IPS Transfer: विश्वास नांगरे-पाटील यांना पदोन्नती, सदानंद दाते यांची बदली, रितेश कुमार पुण्याचे नवे आयुक्त; राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या
Vishwas Nangre-Patil: अमिताभ गुप्ता यांची पुण्याच्या आयुक्तपदावरुन बदली झाली असून त्यांच्या ठिकाणी रितेश कुमार आता नवे आयुक्त असतील.
मुंबई: राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून त्यासंबंधित शासन आदेश जारी करण्यात आला आहे. मिरा भाईंदरचे पोलिस आयुक्त सदानंद दाते (Sadanand Date) यांची बदली झाली असून ते आता राज्याच्या दहशतवादी विरोधी पथकाचे अपर पोलिस महासंचालक असतील. तसेच बृहन्मुंबई सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) यांना पदोन्नती मिळाली असून त्यांच्याकडे आता राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलिस महासंचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पुण्याचे आयुक्त अमिताभ गुप्ता यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आता रितेश कुमार नवे आयुक्त असतील.
मिलिंद भारंंबे नवी मुंबईचे आयुक्त
विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांची बदली आता नवी मुंबईचे पोलिस आयुक्तपदी झाली आहे. तर वाहतूक पोलिस सह आयुक्त राजवर्धन यांची पदोन्नती झाली असून अपर पोलिस महासंचालक, सुरक्षा महामंडळ या ठिकाणी झाली आहे. विनय कुमार चौबे हे आता पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त असतील. तर अमिताभ गुप्ता हे आता कायदा आणि सुव्यवस्था अपर पोलिस महासंचालक असतील.
अमरावतीच्या आयुक्त डॉ. आरती सिंह यांची सशस्त्र पोलिसमध्ये बदली
अमरावतीच्या आयुक्त आरती सिंह यांची सशस्त्र पोलिसमध्ये अपर पोलिस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या ठिकाणी आता नविनचंद्र रेड्डी अमरावतीचे नवे पोलिस आयुक्त असतील. अमरावतीत डॉ. आरती सिंह यांची कारकीर्द गाजली. आरती सिंह यांची बदली करण्यात यावी यासाठी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी संसदेत तक्रारही केली होती.
अमिताभ गुप्ता यांच्या जागी रितेश कुमार
अमिताभ गुप्ता यांची पुण्याच्या आयुक्तपदावरुन बदली झाली असून त्यांना कायदा व सुव्यवस्था, अपर पोलिस महासंचालक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या ठिकाणी रितेश कुमार आता पुण्याचे नवे आयुक्त असतील.
याव्यतिरिक्त मधुकर पांडे यांची मीरा-भाईंदर-वसई-विरारच्या पोलिस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर प्रशांत बुरडे गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलिस महासंचालक असतील. सत्यनारायण चौधरी हे बृहन्मुंबई कायदा आणि सुव्यवस्थेचे पोलिस सह आयुक्त असतील. नितीश मिश्रा यांची बृहन्मुंबई आर्थिक गुन्हे पोलिस सहआयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. अंकुश शिंदे यांची पिपरीवरून बदली करण्यात आली असून ते आता नाशिकचे पोलिस आयुक्त असतील. प्रवीण पवार हे कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक असतील तर सुनिल फुलारी हे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक असतील.
अंकुश शिंदे नाशिकचे पोलिस आयुक्त, तर विशेष पोलिस महानिरीक्षकपदी फुलारी
नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांची बदली झाली असून नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी पिंपरी चिंचवडचे आयुक्त अंकुश शिंदे यांची नियुक्ती झाली आहे. तर नाशिकचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून सुनील फुलारी यांची नियुक्ती झाली आहे. राज्य शासनाने आयपीएस अधिकार्यांच्या बदल्या केल्या असून, नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाइकनवरे यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे तर विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर यांचीही बदली झाली असून, त्यांच्या जागी सुनील फुलारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नाशिक शहर पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे हे नऊ महिन्यांपूर्वी बदली होऊन आले होते. आज राज्य सरकारने तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. तसेच अंकुश शिंदे हे आता नाशिक शहर पोलीस आयुक्त म्हणून रुजू होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्य सरकारने आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश काढले आहेत. त्यात नाईकनवरे यांच्या बदलीचाही समावेश आहे. तर अंकुश शिंदे हे पिंपरीचिंचवडच्या पोलीस आयुक्त पदी होते. त्यांच्याकडे आता नाशिकची जबाबदारी देण्यात आली आहे. नाईकनवरे यांनी नऊ महिन्यांपूर्वी नाशिक पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला होता. विशेष नाशिक शहरात मागील काही वर्षांत एकही पोलीस अधिकारी अधिक काळ टिकला नसल्याचे दिसून येत आहे.