, एबीपी सर्व महाराष्ट्रभर पाहिलं जातं.


Lockdown | वांद्रे गर्दी प्रकरणी उत्तर भारतीय महापंचायतीचा अध्यक्ष विनय दुबेला अटक 


राहुल कुलकर्णी यांच्या बातमीशी या सर्व गर्दीचा संबंध लावण्यात आला आहे. मात्र, या गर्दीतील व्हिडीओमधून धक्कादायक गोष्टी समोर येत आहे. तुम्ही लवकर का आलात? मीडियाला आपण चार वाजता बोलावलं होतं. अशा प्रकारच्या चर्चेचे व्हिडीओ समोर येत आहेत. आता तुम्ही आलाय तर जायचं नाही. पंधरा हजार रुपये घेतल्याशिवाय बाहेर पडू नका. अशा प्रकारे कोणीतरी चिथावत असल्याच्या गोष्टी आता समोर आल्या आहेत. कोणीतरी जाणीवपूर्वक या गोष्टी घडवून आणल्या आहेत. याचा संबंध रेल्वेच्या प्रस्तावाशी जोडण्यात आला. तो एबीपी माझावर अन्याय करणारा आणि पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा आहे. या प्रकरणामध्ये हकनाक एबीपी माझाचे एक अत्यंत संवेदनशील पत्रकार राहुल कुलकर्णी यांना अटक झालेली आहे.


वांद्रे येथील गर्दीच्या घटनेनंतर अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना फोन


ज्या पत्राचा आधार घेऊन एबीपी माझाने बातमी दाखवली होती. त्याच पत्राचा आधार घेऊन दिल्लीमध्ये काँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषद घेत या पत्रावर प्रश्न उपस्थित केले. ज्या पत्रावर दिल्लीमध्ये काँग्रेसने प्रश्न विचारले. त्याच काँग्रेस सरकारचं सरकार असलेल्या महाराष्ट्रात एबीपी माझाच्या पत्रकाराला अटक होणे हे कितपत योग्य आहे.? याचा विचार महाराष्ट्रातील सुज्ञ जनता आणि सरकार करेल, असा एबीपी माझाला विश्वास आहे.


Bandra railway station incident | वांद्रे स्थानकातील गर्दी प्रकरणावर 'एबीपी माझा'ची भूमिका | ABP Majha