मुंबई : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने राज्यात लॉकडाऊन घोषित केला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे तळीरामांची मात्र मोठी गैरसोय होताना दिसतेय. संचारबंदीचा फायदा उचलत काही तळीरामांनी चक्क दारूच्या दुकानावरच डल्ला मारायला सुरुवात केली. लॉकडाऊनमध्ये दारुड्यांनी आपली तलफ भागवण्यासाठी अनेक ठिकाणी दारुची दुकानचं फोडली. तर काही ठिकाणी जप्त केलेली दारु ठेवलेली सरकारी गोदामं फोडली. या घटना थांबण्याचं नावच घेत नाहीयेत. आता मात्र तळीरामांनी कहरच केल्याचे समोर आले आहे. आता दारुड्यांनी नशा करण्यासाठी सॅनिटायझरचा पर्याय निवडला आहे. नागपुरात सॅनिटायझर पिऊन नशा करणाऱ्या पाच जणांना शांतीनगर पोलीस स्टेशनच्या पथकाकडून अटक केली आहे.


नागपुरात चक्क मेडिकलमधून दारुची विक्री, एकाला अटक

सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल असते. त्याच्यातून नशा येते असे सांगून त्यांना सॅनिटायझर विकणाऱ्या आणि ते खरेदी करून अशी धोकादायक नशा करणाऱ्या 5 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर सॅनिटायझरच्या बॉटल्स ही जप्त केल्या आहेत. ही घटना नागपुरातील शांतीनगर भागात घडली. लॉकडाऊनमध्ये मद्यविक्री बंद असल्याने मद्यपींनी नशा करण्यासाठी ही नवी शक्कल लढविली आहे. यामुळे पोलिस आणि प्रशासनाने देखील तोंडात बोटं घातली आहेत. एकीकडे पोलिस प्रशासन संचारबंदीसाठी संपूर्ण ताकत लावून उभे असताना दुसरीकडे दारुड्यांच्या वाढत्या उपद्रवाने नवे आव्हान उभे राहिले आहे.

वड पाच्ची अगेन...! तळीरामांकडून आता सरकारी गोदामांना सुरुंग! दारुचोरी रोखण्याचं आव्हान

नागपुरात तळीरामांच्या संयमाचा बांध सुटला
लॉकडाऊनमुळे मद्यविक्रीची दुकाने बंद असल्याने नागपुरात तळीरामांच्या संयमाचा बांध वारंवार सुटताना दिसतोय. त्यामुळंच नागपुरात गेल्या आठवड्यात 6 दिवसात पाच वेगवेगळे बार आणि दारूची दुकान फोडल्याच्या घटना समोर आल्या होत्या.गेल्या आठवड्यात 6 दिवसात नागपुरात बार आणि दारू दुकानातून महागडी दारू चोरून नेल्याच्या 5 घटना घडल्या होत्या. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये मद्यविक्री बंद असल्याने तळीराम बैचेन झाल्याचे आणि ते दारू चोरीच्या घटना घडवत असल्याचे दिसून येत आहे.


व्यसनी लोकं घेताहेत समुपदेशन
लॉकडाऊनच्या या कालावधीत दारु आणि सिगारेट मिळत नसल्याने या गोष्टीचं व्यसन असलेले अस्वस्थ झालेत. त्यामुळं अशा लोकांकडून समुपदेशनासाठी फोन करण्याचं प्रमाण लॉकडाऊनच्या कालावधीत वाढल्याच पुण्यातील मुक्तांगन व्यसनमुक्ती केंद्राच्या प्रमुख डॉक्टर मुक्ता पुणतांबेकर यांनी म्हटलं आहे. कुठल्याही व्यसनाच्या शारिरीक गुलामगिरीतून बाहेर येण्यासाठी चार दिवसांचा कालावधी पुरेसा ठरतो. लॉकडाऊनच्या या कालावधीचा उपयोग शारिरीक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारच्या गुलामगिरीतून सुटण्यासाठी करुन घेता येऊ शकतो असं डॉक्टर मुक्ता पुणतांबेकर यांनी म्हटलं आहे.