(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Forts : ऐतिहासिक वारशाला धक्का न लावता गड किल्ल्यांचं संवर्धन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना
महाराष्ट्राला गडकिल्ल्यांचा फार मोठा इतिहास लाभला आहे, मात्र हे गडकिल्ले दुर्लक्षित होऊ नयेत, त्या जागेचं, किल्ल्याच्या इतिहासाचं महत्त्व कमी होऊ नये यासाठी त्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे. याच संदर्भात मुख्यमंत्र्यांनी दुर्गप्रेमी संस्थांसोबत बैठक घेतली. यात काही महत्त्वाचे निर्णय आणि सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
मुंबई : महाराष्ट्राचं वैभव म्हणजे गडकिल्ले! महाराष्ट्राच्या प्रत्येक किल्ल्यामागे एक मोठा इतिहास दडलाय, या किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य आहे, मात्र हे काम करताना गडकिल्ल्यांचं पावित्र्य जपणं फार गरजेचं आहे. त्याच्या ऐतिहासिक आणि पुरातत्त्व वारशाला कोणताही धक्का न लावता या किल्ल्यांच्या खालील परिसरात सुविधा निर्माण कराव्यात व तिथे पर्यटन केंद्र उभारून पर्यटकांना त्या वैभवशाली वारशाची माहिती द्यावी अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बैठकीदरम्यान दिल्या. महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनाच्या कामाचे सनियंत्रण मुख्यमंत्री सचिवालयातील संकल्प कक्षातून व्हावे असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांनी आज दुर्गप्रेमी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फर्न्सद्वारे बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव विजय सौरभ, सिद्धीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर, दुर्गप्रेमी मिलिंद गुणाजी, यांच्यासह अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे, ऋषिकेश यादव, भारतीय पुरातत्व खात्याच्या अधिकारी श्रीमती नंदिनी भट्टाचार्य, महाराष्ट्र पुरातत्व खात्याचे अधिकारी, महाराष्ट्रातील गिरीप्रेम क्लबचे सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच किल्ल्यांची निवड
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे आणि त्यांच्या ऐतिहासिक विजयाची साक्ष देणारे अनेक गड किल्ले महाराष्ट्रात आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यात पाच किल्ल्यांची निवड करून त्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासकीय तसेच इतर तज्ज्ञ लोकांचा सहभाग असलेली, दुर्गप्रेमी आणि अभ्यासकांचा सहभाग असलेली एक मध्यवर्ती समिती स्थापन करा तसेच निवडलेल्या प्रत्येक किल्ल्यासाठी एक स्वतंत्र समिती स्थापन करून याच पाच ही किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनाच्या कामाचे मुख्यमंत्री सचिवालयातील संकल्प कक्षामार्फत सनियंत्रण करा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.
गडकिल्ल्यांच्या पावित्र्याला अजिबात धक्का नको
छत्रपती शिवाजी महाराजांचे एकेकाळचे सोबती, स्वराज्याचे सैनिक असलेल्या गडकिल्ल्यांनी महाराजांचा पराक्रम पाहिला, त्या पराक्रमाचे ते साक्षीदार झाले. त्या किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करणे हे आपले कर्तव्य असून हे काम करतांना गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपत, त्याच्या ऐतिहासिक आणि पुरातत्त्व वारशाला कोणताही धक्का न लावता आपल्याला हे काम करावयाचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी परत एकदा स्पष्ट केले.
गावात पर्यटनकेंद्र उभारावे, जैवविविधता जोपासावी
या किल्ल्यांच्या आजूबाजूच्या 50 कि.मी अंतरामध्ये असलेली पर्यटनस्थळे, किल्ल्याचे ऐतिहासिक संदर्भ, तिथे घडलेला पराक्रम तिथले वन्यजीव, तिथली वनसंपदा,जैव विविधता जोपासावी. आजूबाजूची लोकपरंपरा, गडाच्या अनुषंगाने काही लढाया झाल्या असतील तर त्या, या सगळ्या गोष्टींची माहिती संकलित करून गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावात पर्यटनकेंद्र विकसित करता येईल का, तिथे मुळ गड कसा होता याची प्रतिकृती तयार करता येईल का, पूर्वीचे ते ऐतिहासिक वातावरण निर्माण करता येईल का, लाईट ॲड साऊंड शो दाखवता येईल का, यादृष्टीने विचार करून एक सर्वंकष विकास आराखडा या समित्यांनी सादर करावा असेही म्हटले.
किल्ल्यांच्या संवर्धनातील अडथळे दूर करा
राज्यातील सर्व किल्ले एका शासकीय विभागांतर्गत आणून त्यांच्या विकासात असलेले अडथळे ताबडतोब दूर करा असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. ते पुढे म्हणाले की गडकिल्ल्यांवरची स्वच्छता खूप महत्वाची आहे. गड किल्ल्यांचा विकास करताना त्याचे ऐतिहासिक संदर्भ जपले जाणे, इथे करावयाची डागडुजी ही पुरातत्व खात्याच्या निकषाप्रमाणे होणे गरजेचं आहे. रायगडावर ज्याप्रमाणे पर्यटकांसाठी रोप वे उपलब्ध करून देण्यात आला आहे तो इतर काही गडकिल्ल्यांवर उपलब्ध करून देता येईल का याची शक्यताही मुख्यमंत्र्यांनी तपासून पाहण्यास सांगितली.
स्थानिकांना रोजगार संधीही मिळावी
पावसाळ्यात आपण मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेतो परंतु, गडकिल्ल्यांच्या परिसरात हेलिकॉप्टरच्या साहाय्याने बिया टाकल्या तर नैसर्गिकरित्या या भागात वनराई विकसित होण्यास मदत होईल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, या सर्व कामात स्थानिकांना विश्वासात घेऊन काम केल्यास गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये पर्यटकांच्या राहण्याच्या, जेवण्याच्या सुविधा उपलब्ध होतील आणि त्यातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार संधी मिळतील.
पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांनी तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी गडकिल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी त्यांच्या विभागामार्फत करण्यात येत असलेले प्रयत्न, पर्यटन वाढीच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या कामाची माहिती दिली. नंदीनी भट्टाचार्य यांनी भारतीय पुरातत्व खात्यामार्फत करण्यात येत असलेल्या गड संवर्धनाची माहिती दिली तसेच याकामी राज्य शासनाला पूर्ण सहकार्य करण्यात येईल असेही त्या म्हणाल्या.
शिवाजी महाराजांचे गड किल्ले हे महाराष्ट्राचे वैभव असून त्यांच्या जतन आणि संवर्धनातून हे वैभव लोकांसमोर आणणे गरजेचे असल्याचे सांगतांना महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ या कामी निस्वार्थीपणे शासनाला सहकार्य करील अशी ग्वाही श्री. झिरपे यांनी दिली. पुरातत्त्व संचालक तेजस गर्गे यांनी जागतिक वारसा स्थळासाठी महाराष्टातील बारा गडकिल्ल्यांचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवल्याचे सांगितले.
मराठी अभिनेते आणि दुर्गप्रेमी मिलिंद गुणाजी यांनी गडकिल्ल्यांचा विकास करतांना आजूबाजूच्या परिसरात असलेली पर्यटनस्थळे शोधून त्या परिसराचा एक पर्यटनकेंद्र म्हणून एकत्रित विकास व्हावा, कोणताही पर्यटक महाराष्ट्रात आला तर तो पाच सहा दिवस महाराष्ट्रातच थांबला पाहिजे अशा पद्धतीने गडकिल्ले, त्यासोबत वन आणि इतर पर्यटनाची जोडणी केली जावी, महाराष्ट्रातील अशा पर्यटनाची सर्वांगसुंदर माहिती जगभर दिली जावी अशी सूचना केली.