कोकणात शिवसेना उमेदवाराच्या पराभवाला शिवसेनेतील नेताच कारणीभूत? सामंतांच्या 'त्या' वक्तव्यावरुन चर्चा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उदय सामंत यांनी शिवसेनेचा उमेदवार पराभूत होण्यास शिवसेनाच कारणीभूत असल्याची जाहीर कबुली तर दिली नाही ना? असा देखील सवाल विचारला जात आहे.
रत्नागिरी : राजकारण! कधी काय घडेल? याचा काही नेम नाही. आज विरोधात, कट्टर राजकीय शत्रुत्व असलेले असलेले उद्या एकत्र दिसल्यास काही आश्चर्य वाटायला नको. पण, सध्याचं राजकारण पाहता अनेकजण यावर आपली नाराजी देखील व्यक्त करतात. पण, असं असलं तरी राजकारणापलिकडची मैत्री आणि विरोधीपक्षात असल्यानंतर देखील परस्परांना मदत केल्याचं अनेकांचे किस्से आहेत. राजकारणापलिकडील मैत्री म्हणजे राजकारणातील आभूषण आणि राज्याची संस्कृती देखील. असं असलं तरी शिवसेनेचे कोकणातील नेते, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या जाहीर वक्तव्यावरुन मात्र सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या. त्याचवेळी शिवसेनेचा नेता शिवसेनेच्याच उमेदवाराच्या पराभवासाठी कारणीभूत तर ठरला नाही ना? अशी चर्चा देखील केली जात आहे. उदय सामंत यांच्या त्या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हारयल होत असून त्यावरुन आता उलटसुलट चर्चा देखील सुरु झाल्या आहेत. मुख्यबाब म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उदय सामंत यांनी शिवसेनेचा उमेदवार पराभूत होण्यास शिवसेनाच कारणीभूत असल्याची जाहीर कबुली तर दिली नाही ना? असा देखील सवाल विचारला जात आहे. अजित पवार कोकण दौऱ्यावर आलेले असताना महाविकास आघाडीचे रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील नेते एकाच मंचावर होते. त्यावेळी सामंत यांनी केलेलं वक्तव्य सर्वांसाठी आश्चर्याचा धक्का देणारं असंच आहे.
काय म्हणाले सामंत?
24 एप्रिल रोजी अजित पवार चिपळूण दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी गोविंद निकम यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. त्यानंतर सर्वच नेत्यांची भाषण देखील झाली. नेत्यांनी मारलेल्या कोपरखळ्यांनी देखील यावेळी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आपल्या भाषणादरम्यान बोलताना उदय सामंत यांनी "लोकसभेला आम्हाला 52 हजारांचं मताधिक्य होतं. आमचा फुगा मोठा होता. पण, त्यानंतर देखील चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातून शेखर निकम विजयी झाले. आमचे 50 हजारांचे लीड त्यांनी तोडले. त्याचा पॅटर्न केवळ त्यांना आणि मला माहित आहे. हा पॅटर्न महत्त्वाचा आहे. माझे आणि शेखर सरांचे काही कॉमन मित्र आहेत ते त्यांच्या मतदारसंघात त्यांना आणि माझ्या मतदारसंघात मला मदत करतात," असं जाहीर वक्तव्य सामंत यांनी केलं आणि सर्वांच्या भुवया मात्र उंचावल्या. कारण याच मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार सदानंद कदम यांना 2 हजारांच्या मताधिक्याने पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे साहजिकच उदय सामंत यांच्या या वक्तव्याला महत्त्व येते. शिवाय, त्याकडे कुणीही राजकीय अर्थाने पाहिल्यास आश्चर्य वाटायला नको.
शिवसेनेत कलगीतुरा
चिपळूणमध्ये शिवसेनेच्या सदानंद कदम यांना पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भास्कर जाधव जबाबदार असल्याचं बोललं जात होतं. पण, सामंत यांनी केलेल्या या वक्तव्यावरुन मात्र वेगळाच पॅटर्न कळल्याची चर्चा सध्या चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघात रंगली आहे. पण, याच कार्यक्रमात भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीचे शेखर निकम यांच्या पाठिशी असल्याचं वक्तव्यन केलं. त्यावरुन आता कदम आणि जाधव समर्थकांमध्ये सोशल मीडियावर वॉर रंगल्याची चर्चा देखील सुरु झाली आहे.