मुंबई : मुंबईतील वांद्रे स्टेशनवर स्थलांतरित मजुरांच्या गर्दीप्रकरणी पोलिसांनी विनय दुबे नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिसांनी मंगळवारी (15 एप्रिल) रात्री विनय दुबेला ऐरोलीतून ताब्यात घेतलं आणि मुंबई पोलिसांकडे सुपूर्द केलं आहे. त्यानंतर त्याला रात्री उशिरा वांद्रे पोलिसांत हजर करण्यात आलं, तिथे त्याला अटक करण्यात आली. आज त्याला कोर्टात हजर करुन पुढील कारवाई केली जाईल. लॉकडाऊनदरम्यान मजुरांची दिशाभूल करुन गर्दी जमवल्याचा आरोप विनय दुबेवर आहे.


विनय दुबे हा उत्तर भारतीय महापंचायतचा अध्यक्ष आहे. विनय दुबेचा मुंबईत मजुरी करणाऱ्या उत्तर भारतीय आणि पश्चिम बंगालच्या मजुरांशी दांडगा जनसंपर्क आहे.


विनय दुबेने 'चलो घर की ओर' मोहीम सुरु केली होती. त्याने आपल्या फेसबुक अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये हे आवाहन केलं होतं. यासंदर्भात त्याने ट्वीटही केलं होतं. स्थलांतरित मजुरांना आपापल्या गावी जाण्यासाठी 18 एप्रिलपर्यंत ट्रेनची सोय केली नाही तर देशव्यापी आंदोलन केलं जाईल, असा इशारा त्याने दिला होता.







सोशल मीडियावरील त्या संदेश/आवाहनामुळेच मंगळवारी वांद्रे स्टेशनबाहेर मजुरांची गर्दी जमा झाली असावी, असा संशय पोलिसांना आहे. बहुसंख्य मजूर उत्तर प्रदेश, बिहार तसंच पश्चिम बंगालमधील होते. पोलिसांनी दुबेविरोधातील आयपीसीच्या कलम 117, 153 अ, 188, 269, 270, 505(2) आणि साथीचे रोग कायद्याच्या कलम 3 अंतर्गत त्याच्याविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे.


20 एप्रिलला पदयात्रेला सुरुवात करु : विनय
विनय दुबेने शनिवारी एक व्हिडीओ फेसबुकवर अपलोड केला होता. व्हिडीओत विनय दुबे परप्रांतीयांना सोबत घेऊन आपण उत्तर प्रदेशपर्यंत पदयात्रा काढणार असल्याचं सांगत आहे. मजुरांना आपापल्या गावाला पाठवण्याची सोय केली नाही आणि हे प्रकरण 14 ते 15 तारखेपर्यंत मिटलं नाही तर 20 एप्रिलला पदयात्रेला सुरुवात करु, अशी धमकी त्याने व्हिडीओत दिली होती. यावेळी त्याने आपल्याला पाठिंबा असणाऱ्यांना व्हॉट्सअॅपला मेजेस टाकावा असं आवाहन केलं होतं.






वांद्रे स्टेशन परिसरात मोठी गर्दी
दरम्यान, मुंबईच्या वांद्रे पश्चिम परिसरात स्टेशनबाहेर काल (14 एप्रिल) दुपारी मोठ्या प्रमाणात मजुरांची मोठी गर्दी जमा झाली होती. आम्हाला आमच्या घरी सोडा, अशी मागणी ते करत होते. याठिकाणी जमलेले जास्तीत जास्त लोक कामानिमित्त उत्तर प्रदेश आणि बिहार येथून मुंबईत आलेले आहेत. लॉकडाऊन उठेल असा विश्वास मजुरांना होता. या संपूर्ण प्रकाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी गर्दीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला होता.


संबंधित बातम्या


तुम्ही महाराष्ट्रात आहात चिंता करु नका, परप्रांतियांना मुख्यमंत्र्यांचं आवाहन






Bandra Migrant Case | वांद्रे गर्दी प्रकरणी उत्तर भारतीय संघटनेचा अध्यक्ष विनय दुबेला अटक





Bandra Crowd Issue | वांद्रे स्थानकावर हजारोंच्या संख्येने लोकांची गर्दी, गावी परत जाण्याची मागणी