एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नागपुरात भाजप कार्यकर्त्याच्या अवैध सावकारीचा 60 वर्षीय वृद्ध बळी?
धक्कादायक बाब म्हणजे आरोपी सावकार सत्ताधारी भाजपचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे.
नागपूर : ग्रामीण भागात अवैध सावकारीमुळे शेतकऱ्यांचा बळी गेल्याची अनेक प्रकरणं तुम्ही ऐकली असतील. मात्र, शहरी भागात सुरु असलेला सावकारी जाच कधीच कानावर येत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात अवैध सावकाराच्या जाचामुळे एका 60 वर्षीय वृद्धाला आत्म्हत्या करावी लागली. घटनेच्या 8 महिन्यानंतर आता पोलिसांनी आरोपी सावकाराविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी सावकार सत्ताधारी भाजपचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे.
सुधाकर बाबर यांनी 29 एप्रिल 2017 रोजी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येच्या 8 महिन्यानंतर पोलीस तपासात या प्रकरणाशी संबंधित धक्कादायक तथ्य समोर आलं आहे.
काय आहे प्रकरण?
जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या सुधाकर बाबर यांनी 2016 मध्ये नितीन तराल याच्याकडून 3 लाख रुपये कर्ज घेतलं होतं. बाबर कुटुंबीयांचा आरोप आहे की, ''नितीन तराल याने 3 लाखांच्या कर्जावर रोजचे एक टक्का असे भरमसाठ व्याज आकारून हळूहळू 8 ते 9 लाख रुपये रोख वसूल केले. तरी तुमचे कर्ज फिटलेलं नाही, अशी दमदाटी करत तरालने सुधाकर बाबर यांच्याकडून एका प्लॉटचे (जमिनीचे) कागदपत्र स्वतःकडे ठेऊन घेतले होते.. तर दोन दुकानांची नोटरीही स्वतःच्या नावावर करून घेतली होती.''
3 लाखांच्या कर्जावर 8 ते 9 लाख वसूल केल्यानंतरही नितीन तराल याची भूक शमली नाही. त्याने प्लॉटचे कागदपत्र परत करण्यासाठी सुधाकर बाबर यांच्याकडे आणखी 13 लाख रुपयांची मागणी केली. बाबर कुटुंबीयांनी 4 टप्प्यांमध्ये तराल याला आणखी 13 लाख रुपये परत केले. मात्र, त्यानंतरही नितीन तराल आपल्या प्लॉटचे कागदपत्र परत करत नाही आणि सतत आणखी पैशांची मागणी करत धमकावतो या विवंचनेतून अखेर 29 एप्रिल 2017 रोजी सुधाकर बाबर यांनी आत्महत्या केली.
गेली 8 महिने बाबर कुटुंबीय सतत दडपणाखाली जगत आहे. तपासात सावकारी जाचातून आत्महत्येचे पुरावे समोर आल्यानंतर त्यांनी पोलिसांनी निःपक्ष तपास करत न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.
गुन्हा दाखल, अटक कधी?
पोलिसांनी या प्रकणात अवैध सावकारीचा आरोप लागलेल्या नितीन तरालविरोधात भा.दं.वि. कलम 306 अन्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. शिवाय लवकरच अटकेची कारवाई करु, अशी ग्वाही दिली आहे.
अवैध सावकारीचा आणि सुधाकर बाबर यांच्या आत्महत्येसाठी कारणीभूत ठरल्याचा आरोप लागलेला नितीन तराल भाजपचा कार्यकर्ता आहे. नागपुरात नेहमीच भाजपच्या कार्यक्रमात तो भाजप नेत्यांसोबत दिसून येतो. त्यामुळे सत्ताधारी नेत्यांसोबत दिसणाऱ्या या कार्यकर्त्याला अटक कधी होणार, याची आता प्रतीक्षा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement